Jalna Update : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी हे सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे व भोकरदन तालुक्याच्या सीमेवरील शेवटचे गाव आहे. गावाभोवती अनेक वस्त्या आहेत. सुमारे २९०० हेक्टरचे गावशिवार. पैकी २३२२ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे.
पूर्वी पारंपरिक शेती निसर्गाच्या भरवशावर असे. अर्थार्जनासाठी मजुरी, ऊसतोडणीशिवाय पर्याय नव्हता. गावाचा भाग असलेल्या मडकेवाडीतील कारभारी मडके यांना २० वर्षांपूर्वी कंपनीशी करार करून बांबूच्या साध्या शेडमध्ये
भाजीपाल पिकांचे बीजोत्पादन घेतले. खर्च वजा जाता चांगले उत्पन्न मिळाल्याने गावात एकेक करत बांबू शेडनेटमध्ये विविध पिकांचे बीजोत्पादन घेण्यास अन्य शेतकऱ्यांनी सुरुवात केली. बीजोत्पादकांची संख्या वाढत गेली.
संरक्षित शेतीला ऊर्जा
तुपेवाडीच्या शेतकऱ्यांना खरी ऊर्जा मिळाली ती सन २०१९ पासून राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोक्रा योजनेमुळे. साधे शेडनेट शासनाच्या अनुदानरूपी मदतीतून पक्क्या शेडनेटमध्ये परावर्तित झाले.
आता त्यांची संख्या ३३१ वर पोहोचली आहे. शिवाय ५६ शेडनेट्स अनुदानाच्या प्रक्रियेत आहेत. याशिवाय आधीचे जवळपास ४०० च्या वर शेडनेट्स गावशिवारात आहेतच. १० गुंठे ते एक एकरांपर्यंत शेडनेट असलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे.
प्रत्येकी किमान १०० हेक्टर पोकरा व १०० हेक्टर साध्या शेडनेट याद्वारे शेती संरक्षित झाली असल्याची माहिती कृषी विभाग व तुपेवाडीच्या शेतकऱ्यांनी दिली.
शेततळी व सूक्ष्मसिंचन
विहीर किंवा बोअरच्या माध्यमातून शेती संचित करण्याचे काम तुपेवाडीचे शेतकरी करतात. त्यास शासकीय योजनेतून जोड म्हणून सुमारे ५६ शेततळी गावशिवारातील उभी राहिली आहेत. पोकराच्या माध्यमातून ३४७ शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचासाठी, तीन शेतकऱ्यांना विहिरींसाठी तर २७२ शेतकऱ्यांना शेडनेटसाठी अनुदान देण्यात आले.
एक अवजार बॅक देण्यात आली आहे. सुमारे २५ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. जलसंधारणाची अनेक कामेही प्रस्तावित आहेत. यात २० हेक्टर डीप सीसीटी, दोन मातीनाल, सात सिमेंट नाला बांध, ७०० हेक्टर बांधबंदिस्ती व ३० नाला खोलीकरण आदींचा समावेश आहे.
बाजरीसारख्या उन्हाळी पिकासाठीही शेतकऱ्यांना शेततळ्यातील पाण्याचा वापर करता आल्याचे कृषी सहायक राजू राठोड यांनी सांगितले.
संरक्षित शेतीतील पीक नियोजन
-मिरची, टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, दोडके, कारले, खरबूज, टरबूज आदींचे बीजोत्पादन.
-२० ते २५ कंपन्यांचा त्यात सहभाग.
-प्रत्येकी ४० टक्के शेतकरी काकडी व मिरची, तर २० टक्के कारले व अन्य बीजोत्पादन घेतात.
- जून ते मे या काळात मिरची व कारले, नोव्हेंबर ते फेब्रुवारी टोमॅटो, जून ते ऑगस्ट काकडी, जून ते डिसेंबर ढोबळी मिरची, डिसेंबर ते फेब्रुवारी दोडका, डिसेंबर ते फेब्रुवारी खरबूज व टरबूज असं बीजोत्पादनाचे साधारण नियोजन असते
-अनेक शेतकरी भाजीपाला पिकांचे उत्पादनही घेतात. दिवसाआड दोन वाहनांमधून शेतीमाल जागेवरून नेला जातो.
मजुरांना रोजगार
संरक्षित शेतीमुळे या शेतीशी जोडल्या गेलेल्या गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना गावातच रोजगार मिळू लागला आहे. शिवाय पिंपळगाव, जालना, राजूर, चांधई आदी ठिकाणच्या ४०० ते ५०० मजुरांच्या हातालाही काम मिळाले आहे.
किमान सव्वा ते दीड कोटी रुपये उलाढाल त्यातून होत असावी. किमान २० ते २५ वाहनांमधून मजुरांना तुपेवाडीत आणण्याची सोय करण्यात येते.
तुपेवाडीची ओळख शेडनेटचं गाव म्हणून झाली आहे. पूर्वी मजुरीची वेळ आलेले शेतकरी आता स्वतः मजुरांच्या हाताला काम देताना दिसत आहेत. काही लाखांपर्यंत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न पोहोचले गेले आहे.व्यंकट ठक्के तालुका कृषी अधिकारी, बदनापूर
आमची दोघा भावंडांची १७ एकर एकत्रित शेती आहे. त्यापैकी एक एकरावर बीजोत्पादन घेतो. संरक्षित शेतीत उतरण्याआधी कापड दुकानात काम करीत होतो. आता सारं काही स्थिरस्थावर झालं आहे.अर्जुन सगाजी मोरे, ७७९८६५७३५५
पूर्वी चरितार्थ भागविण्यासाठी ऊसतोडणीला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आता संरक्षित शेतीतील बीजोत्पादनामुळं हातचा कोयता सुटला. अर्थकारण सुधारलं, आम्ही आता अनेकांच्या हाताला वर्षभर काम देऊ लागलो आहे.पंकज लक्ष्मण राठोड, वसंतनगर, तुपेवाडी, ८८३०३५४४२१
सुमारे २० वर्षांपूर्वी साध्या शेडनेटमध्ये कंपनीच्या मदतीने बीजोत्पादन प्रयोग यशस्वी केला. याच शेती पद्धतीमुळे दोन एकर शेती विकत घेणे शक्य झाले. वर्षाकाठी काही लाखांचे उत्पन्न मिळते आहे. सुमारे २० गुंठ्यांत पक्के तर अडीच एकरांत साधे शेडनेट आहे.कारभारी पांडुरंग मडके, ७६२००२८५५१
गावातील कच्ची घरं आज पक्की झाली आहेत. वाहने दिसतात. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्षमता आली.एकनाथ शंकरराव मोरे, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तुपेवाडी, ९४२१६५३१३१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.