Dairy Business Agrowon
यशोगाथा

Dairy Business : तंत्रशुद्ध दुग्धव्यवसायातून सांगलीच्या अल्पभूधारक भिसे कुटुंबाची प्रगती

Milk Dairy : कुंडल (जि. सांगली) येथील भिसे कुटुंबाकडे केवळ एक एकर १० गुंठ्यापर्यंत शेती होती. मात्र अल्पशेतीचे दुखः करीत न बसता या कुटुंबाने मोठ्या उमेदीने, परिश्रमातून व तंत्रशुद्ध दुग्धव्यवसाय आकारास आणला. चाळीस गायींच्या संगोपनातून प्रशस्त घर, ट्रॅक्टर, शेती खरेदी करीत घर व शेतीची उल्लेखनीय प्रगती केली आहे.

Abhijeet Dake

Sangli News Dairy Story : सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील कुंडल हे प्रसिद्ध गाव आहे. हा तालुका ऊस व द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाचे एकरी १०० टन ते त्या पुढे उत्पादन घेण्याचे कसब मिळवले आहे. कुंडलमधील सुरेश भिसे हे अल्पभूधारक शेतकरी. त्यांची केवळ एक एकर १० गुंठे शेती आहे.

आई कमल, वडील राजाराम, पत्नी मनिषा, मुलगी शिवानी, मनीषा, मुलगा राजवर्धन असा त्यांचा परिवार आहे. मुलांचे शिक्षण सुरु आहे. भिसे कुटुंबातील जुन्या पिढ्यांमध्ये शेळीपालनाची परंपरा होती. सुरेश यांनीही मर्यादित शेळीपालन जपले. वडील जवळच्या किर्लोस्कर कंपनीत नोकरी करायचे. घरी किराणा दुकानही होते.

दोन्हीतून कुटुंबाचा आर्थिक आलेख सुरु होता. सुरेश यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘एमआयडीसी’ येथे नोकरी पत्करली. पण त्यात मन लागले नाही. तीन वर्षानंतर नोकरी सोडली. परंतु एक एकर शेतीत करायचे काय असा प्रश्न होताच. जोड म्हणून दुग्धव्यवसाय करण्याचा विचार पक्का केला.

व्यवसायाचा श्रीगणेशा

पारंपारिक शेळीपालनामुळे सुरेश यांना जनावरांचा लळा होताच. र्धार करीत २००० मध्ये एक गाय व टप्प्याटप्प्याने त्यांची खरेदी सुरू केली. सन २००७ मध्ये व्यवसायाला गती आली. त्यातील अनुभव व अभ्यास होऊ लागला. बारकावे लक्षात आले. जवळच्या कै. राजाराम बापू दूध सहकारी संघाकडून कर्ज घेत अजून पाच गायी खरेदी केल्या.

पंजाबमध्ये जातिवंत आणि अधिक दूध देणाऱ्या गायी मिळतात. त्यामुळे तेथे अभ्यासदौरा केला. त्यावेळी लक्षात आले की येथे उत्तम पैदास तंत्र व ‘ब्रीड’ वर चांगले काम झाले आहे. दूध संघ आणि शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसाह्य केले जाते. त्यातून जातिवंत गायींचा शोध सुरु केला.

तंत्रत्रानाचा वापर

सुरेश सांगतात की गायींचा गोठा उभारणी तशी आर्थिक जोखीमच. कारण दुधाचे दर कधी कमी होतात. कधी वाढतात. चारा, पशुखाद्याचे दरही वाढले आहेत. कर्ज काढून गायी खरेदी करण्यापेक्षा गोठ्यातच जातिवंत गायी तयार करण्याचा विचार पंजाबमधील दौऱ्यानंतर केला.

दरम्यान कंपन्या तसेच प्रदर्शनात सिमेनबाबत (वळुची वीर्यमात्रा) माहिती मिळाली. परिसरातील चितळे डेअरीमध्येही हे तंत्रज्ञान वापरले जात असल्याचे समजले. आता तेथून उपलब्ध होत असलेल्या आयातीतील सिमेनचा पशुवैद्यकांमार्फंत वापर होतो. त्यातून जातिवंत गायी पैदास होऊ लागल्या असून त्यांची वाढ चांगली होत आहे.

संकटावर मात

दुग्ध व्यवसाय सुरळीत सुरु असताना अनेक संकटेही आली. पंजाबहून आणलेल्या काही जनावरांचा आकस्मिक मृत्यू झाला. गेल्या महिन्यात वीज पडून तीन गायी दगावल्या. पण हार मानली नाही. नव्या जोमाने पुन्हा उभारण्यासाठी पत्नी मनिषा यांनीही आत्मविश्‍वास व समर्थ साथ दिली.

कोणतेही संकट आले तरी त्यातून मार्ग काढावाच लागतो. त्यात गुंतलो तर यश मिळत नाही ही धारणा पक्की झाली. त्यामुळेच सातत्य, कुटुंबातील सर्वांचे श्रम, नव्या तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास यातून दुग्धव्यवसाय यशस्वी करून त्यात स्थैर्य मिळवणे भिसे कुटुंबाला शक्य झाले आहे.

आजचा दुग्धव्यवसाय दृष्टीक्षेपात

सध्या मोठ्या गायी २२, दुधाळ २२, अन्य पाड्या अशा एकूण ४० गायी. (एचएफ संकरित) गोठ्यात पैदास गायी १०, बंगळूर व सांगोला बाजारातून आणल्या आहेत.

-प्रत्येक गायीच्या कानाला टॅग. पाडी जन्माला आल्यानंतर तिचे नोंद ठेवणे सुरू होते.

-प्रत्येक पाडीची आई, तिला देण्यात येणारे सिमेन, त्याच वळूचे सिमेन पुन्हा पुढील पाडीला दिले जाऊ नये यासाठी प्रत्येकवेळी वेगळ्या वळूच्या सिमेनचा वापर. त्यामुळे दुधाचा दर्जा सुधारला. दूध उत्पादन क्षमता वाढली.

-सकाळी सहा वाजता गोठ्यातील कामांना सुरवात करतात. मिल्किंग यंत्राद्वारे दूध काढणी.

-चारा व्यवस्थापनात पन्नास टक्के चारा घरचा तर बाकीचा विकत. मुरघासही तयार केला जातो. हंगामात कडबा कुट्टीचीही खरेदी.

-दररोज १८० ते २०० लिटर दूध संकलन.

-फॅट ३.९ ते ४, एसएनएफ ८.५ ते ८.८. दर ३८ रुपये प्रति लिटर.

-महिन्याचा निव्वळ नफा- ४० टक्के.

व्यवसायात प्रगती

सुरेश सांगतात की शेती कमी आहे. शेळीपालन करायचे तर वर्षातून दोन वेळाच पैसा हाती पडणार. त्यामुळे दररोज ताजा पैसा देणारा म्हणजे दुग्ध व्यवसायच. गायींची संख्या आटोक्यात ठेवली. कारण देखभाल करणे सोपे होते. वाढता उत्पादन खर्च आणि मिळणारा पैसा याचे गणित जुळविणे सोपे होते.

तसेच दर दहा दिवसांनी दुधाचे बिल हाती येते. वर्षातून ३६ वेळा पैसे खात्यावर येतात. त्यात बोनसही मिळतो. शेणखत विक्रीतूनही अतिरिक्त पैसे मिळतात. याच व्यवसायाच्या जोरावर तीन एकर शेती घेतली आहे. ट्रॅक्टर, व प्रशस्त तीन मजली घर बांधले आहे.

या व्यवसायाने भरभराट झाली. आता अत्याधुनिक तंत्राचा वापर करून नवा गोठा उभारणीचे नियोजन आहे. सध्या या व्यवसायाला शेळीपालनाची जोड देताना मोठ्या सहा शेळी, कोकरे ८ अशी संख्या आहे. वर्षातून दोन वेळा विक्री होते. पैदाशीसाठी जातिवंत बोकडाचे संगोपन होते.

संपर्क - सुरेश भिसे- ७३८७३३५९१३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT