Strawberry Farming : महाबळेश्‍वरसह भाव खातेय नाशिक- सापुताराची स्ट्रॉबेरी

पुणे बाजार समितीत सध्या स्ट्रॉबेरीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. काही वर्षांपूर्वी प्रामुख्याने महाबळेश्‍वर, वाई परिसरातून आवक होणाऱ्या स्‍ट्रॉबेरीला नाशिक- सापुतारा भागांतूनही स्पर्धा वाढली असून, तीही चांगला भाव खात आहे.
Strawberry Farming
Strawberry Farming Agrowon
Published on
Updated on

गणेश कोरे

जानेवारीनंतर सर्वत्र बाजारपेठांमध्ये विविध फळांची आवक (fruits) मोठ्या प्रमाणात सुरू होते. यातील एक महत्त्वाचे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. खरं तर महाबळेश्‍वर ( Mahabaleshwar Strawberry) पट्ट्यातील फळ म्हणूनच त्याची खरी ओळख आहे. पण ती राज्यात अन्यत्रही विस्तारली आहे. पुणे येथील गुलटेकडी (Pune Apmc) बाजारपेठेतही अन्य फळांबरोबर या फळाचे ‘मार्केट’ मोठे आहे.

सुमारे २० वर्षांपासून स्ट्रॉबेरी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे पुणे येथील प्रकाश जसुजा सांगतात, की मी या व्यवसायात उतरलो तेव्हा केवळ महाबळेश्‍वर येथूनच आवक व्हायची. तेथील शेतकरी वाई येथे रोपे तयार करण्यासाठी देत असत. त्याची महाबळेश्‍वर येथे लागवड व्हायची. कालांतराने वाई परिसरातील रोपवाटिकांमधून परिसरातील शेतकऱ्यांनी लागवड सुरू केली. त्यानंतर त्याचा विस्तार वाई, सातारा आणि लगतच्या भोर (जि. पुणे) तालुक्यांत झाला.

स्ट्रॉबेरीचा हंगाम

महाबळेश्‍वर भागात पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचा हंगाम साधारण नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन फेब्रुवारी, मार्चपर्यंत चालतो. हंगामाच्या सुरुवातीला पुणे बाजार समितीत सुमारे दोन टनांची आवक होते. या दरम्यान १०० ते २०० रुपये प्रति किलोला दर असतो. दीड किलो पनेट पॅकिंगसह एक, तीन आणि पाच किलोच्या पाटीमध्येही आवक होते.

आवक आणि दर डिसेंबरपर्यंत टिकून असतात. नाताळच्या सुट्टीमध्ये महाबळेश्‍वर येथे पर्यटनाचा हंगाम असल्याने पर्यटकांना स्थानिक पातळीवर आणि थेट शेतामध्ये खाण्यासाठी शेतकरी स्ट्रॉबेरी राखून ठेवतात. यामुळे पुणे बाजारातील आवक तुलनेने कमी होते. त्या वेळी दर १२० ते १५० रुपये मिळतो.

सापुतारा स्ट्रॉबेरीची स्पर्धा

महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीशी स्पर्धा करायची असेल, तर आपली स्ट्रॉबेरी लवकर बाजारपेठेत जावी लागेल असे नाशिक- सापुतारा भागातील स्ट्रॉबेरी उत्पादकांना जाणवले. त्यांचा हंगाम आता आगाप म्हणजे सप्टेंबर महिन्यात सुरू होतो. यामुळे गणेशोत्सव, दसरा दिवाळीदरम्यान ही स्ट्रॉबेरी बाजारात उपलब्ध होते.

साधारण १०० ते २०० किलोंच्या आवकेने त्याची सुरुवात होतो. या वेळी किलोला २०० ते ३०० रुपये दर असतात. महाबळेश्‍वर आणि नाशिक या दोन्ही भागांतून आवक सुरू होऊन हंगाम जोमात येतो तेव्हा साधारण दररोजची आवक ३ ते ५ टन असते. यात नाशिक भागाचा वाटा दीड ते दोन टन असतो. यामुळे अलीकडील वर्षांत महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीला नाशिकची स्पर्धा सुरू झाली आहे.

Strawberry Farming
Strawberry Season: राज्यातील स्ट्राॅबेरी हंगाम सुरु

स्ट्रॉबेरीमध्ये विविध परदेशी वाण उपलब्ध आहेत. शेतकरी घरी रोपे निर्मिती करून ती वाढवतात. यातील जे वाण वाहतुकीला अधिक टिकाऊ आणि चवीला गोड आहेत, त्यांची लागवड साहजिकच अधिक प्रमाणात होते. सापुतारा स्ट्रॉबेरीसाठी गुजरात ही सर्वांत जवळची बाजारपेठ आहे. त्यामुळे तेथील शेतकरी अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि बडोदा आदी ठिकाणी स्ट्रॉबेरी पाठविणे पसंत करतात.

मी मेठ गुताड (ता. महाबळेश्‍वर) येथे गेल्या तीस वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती आणि खरेदी- विक्री व्यवसायदेखील करतो. माझ्याकडे विविध वाणांची लागवड होते. परिसरातील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून रोज दोन टन माल पुणे बाजार समितीत पाठवीत आहे. हंगामाच्या सुरुवातील किलोला २०० ते २५०, तर त्यानंतर १०० ते १५० रुपये दर मिळतो.
मारुती ओंबाळे, ९४२१११७५२९
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगाणा परिसरात पाच- सहा वर्षांपासून घागबारी, वारेंगाव, गुळावे बोरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची लागवड वाढली आहे. माझी तीन एकर स्ट्रॉबेरी आहे. पुणे आणि मुंबईसह गुजरातमध्ये एक, दीड व दोन किलो पॅकिंगमधून माल पाठवतो. सध्या प्रति किलो १५० ते १६० रुपये दर मिळत आहे. प्रक्रिया उद्योगासाठी नाशिक- मोहाडी येथील सह्याद्री फार्मसह पुण्यातील विविध उद्योगांना २० किलोच्या क्रेटमध्ये माल पाठवितो. प्रक्रिया उद्योगासाठी हा दर २५ ते ४० रुपये प्रति किलो मिळतो.
ईश्‍वर पवार, ७४९९५११३१० वारेगाव (ता. दिडोंरी)
मी याच वर्षी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला असून, दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी २० गुंठ्यांत दोन वाणांची लागवड केली आहे. सध्या पुणे बाजार समितीमध्ये १०० ते १५० किलो माल पाठवितो.
चेतन सोहनी (कोंढरी, ता. भोर, जि. पुणे) ९९२३१५८१८१
Strawberry Farming
Soybean-Cotton Rate: सोयाबीन-कापसाच्या धोरणात्मक निर्णयासाठी उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

पुणे बाजार समितीतील आवक, उलाढाल (प्रातिनिधिक) दर (रु.)

वर्ष --- आवक (क्विंटल) -- कमाल किमान सरासरी --- उलाढाल अंदाजे (रु.)

२०१९-२० --- २७६९ --- ५००० --- २००० --- ३८०० --- १ कोटी ५ लाख २२ हजार. (कोरोना काळ)

२०२०-२१ --- १५७५ --- ६०००--- ३०००--- ४५०० --- ७० लाख ८३ हजार (कोरोना काळ)

२०२१-२२ --- १६,८२० --- ७०००---३००० --- ४८०० ---८ कोटी ७ लाख ३६ हजार

आकडेवारी स्रोत - पुणे बाजार समिती - सांख्यिकी विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com