Vegetable Farming : तब्बल नऊ देशांत शेती करणारा लंडनस्थित ग्रेट पंजाबी पुत्तर

‘आयटी’ क्षेत्रातील व्यवसाय सांभाळून तब्बल नऊ देशांत भाजीपाला पिकांची करार शेती करण्याचं दिव्य लंडनस्थित नीरज रत्तू यांनी पार पाडलं आहे. पुण्यातच वाढलेल्या या ‘ग्रेट पंजाबी पुत्तर’ नं आता मायदेशी (पुणे जिल्ह्यात) करार शेतीचा पुढील अध्याय सुरू केला आहे. शेतीत भवितव्य, पैसा, समाधान आहेच. पण जागतिक बाजारपेठेवर पकड मिळवण्याची क्षमता भारतीय शेतकऱ्यांत आहे ही प्रेरणा देण्याचे कामही आपल्या उदाहरणातून नीरज यांनी केले आहे.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture Update : ‘मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट’ विषयातील पदवी. लंडन येथे ‘आयटी’ क्षेत्रातील ‘कॉन्ट्रॅक्टिंग’ चा व्यवसाय. पत्नी, दोन मुलांसह सुस्थापित कुटुंब. असं शांत, आरामदायी जीवन जगत राहायला कुणाला आवडणार नाही? पण शेतीची पॅशन होती. म्हणूनच चाकोरीबाहेरचं आयुष्य स्वीकारून तब्बल नऊ देशांत करार शेती करण्याचं दिव्य पार पाडलं.

जगापुढं वेगळं उदाहरण तयार केलं. नीरज रत्तू (Neeraj Rattu) असे या ‘ग्रेट पंजाबी पुत्तर’ चं नाव आहे. वडिलांची नोकरी पुण्यात ‘डिफेन्स’ विभागातच झाल्याने नीरज पुण्यातच वाढले. त्यामुळे मराठी संस्कृती, भाषा त्यांनी आपलीशी केली.

निर्माण झाली शेतीची आवड

लंडनमध्ये नीरज यांना एका कंपनीकडून घाना देशात ‘मायक्रो फायनान्स’ विषयातील ‘सॉप्टवेअर’ विकसित करण्याचा प्रकल्प मिळाला. त्या अनुषंगाने शेतीतील मशागत, लागवड ते काढणीपर्यंतचा ताळेबंद व समस्यांचा सूक्ष्म अभ्यास झाला. त्यातून शेतीची आवड निर्माण झाली.

आपणही शेती करून पाहावी असा विचार मनी आला. वर्षातील सहा महिने ‘आयटी’ क्षेत्रात काम करून चांगला पैसा कमवायचा. उर्वरित सहा महिने ‘ब्रेक’ घेऊन तो वेळ शेतीला द्यायचा असे नियोजन केले.

नऊ देशांत केली शेती

स्वतःचा मुलूख ओलांडून अनोळखी जिल्हा, परराज्यात शेती कसणं हेच मुळी आव्हानात्मक असतं. पण पंधरा वर्षांच्या कालावधीत नीरज यांनी चक्क तीन भौगोलिक खंडांत (युरोप, आफ्रिका व दक्षिण अमेरिका) भाजीपाला पिकांची करार शेती करण्याची मोठी हिंम्मत आणि धाडस दाखवलं.

अल्बेनिया, स्पेन, केनिया, युगांडा, घाना, मलावी, झांबिया, युगांडा, चिली या नऊ देशांत शेतीचा समृध्द अनुभव घेतला. त्या शिदोरीवर मायदेशी दोन वर्षांपासून करार शेतीचा पुढील अध्याय सुरू केला आहे. पुणे जिल्ह्यात रांजणगाव परिसरात पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथे ५० एकर जमीन ‘लीज’ वर घेत १० एकरांत मिरची घेतली आहे.

Vegetable Farming
Indian Agriculture : देऊळगावराजातील विनोद चव्हाण यांनी संरक्षित शेतीतून शोधला आर्थिक उन्नतीचा मार्ग

करार शेतीतील अनुभव

पूर्व युरोपातील अल्बेनिया देशात भाजीपाला पिके घेणारा मी पहिला भारतीय शेतकरी असेन असे नीरज अभिमानाने सांगतात. तेथे शंभर एकर क्षेत्र ‘लीज’ वर घेऊन दुधी, दोडका, कारले, गवार, टिंडा, वीस एकरांत भेंडी घेतली. केनियात मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेतला.

येथील ‘बर्ड आय’ मिरची खूप तिखट असून युरोपात त्यास मोठी मागणी असते. आहे. ही मिरची इंग्लंडला निर्यात केली. अश्रुधूर सोडण्यामध्ये तिचा वापर होतो.

नीरज सांगतात की आफ्रिकी देशांत शेती जंगलात होती. त्यामुळे तेथेच राहायला शिकलो. अनेकवेळ वीज नसायची. हवामान, भौगोलिकता, स्थानिक संस्कृती अभ्यासून तेथील शेती पद्धती शिकून स्थानिकांना सोबत घेऊन व्यवस्थापन केलं.

आयटी क्षेत्रात ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ चा अनुभव, कौशल्य पणास लावले. जोखीम व्यवस्थापन केलं. भाषा हा मोठा अडथळा असायचा. पण ज्या देशात दीर्घकाळ काम करायचं तिथली भाषा कामापुरती शिकून घेतली. नीरज सांगतात की घाना देशात राजधानीच्या शहरात राहायचो. तेथून शेत तीन तासांवर होते. पहाटे

चारलाच निघायचो. सात वाजेपर्यंत म्हणजे सर्वात आधी मीच पोचायचो. ही बाब भावल्यावर मग स्थानिकही वक्तशीरपणे व शिस्तीत कामे करू लागले.

मार्केट

संबंधित भागातील मार्केट पूर्ण माहीत होत नाही तोपर्यंत तेथील मातीत बी टाकायची नाही हे नीरज यांचे तत्त्व आहे. त्यामुळे विक्रीची अडचण शक्यतो आली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाजीपाला

व्यापाराचा अभ्यास केला. इंग्लंडमध्ये जगभरातून माल येतो. त्यामुळे दररोज रात्री ते लंडन मार्केटला ते जायचे. कोणत्या भाज्या तिथं येतात, त्यांचे आकार, वजन, पॅकिंग, हंगामनिहाय बदलणारे दर, ग्राहक कोण आहेत, कोणत्या आकाराला, पॅकिंगला त्यांची पसंती असते ही निरीक्षणे नोंदविली.

पॅकेजिंग कसे बनते? त्याचा पुनर्वापर करता येईल का? कोणकोणत्या गोष्टीत पैसा वाचवता येईल या बाबींचा अभ्यास केला. बियाणे पैदासकारांना भेटून ज्ञान घेतलं. या सर्वांतून वाण निवड, शेती विकास, तंत्रज्ञान व्यवस्थापन यात कौशल्य मिळवलं.

भारतातील शेती

पिंपरी दुमाला (पुणे) येथील शेतात पिवळ्या रंगाची भावनगरी, जी फोर वाणाची गडद काळी, चमकदार, तिखट मिरची आदी वाण घेतले आहेत. ३० किलो पावडर बनविली आहे. अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून मागील वर्षी जी- फोर मिरचीचे एकरी १८ टनांपर्यंत तर भावनगरीचे २० टनांपर्यंत उत्पादन मिळाले.

दोन वर्षांत पुणे बाजार समितीत प्रति किलो ४५, ६०, ८० ते ९० रुपयांपर्यंत दर मिळाले. ‘कॅश फ्लो’ देणारी पिके आणि केवळ नफा देणारे पीक असे शेतीचे दोन प्रकार केले आहेत.

उत्पादन खर्च निघून जाण्यासाठी (कॅश फ्लो) तीन एकरांत दुधी, दोडका व काकडी येत्या खरीपापासून ‘रोटेशन’ पद्धतीने घेण्यात येईल. मिरची पूर्णपणे नफा मिळवण्यासाठी असेल. महाराष्ट्र, मध्य प्रदेशात करार शेती वाढवण्याचा मानस आहे.

ऊर्जेचा अखंड स्रोत

नीरज ऊर्जेचा अखंड स्रोत आहेत. आठवड्यातील सातही दिवस `आयटी’, शेती आणि घर अशा तिहेरी जबाबदाऱ्या ते मोठ्या जिगरीने सांभाळतात. यू ट्यूबवर शेतीविषयक व्हिडिओ पाहणे, नवे ज्ञान घेत राहणे, ‘वीकएंड’ ला युरोपातील शेताला भेट देणं हा दिनक्रम सुरू असतो.

मिरची शेतीच्या पाहणीसाठी दर तीन महिन्यांनी लंडन ते पुणे वारी करण्याचे कष्ट ते घेतात. त्यांची पत्नी महाराष्ट्रीयन असून दोन मुलांपैकी एक विद्यापीठात तर दुसरा दहावीत आहे.

लंडन मार्केट- नीरज यांच्या नजरेतून

युरोपातील स्पेन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, स्पेन, इटली, जर्मनी, मेक्सिको (दक्षिण अमेरिका) आदी बाजारपेठांना नीरज यांनी भेटी दिल्या आहेत. जागतिक बाजारपेठांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. ते म्हणतात की ‘ग्रेपनेट’च्या माध्यमातून भारताने युरोपीय द्राक्षनिर्यातीत मोठे नाव कमावले.

पण विविध भाजीपाला, फळांसाठीही प्रचंड वाव आहे. लंडन बाजारपेठेत भारतासह आशियायी देशातील आयातदार आहेत. लंडनसह मॅंचेस्टर, बर्मिंगहॅम, लेस्टर आदी भागात माल जातो. लेस्टरमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे.

लंडनमध्ये दर दोन महिन्यांनी ‘मार्केट’, ‘वेदर पॅटर्न’ बदलतात. प्रत्येक मालाचे ‘विंडो पिरीयड असतात. एप्रिल ते सप्टेंबर नवा ‘विंडो’ सुरू झाला आहे. त्या काळात भारतीय भाजीपाला इटली व स्पेनवरून येतो. कारण रस्ता वाहतुकीला ते सोपं जातं. सप्टेंबरनंतर भारतातून भाजीपाला सुरू होतो.

Vegetable Farming
Guava Farming : मोहोळमधील शेतकरी वळतोय पेरू शेतीकडे

भाजीपाला निहाय मार्केट

-लंडन मार्केटमध्ये घाना देशातून येणाऱ्या बॉक्समधील छोट्या दोडक्यांना पसंती. तेथे

दोडक्याचा मुख्य ग्राहक गुजराती. आपल्याकडे लांब दोडके असल्याने बॉक्सिंग करणे अडचणीचे ठरते.

-इंग्लंडमध्ये ग्लासहाऊसमध्ये टोमॅटो फार्म. युरोपातील तो सर्वात मोठा असावा. तेथे कीडनाशकांचा वापर होत नाही. हवामानही थंड आहे. जैविक पद्धतीने कीडनियंत्रण करून मालाची गुणवत्ता जपली जाते.

भेंडी

-दररोज काही टनांची आवक. लंडनमधील ग्राहक दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या भेंडीला पहिली पसंती देतो. कारण गुणवत्तेसह सर्वोत्कृष्ट पॅकिंग आणि ‘प्रेझेंटेशन’. या देशाने काढणी पश्‍चात तंत्रज्ञान व ‘कुलिंग सिस्टीम’ विकसित केली आहे.

त्यामुळे झाडावर दिसते तीच भेंडीची गुणवत्ता बाजारात दिसते. अशा बाबींमुळेच हे देश जागतिक बाजारपेठेवर पकड मिळवतात. त्यांची भेंडी आणि अन्य देशातील भेंडी यात प्रति बॉक्स पाच पौंड दराचा फरक असावा.

मिरची

-हिरव्या मिरचीचे लंडन मोठे मार्केट. टर्की देश युरोपचे प्रवेशद्वार असून येथून ट्रक भरभरून मिरची येते.

-येथील मजुरीही स्वस्त. खरे तर या मिरची शेजारी भारतीय मिरची ठेवल्यास आपल्याच मिरचीचा अधिक उठाव होईल. कारण टर्कीच्या तुलनेत आपली मिरची अधिक तिखट आहे. पण स्वस्त असल्याने टर्कीची मिरची अधिक खपते. त्यांचे डाळिंब छान आहे. या देशानेही ‘पोस्ट हार्वेस्ट सिस्टीम’, पॅकेजिंगवर अधिक मेहनत घेतली आहे.

दुधी भोपळा

लंडनमध्ये घरटी सरासरी दोन जण राहतात. त्यामुळे मोठी दुधी तिथे चालत नाही. काकडीच्या आकाराची किंवा दीड- दोन फुटांपेक्षा जास्त लांबी नसलेली दुधी लागते. अशा दुधीची तोडणी करून पेपरमध्ये गुंडाळून चार किलोच्या बॉक्समधून ती लंडन मार्केटला येते. येथे बिना बियांची कोवळी गवार चालते. कारली छोटीच चालतात.

आंबा

-इस्राईलचा माया आंबा रंग, स्वाद, गंध याबाबतीत हापूसशी स्पर्धा करणारा. युरोपीय सुपर मार्केटसच्या शेल्फवर तो सर्वत्र दिसतो.

-त्याच शेल्फवर आपला हापूस व केशर आंबा दिसण्यासाठी भारतातून निर्यातीचे प्रयत्न नीरज यांनी सुरू केले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधून काही ऑर्डर्स मिळताहेत.

-आंबा कापल्यास खराब आढळणार नाही याची हमी ग्राहकांना मिळावी अशी पध्दत विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न.

अन्य फळे

-युरोपीय बाजारपेठेत इजिप्तहून सीताफळ येते. ८०० ग्रॅम वजनापर्यंतची डाळिंबे येतात. त्यांना चांगला उठाव.

-डाळिंब, केळीची बाजारपेठ प्रचंड. कोस्टारिका, ब्राझील, फिलीपाईन्सवरून लंडन मार्केटला मोठ्या प्रमाणात केळी येतात. काढणी पश्‍चात यंत्रणा चांगली विकसित केल्याने त्यांना उच्च गुणवत्तेसह बाजारपेठ मिळवता आली आहे.

-चिकू, सीताफळ मार्केट छोटे. तरीही मागणी आहे.

-इटली हा जगातील सर्वात मोठा बियाणे पुरवणारा देश. डच लोक (नेदरलॅंड) संपूर्ण जगात शेतमाल व्यापार करणारे म्हणून प्रसिद्ध. केनियात फुलांचे उत्पादन होते. पण त्याचे जागतिक लिलाव, दर नेदरलॅंडमध्येच निश्‍चित होतात.

विमान वाहतूकशुल्क

इजिप्त, केनिया, अन्य आफ्रिकी देशांतील भाज्या लंडन बाजारात अधिक दिसतात. केवळ गुणवत्ता हे कारण नाही. तर विमान वाहतुकीसाठी तिथं फ्रेट शुल्क आहे प्रति किलो केवळ ९० सेंटस. भारतात हेच शुल्क तीन डॉलर आहे. त्यामुळे आपली भाजी महाग होऊन स्वीकारण्यास अडचण तयार होते.

आपल्या सरकारची धोरणे निर्यातदार, शेतकरी यांच्यासाठी अनुकूल हवीत. तरच लंडन बाजारात आपला निभाव लागेल. आपल्या शेवग्याला तिथं मार्केट आहे. त्या गुणवत्तेचा शेवगा आफ्रिकेत होत नाही. पण उद्या आफ्रिकेतून तसा येऊ लागल्यास ते मार्केट आपल्या हातून निसटून जाईल.

Vegetable Farming
Gopinath Munde Farmer Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना काय आहे?

शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे

भारतीय शेतकरी लंडनच्या मार्केटवर पकड मिळवू शकतो. त्यासाठी संघटित होण्याची गरज नीरज व्यक्त करतात. सध्याची स्थिती अशी आहे की समजा निर्यातदाराला १०० किलो दुधी हवा आहे. त्यासाठी तीन शेतकरी असतील तर तिघांचे तीन वाण असतात. व्यवस्थापन, गुणवत्ता या बाबी भिन्न असतात.

त्या तुलनेत सलग मोठे क्षेत्र, एकच वाण व व्यवस्थापनात समानता या बाबी निर्यातक्षम उत्पादनासाठी अनुकूल ठरतात. गुणवत्ता आपल्या हाती आहे. पण विमान वाहतूक शुल्क ही बाब आपल्या हाती नाही असे नीरज खेदाने म्हणतात.

आंबा निर्यातीसाठीची शुल्क सवलत भाजीपाल्यांसाठी हवी. इजिप्तमध्ये शेतकऱ्याने निर्यातीतून १० डॉलर मिळवले तर परकीय चलन आणल्याबद्दल तेथील सरकार त्याला पाच डॉलर रक्कम प्रोत्साहनात्मक अधिक देते. आपल्या सरकारने हे करायला हवे असे नीरज म्हणतात. सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया याही मोठ्या बाजारपेठा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.

संपर्क- नीरज रत्तू, लंडन, (केवळ व्हॉटसॲप वर संपर्क- ८८५०७७६२७८

ई- मेल- neeraj. rattu@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com