Mahabaleshwar Strawberries Cultivation
Mahabaleshwar Strawberries Cultivation Agrowon
यशोगाथा

Mahabaleshwar Strawberries Cultivation : मानराळावरील स्ट्रॉबेरीला बहरली कष्टाची गोड फळे

विकास जाधव

Agriculture Success Story : महाबळेश्‍वर नजीक पाचगणी- भिलार या प्रसिद्ध पर्यटन स्थळ परिसरात डोंगराळ भागात घोटेघर हे छोटे गाव आहे. येथील रामदास सखाराम महाडीक मुंबई येथे एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय करायचे.

पत्नी सुनीता व मुले गावी राहायचे. वडिलोपार्जित शेतीतून १५ गुंठे शेती त्यांच्या वाट्याला आली. पत्नी सुनीता यांचे लग्नाआधी आठवीपर्यंत शिक्षण झाले होते. लग्नानंतर शिकण्याची त्यांची जिद्द होती. रामदास यांच्या प्रोत्साहनातून दुर्गम गावात राहून मुक्त विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली.

अंगणवाडी मदतनीस म्हणून व त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून त्या नोकरी करू लागल्या. पतीचे मुंबईत व्यवस्थित बस्तान बसत नव्हते. मग मुंबईला कायमचा रामराम ठोकून ते गावी परतले व शेती करू लागले.

शेतीतील संघर्ष

आतापर्यंत जमा थोड्या बहुत पैशांत गावानजीक डोंगरावर ५३ गुंठे शेती घेतली. हा म्हणजे तांबडा खडक होता. सुनीताही अंगणवाडीच्या कामातून मिळेल त्या वेळेत रामदास यांच्यासह शेतीत राबू लागल्या.

खडतर प्रयत्नांतून दोघांनी लागवडयोग्य जमीन तयार केली. डोंगरात पाण्याची व्यवस्था उभारणे गरजेचे होते. त्यासाठी बोअर घेतले. वीज उपलब्ध नसल्याने ‘जनरेटर’ आणले. परिसरात स्ट्रॉबेरी हेच मुख्य पीक होते.

रामदास यांनीही खडकाळ माळरानावर पाच गुंठ्यांत सहा हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली. तीन वर्षांनी वीज आली. अनुभव व या शेतीचा आवाका वाढत जाईल तशी क्षेत्रात वाढ केली.

सतरा वर्षांच्या अभ्यासपूर्ण व सातत्यपूर्ण कष्टाला आज यशाची लालचुटूक फळे आली आहेत. या पिकातून कुटुंबाचे अर्थकारण सक्षम झाले आहे.

व्यवस्थापनातील ठळक बाबी

१) घोटेघर भागात पाऊस भरपूर. त्यामुळे मदर प्लॅंटपासून रोपे तयार करणे शक्य होत नाही. त्यामुळे वाई भागात दोन एकर क्षेत्र खंडाने घेतले असून तेथे रोपेनिर्मिती होते.

२) भिलार येथील संस्थेतून मदर प्लॅंट आणली जातात.

३) विंटर, नाबिला तसेच यंदा मेलिसा आदी जाती. काही लवकर पक्व होणाऱ्या. काही छोट्या फळांच्या. ऑनलाइन विक्रीसाठी त्या योग्य ठरतात. अशा कारणांनी जातींत ठेवली विविधता.

४) एकरी २४ हजार रोपांची लागवड. साडेतीन फुटी बेड, पॉली मल्चिंग व ठिबक सिंचन.

५) रासायनिक अवशेष मुक्त पद्धतीने व्यवस्थापनावर भर. गरजेवेळीच रासायनिक कीडनाशकांचा वापर. सेंद्रिय निविष्ठा व शेणखताचा अधिक वापर.

६) चार बोअर घेतले असून दोन चालू अवस्थेत.

७) पॅकिंग शेडची उभारणी.

८) डोंगराळ भाग असल्याने रानगवे, वराह, वाघ आदी जनावरांचा धोका राहतो. शेतीसह पॅकिंग हाउसचे मोठे नुकसान होते.

उपाय म्हणून १८ ते २० हजार रुपये खर्चून चार्जिंग बॅटरीवर आधारित तारेचे कुंपण बसविले आहे. वन्यप्राण्यांना त्याचा स्पर्श होताच झटका बसतो. मात्र जीवितास धोका पोचत नाही.

उत्पादन, विक्री व्यवस्था

पहाटे पाचला दांपत्याचा दिवस सुरू होतो. हंगामात सकाळी सहा ते अकरापर्यंत स्ट्रॉबेरीची तोडणी होते. दिवसभर पॅकिंग होते. एकरी पाच टनांपासून ते कमाल ८ ते १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. मुंबई बाजार समितीत गाळा घेतला असून, येथील जबाबदारी मुलगा अक्षय पाहतो.

येथे गाव परिसरातील ४० ते ५० शेतकऱ्यांकडील स्ट्रॉबेरीही आणली जाते. त्यातून त्यांनाही चांगला दर मिळवण्याची संधी तयार होते. रामदास यांचे दुसरे चिरंजीव अनिकेत यांनी श्री राज फार्म नावाने ऑनलाइन विक्री व्यवस्था सुरू केली आहे.

मिळालेल्या ‘ऑर्डर्स’ ते वडिलांकडे पाठवतात. २५० ते ३०० ग्रॅम पनेटमधून माल रवाना केला जातो. हंगामाच्या सुरुवातीस किलोला ४००, ५०० रुपये तर हंगामाच्या अखेरीपर्यंत ८० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. शेतीत ६० टक्के खर्च तर ४० टक्के नफा मिळतो.

कष्टातून प्रगती

स्ट्रॉबेरी हंगामात रामदास यांचे शेतातील घरात वास्तव्य असते. हंगाम आटोपल्यानंतरच ते गावी घरी जातात. मदर प्लॅंटपासून रोपे तयार करण्याच्या वेळीस ते सतत वाई येथे जाऊन येऊन असतात.

पत्नी सुनीता यांनाही अंगणवाडी सेविका, घर, शेतीकामे अशा सर्व जबाबदाऱ्या पेलताना अक्षरशः कसरत करावी लागते. दोन्ही मुले आज मुंबईत असली तरी शाळेत असताना त्यांचीही शेतीत मदत व्हायची. पुढील वर्षी स्ट्रॉबेरी निर्यातीचा प्रयत्न आहे.

बांधावर गुजबेरी, मलबेरी, राजबेरी, जांभूळ, पेरू आदींची लागवड आहे. गाजर, लालमुळा दोन ते तीन गुंठ्यांत आहे. ऑनलाइन पद्धतीने काहींची विक्री होते. त्या उत्पन्नामुळे घरच्या दैनंदिन खर्चाला व वाहतूक खर्चाला मोठा हातभार लागतो. ब्लूबेरी, ब्लॅकबेरीची कुंडीत लागवड केली आहे. दोन वर्षांनी फळे सुरू होतील.

रामदास महाडीक, ९०११११९८९२, ९६५७४१४९७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT