Vegetable Farming  Agrowon
यशोगाथा

Vegetable Farming : ‘दुष्काळाशी लढतोय, आयुष्य सुखी करतोय’

Fruit Vegetable Farming : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी हा जिरायती तालुका आहे. सातवड येथील पाठक हे अल्पभूधारक शेतकरी कुटुंब आहे. मर्यादित चार एकर व तेही पावसाधारित क्षेत्र, मुख्य बाजारपेठही तशी जवळ नाही.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील पश्‍चिम भागात शाश्‍वत पाण्याचा अभाव आहे. या भागाला सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागतो आहे. या भागातील करंजी, भोसे, सातवड आदी गावांमध्ये मोसंबी, संत्रा, डाळिंब आदी फळबागा दिसून येतात.

याच सातवड येथील अशोक पाठक यांचे चार एकर क्षेत्र असलेले अल्पभूधारक एकत्रित कुटुंब आहे. सध्या शेतीची मुख्य जबाबदारी अशोक यांचे चिरंजीव नवनाथ सांभाळतात. पूर्वी ते बाजरी, ज्वारी, हुलगा, हरभरा, गहू यासारखी पिके घेत. सन २००६-०७ पासून त्यांनी पीक पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली.

प्रतिकूल स्थितीवर उपाय

वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील नातेवाईक विजय खंदारे कलिंगडाचे पीक घेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत पाठक यांनी सन २००६ च्या दरम्यान कलिंगड व खरबूज या पिकांची कास धरली. काही वर्षे त्यात सातत्य ठेवले. त्यातून व्यावसायिक यश देखील मिळवले. सन २०२० च्या दरम्यान कोरोना काळात विक्री व्यवस्था बंद पडल्याने मोठे नुकसान सोसावे लागले.

त्यानंतर आर्थिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सुधारित पीक पद्धतीचा अवलंब करावा असे कुटुंबाला वाटू लागले. क्षेत्र चार एकरच. शिवाय मजूरटंचाई, पावसावर आधारित शेती आणि नगरची मुख्य बाजारपेठ चाळीस किलोमीटरवरअशा सर्व बाबी प्रतिकूल होत्या. त्यामुळे त्या परिस्थितीतून पुढे नेणाऱ्या व उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत देणाऱ्या पद्धतीवर कुटुंबाने विचार केला.

पीक पद्धतीत बदल

सध्या डाळिंब, संत्रा आणि टोमॅटो यांचे प्रत्येकी तीस गुंठे क्षेत्र ठेवले आहे. तर काकडी आणि कारले यांची प्रत्येकी पंधरा गुंठ्यांवर लागवड केली आहे. बाजारात भाजीपाला पिकांच्या आवकेची स्थिती व दर यांचा विचार करून साधारण ऑगस्टमध्ये लागवड होते. पाण्याची चांगली स्थिती असेल तर त्या वेळी नव्याने लागवड केली जाते. अन्यथा, पुढील खरिपापर्यत शेत मोकळे ठेवले जाते.

भाजीपाला पिकांसाठी पॉली मल्चिंगचा वापर करणारे पाठक हे सातवड परिसरातील पहिलेच शेतकरी असावेत. एकोणीस वर्षांपासून त्यांच्याकडे ठिबक आणि मल्चिंग पद्धत वापरली जाते. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते

दुष्काळाशी सामना

सिंचनासाठी एक विहीर आहे. मात्र दरवर्षी जसा पाऊस असेल त्यानुसार विहिरीच्या पाण्याची स्थिती असते. दुष्काळाशी सामना ठरलेलाच असतो. सन २०१६ मध्ये पाण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्या वेळी पुणे जिल्ह्यातील १० एकर क्षेत्र मक्त्याने घेऊन कलिंगड लागवड केली होती. त्यातून कुटुंबासाठी लागणारा पैसा उभा केला होता. मागील वर्षी देखील पावसाने साथ दिली नाही. अशावेळी टॅंकरने पाणी देऊन केवळ झाडे जगवण्याचे काम केले.

पीक नियोजन, व्यवस्थापन

नवनाथ सांगतात, की परिसरातील काही गावांमध्ये आठवड्यातील तीन बाजारांमध्ये शेतीमालाची विक्री करण्यावर भर असतो. त्यासाठी स्वतःचे वाहतूक वाहन आहे. दररोज सुमारे ४० क्रेट माल घेऊन जाणे शक्य व्हावे या दृष्टीने तेवढीच काढणी करता यावी यादृष्टीने प्रत्येक पिकाचे मर्यादित क्षेत्र ठेवले आहे.

डाळिंबाची किंवा अन्य शेतमाल जास्त झाल्यास त्याची विक्री मात्र पुणे बाजारपेठेत होते. मागील वर्षी भगवा डाळिंबाचे चार टनांपर्यंत उत्पादन मिळाले होते. यंदाचे विक्रीचे दुसरे वर्षे आहे. आतापर्यंत दीड टन विक्री झाली आहे. फळाची प्रत उत्कृष्ट असल्याने किलोला १६० ते १९० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

सात वर्षांपूर्वी संत्रा व मोसंबीची प्रत्येकी १५ गुंठ्यांत लागवड केली. दोन वर्षांपासून पीक हाती येत आहे. मोसंबीचे मागील वर्षी तीन टन उत्पादन मिळून प्रति किलो ३० ते ८० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. यंदा संत्र्याचे साडेतीन टनांपर्यंत उत्पादन तर किलोला ७० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

कारले पिकात आंतरपिके

क्षेत्र कमी असल्याने जास्तीत जास्त क्षेत्रातून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यादृष्टीने यंदा कारल्याची जुलैमध्ये लागवड केली आहे. आतापर्यंत दोन टन माल उपलब्ध झाला असून, किलोला ४० ते ५० दर मिळत आहे. कारले पिकात कोथिंबिरीचे आंतरपीकही घेतले. कारले वेलीवर चढेपर्यंत कोथिंबिरीचे अडीच हजार जुड्या एवढे उत्पादन मिळून गेले. जुडीस १० ते ३० रुपयांपर्यंत दर मिळाला.

कारले पिकात कोबी, फ्लॉवरही घेतला आहे. काढणी अद्याप व्हायची आहे. मागील वर्षी सुमारे पाऊण एकरांत एक हजार ते बाराशे क्रेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन घेतल्याचे नवनाथ सांगतात. त्यास किलोला १० ते ३० रुपयांचा दर मिळाला आहे.

दोन महिन्यांपासून मागणी आणि दर चांगले असून, किलोला ३० ते ५० रुपये दर मिळत आहे. ऑगस्टमध्ये लागवड केल्याचा आर्थिक फायदा होत असल्याचे नवनाथ सांगतात. काकडीचीही लागवड असून उपलब्ध पाण्याचा अंदाज पाहून पुन्हा टोमॅटोची लागवड होणार आहे.

प्रतिकूलतेतही सकारात्मकता

नवनाथ यांच्यासोबत वडील अशोकराव, आई सुमनबाई, पत्नी मीनाक्षी, चुलतभाऊ राहुल आणि काकी सुनंदा पोपट पाठक यांची शेतीत मोठी मदत होते. सर्वांनी कष्टाचा समान भार पेलल्याने शेती सुकर होण्यास मदत झाली आहे. केवळ एक मजूर शेतीसाठी पुरेसे होत असल्याचा अनुभव आहे.

आता दहा गुंठे क्षेत्रावर केळी, शेवगा, पेरू, आंबा, हादगा, मिरची लागवड करून सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली आहे. सर्व प्रतिकूल स्थितीतही संघर्ष व जिद्दीतून शाश्‍वत उत्पन्न देणारी शेती विकसित करण्याबरोबर कुटुंबाचे जीवनमान सुखी करण्याचा प्रयत्न केल्याचे नवनाथ सांगतात.

- नवनाथ पाठक, ९०११५३३३५८, ८६६८७९५१८२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT