Dairy Business : दुग्ध आणि मुरघास निर्मितीत अग्रेसर ठरलेली चिलेवाडी

Success Story : सातारा जिल्ह्यातील चिलेवाडी गावाने एकजुटीतून पाणीटंचाईवर मात केली. त्याचबरोबर पारंपरिक दुग्ध व्यवसायात सुधारणा केली. गायींची संख्या वाढवली. जवळपास प्रत्येक कुटुंबाने विविध पद्धतीने पध्दतीने मुरघास निर्मिती युनिट सुरू करून चाऱ्याची वर्षभरासाठी शाश्‍वती मिळवली.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

Milk Update : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक फलटण तालुक्यात दुग्धनिर्मिती होते. साहजिकच चाऱ्याची शाश्‍वत सोय म्हणून मुरघास निर्मिती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गावानेही मुरघास निर्मितीत आघाडी घेत आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

गावाची लोकसंख्या सुमारे १६०० लोकसंख्या आहे. चारही बाजूंना डोंगर आहे. पर्जन्यमान कमी असल्यामुळे दहा ते अकरा महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागे. कुटुंबाचा उदरनिर्वाह मजबूत व्हावा यासाठी पूरक म्हणून एक, दोन गायींचे संगोपन करून चिलेवडीचे ग्रामस्थ दुग्ध व्यवसायही करीत.

तरुणांची तयार झाली फौज

मध्यंतरीच्या काळात संतोष ज्ञानदेव शेडगे बँकेतील नोकरी सोडून गावात पोलिस पाटील म्हणून रुजू झाले. त्यांनी तरुणांना संघटित करण्यासाठी ‘सोशल मीडिया’वर ‘डिजिटल ग्राम ग्रुप’ तयार केला. या त्यातून गावाच्या समस्येवर विचार मंथन सुरू झाले.

पाणीटंचाई या मुख्य समस्येवर मात करणे गरजेचे वाटले. संतोष यांच्यासह मंगेश साळुंखे, नीलेश ढोले, ऋषिकेश ढोले, मनोज शेडगे, राजेंद्र साळुंखे, उमेश ढोले, चेतन ढोले, चेतन फाळके, नितीन शेडगे, दयानंद भोसले आदी तरुणांची जणू फौजच तयार झाली.

Dairy Business
Dairy Business : योग्य नियोजनातून दुग्ध व्यवसायात सातत्य

पाणीटंचाईच्या मार्गावर

सन २०१९ मध्ये गावाने पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यादृष्टीने लोकसहभागातून ७०० ते ८०० जणांनी सलग ५० दिवस श्रमदान केले. यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊ लागली. सर्वांच्या कष्टाला अखेर फळ येऊन चांगल्या कामाचे प्रतीक म्हणून या स्पर्धेत कोरेगाव तालुक्यात गावाने प्रथम क्रमांक पटकावला. पुढील खरिपात चांगला पाऊस झाला.

पाण्याचा चांगला संचय झाला. वर्षातून दोन ते तीन पिके घेण्यापर्यंत परिस्थितीत बदल झाला.दरम्यान, भारत फोर्ज, पुणे या कंपनीने गाव दत्तक घेतले. त्यातून सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणात होऊ लागली.

दुग्ध व्यवसायात वृद्धी

पाण्याची उपलब्धता होऊ लागल्यानंतर गावातील शेतकरी पारंपरिक दुग्ध व्यवसाय वाढविण्याचा विचार करू लागले. युवराज व संतोष हे शेडगे बंधू याआधीही आधुनिक तंत्राच्या साह्याने ६५ गायी असलेल्या गोठ्याचे व्यवस्थापन करीत होते. त्यांनी अमूल कंपनीचे शीतकरण केंद्रही सुरू केले. त्यामुळे गावातच दुधाला बाजारपेठ उपलब्ध झाली.

लॉकडाउनच्या काळात शहरात वास्तव्यास असलेले गावातील अनेक तरुण घरी परतले. त्यांना हा व्यवसाय फायदेशीर वाटून ते त्याकडे वळले.

भांडवलाची कमतरता असलेल्यांना संतोष शेडगे यांनी स्वतःच्या डेअरीचे हमीपत्र देऊन कर्जपुरवठा होण्यास साह्य केले. अण्णासाहेब पाटील महामंडळ व बँक ऑफ महाराष्ट्र, किन्हई शाखेतून अर्थसाह्य झाले. या काळात शेडगे यांनी दुग्धोत्पादक तरुणांना सोबत घेऊन उच्च वंशावळीच्या सुमारे १७८ एचएफ संकरित जातीच्या गायी आणल्या.

‘सोशल मीडियावरील इंडियन डेअरी फार्म असोसिएशन तसेच व्हॉट्‍सॲपच्या माध्यमातून गावातील तरुण नवीन तंत्रज्ञानाबाबत जागरूक होत होते. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या प्रशिक्षणाचे आयोजनही केले जात होते. अशा रीतीने गायींची संख्या व दूध उत्पादनातही वाढ झाली.

मुरघास निर्मिती

एकीकडे दुग्ध व्यवसायात वृद्धी झाली. पण दुसरीकडे चारा प्रश्‍न निर्माण झाला. पशुखाद्यांच्या किमतीही वाढल्या होत्या. यावर पर्याय म्हणून शेडगे बंधूंनी मुरघास निर्मिती सूरू केली. चारा दर्जेदार व वर्षभर वापरता येत असल्याने २०२० पासून अनेक शेतकरी त्याकडे वळले. सध्या गावातील प्रत्येक दुग्धोत्पादक शेतकरी बॅग किंवा बंकर वा खड्डा पद्धतीने मुरघास निर्मिती करताना दिसत आहे.

शेडगे बंधूंनी नामांकित कंपनीचा चारा ‘कटर’ घेतला आहे. अन्य शेतकऱ्यांनाही ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याचा फायदा दिला जात आहे. थोडक्यात, गावाने एकजुटीतून पाणीटंचाईवर मात केली. दुग्ध व्यवसाय मुख्य आर्थिक स्रोत झाला आणि मुरघास निर्मितीतून चाऱ्याची शाश्‍वत सोय केली.

चिलेवाडीची मुरघास निर्मितीत प्रगती

-गावात एकूण ८०० च्या संख्येने गायींची संख्या असावी.

-चाऱ्यासाठी सर्वाधिक मका पिकाची लागवड.

-१८० ते २०० मुरघास युनिट्स. प्रति २५ ते १५० टन प्रति युनिट क्षमता. बॅग, बंकर व खड्डा पद्धतींचा समावेश.

- गेल्या वर्षी सुमारे ४५००, तर या वर्षी ५५०० टन मुरघास निर्मिती.

-एकसमान, दर्जेदार चाऱ्यामुळे दुग्ध उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ. पशुखाद्यावरील ३० टक्के खर्चात कपात. वर्षभर साठवता येत असल्याने दुग्ध व्यवसाय शाश्‍वत होण्यास मदत.

- कडब्याच्या दरातील तुलनेत किलोमागे १९ रुपयांची बचत. कडब्याची पेंडी साडे बावीस रुपये, तर मुरघास अवघ्या तीन रुपये ७० पैसे प्रति किलो दरात उपलब्ध होतो.

संपर्क : संतोष शेडगे, ७०५७५७१३७७

Dairy Business
Dairy Business : अल्पभूधारक शेतीला मिळाला दुग्धोत्पादने निर्मितीचा आधार
माझ्याकडे १३ गायी आहेत. दररोज सुमारे १०० ते १२० लिटर दूध संकलन होते. त्यांच्यासाठी मका व मुरघास निर्मितीतून बारमाही दर्जेदार चारा मिळत आहे. गावातच दुधाला बाजारपेठ उपलब्ध झाल्याने व्यवसाय फायदेशीर झाला आहे.
मंगेश साळुंखे, दुग्धोत्पादक शेतकरी
पूर्वी शेती असूनही केवळ पाण्याअभावी नोकरीसाठी शहरात जावे लागे. आता गावातील तरुण, महिला व सर्वच गावकरी एकत्र आल्याने गाव पाणीटंचाई मुक्त करणे शक्य झाले दुग्ध व्यवसायातून आर्थिक सक्षम होता आले. मुरघासाची जोड मिळाल्याने कमी खर्चात दुग्ध व्यवसाय करता येत आहे.
संतोष शेडगे, पोलिस पाटील, चिलेवाडी
गावातील शेतकऱ्यांना एकाहून अधिक पिके घेणे शक्य झाले आहे. तरुण वर्ग दुग्ध व्यवसायात उतरला असून, त्यांना चांगले अर्थार्जन होत आहे.
वैशाली गायकवाड, सरपंच, चिलेवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com