Incense Stick Manufacturing Agrowon
यशोगाथा

Incense Stick Manufacturing : उदबत्ती निर्मितीतून दरवळला प्रगतीचा सुगंध

Incense Stick Business : परभणी जिल्ह्यातील वालूर (ता. सेलू) येथील सखूबाई पाथरकर यांनी घर व शेतीला आधार म्हणून उदबत्ती व धूपकांडी निर्मितीचा गृह उद्योग सुरू केला. त्यातून चांगल्या प्रकारे स्वयंरोजगार तयार केला. आज जनाई ब्रॅण्ड उदबत्ती निर्मितीतून प्रगतीचा सुगंध त्यांच्या कुटुंबात दरवळत आहे.

माणिक रासवे

Success Story : परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातील वालूर हे प्राचीन वारसा असलेले बाजारपेठेचे प्रमुख ठिकाण आहे. गावात तुकाराम पाथरकर यांचे घर असून, त्यांच्या पत्नी सखूबाई यांचे नाव आता उदबत्ती व धूपकांडी निर्मिती गृह उद्योगात लोकप्रिय झाले आहे.

सखूबाईंचे हयातनगर (ता. वसमत, जि. हिंगोली) येथे माहेर आहे. त्या कला शाखेच्या पदवीधर आहेत. सन २०१७ मध्ये त्यांचा तुकाराम यांच्यासोबत विवाह झाला. तुकाराम यांनीही कला शाखेतील पदवीनंतर डी. एड. पदविका अभ्यासक्रम केला. आई, वडील व तीन भाऊ असे त्यांचे एकत्रित कुटुंब असून, १० एकर जमीन आहे. भाजीपाला पिकांसोबत हंगामी पिके ते घेतात.

बचत गटाद्वारे आर्थिक हातभार

घरच्या शेतीला व प्रपंचाला अजून आर्थिक हातभार लागावा म्हणून सखूबाईंनी पुढाकार घेतला. सन २०२० च्या दरम्यान गावातील १० महिला एकत्र आल्या. त्यांनी उमेद नगरेश्‍वर स्वयंसाह्यता महिला बचत गट स्थापन केला.

अध्यक्षा सखूबाई तर सचिव उमा जिवणे झाल्या. सदस्यांमध्ये अनुराधा सोनवणे, सुनंदा पाथरकर, शीतल पाथरकर, लक्ष्मी सोनवणे, गंगासागर पांढरे, आश्‍विनी आगजाळ, कलावंती सोनवणे यांचा समावेश झाला.

बँकेने पुढे जाऊन गटाला एक लाख रुपये कर्ज दिले. दरम्यान, सखूबाई गावातील महिला स्वयंसाह्यता गटाच्या ग्रामसंघाच्या अध्यक्ष झाल्या. त्यामुळे उमेद गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनुराधा सोनवणे यांच्यावर आली.

उदबत्ती निर्मिती उद्योग

बचत गटाच्या माध्यमातून सखूबाई यांच्यात उद्योजकवृत्ती तयार झाली होती. शेतीला व घरच्या प्रपंचाला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी घरगुती उद्योग सुरू करण्याचा विचार केला. गटाला बँकेने दिलेल्या कर्जातून पाथरकर यांच्या वाट्याला एक लाख रुपये आले होते.

त्या आधारे सखूबाई आणि तुकाराम यांनी कुटुंबीयांशी विचार विनिमय करून उदबत्ती उद्योग सुरू करण्याचे पक्के केले. कमी भांडवलामध्ये अधिक नफा मिळवून देणारा हा गृह उद्योग त्यांना वाटला.

घरकामे करून त्याकडे लक्ष देणे शक्य होते. ‘तेजस मॅन्युफॅक्चरर्स ॲण्ड उमेद नगरेश्‍वर या नावाने उद्योगाची नोंदणी केली. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उदबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. वीस हजार रुपये भांडवल गुंतवणूक करून २०२० मध्ये वालूर येथील आपल्या घरातच उद्योग सुरू केला.

गुणवत्तापूर्ण उत्पादन

सुरुवातीला नागपूर येथून तयार (रेडिमेड) उदबत्त्या आणून त्यांचे घरी सुगंधीकरण व पॅकिंग करून विक्री सुरू केली. वर्षाकाठी ४० हजार रुपये उत्पन्न मिळायचे. हळूहळू उद्योगातील खाचखळगे माहीत होऊ लागले.

सन २०२२ मध्ये स्वतः उदबत्ती निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाशिक येथून दीड लाख रुपये किमतीचे यंत्र खरेदी केले. त्याद्वारे दिवसभरात ४० किलोपर्यंत उदबत्यांची निर्मिती करणे शक्य झाले. उदबत्ती तयार झाल्यानंतर उन्हात आठ तास तास तर सावलीत १० तास वाळविल्या जातात. पाचशे ग्रॅम वजनाचे बंडल बांधून विशिष्ट सुगंधी द्रव्यांमध्ये प्रक्रिया केली जाते.

विविध सुगंधाच्या उदबत्त्या

सखूबाई यांच्याकडे सुमारे १८ प्रकारच्या सुगंधी उदबत्त्या तयार केल्या जातात. त्यात मोगरा, कस्तुरी, केवडा, चंदन, गोल्डन टच, सोनचाफा, गुलाब, नाईट पोलो आदी प्रकार आहेत. उदबत्तीचे काडी व लोभान (जाड) हे दोन प्रकार आहेत.

दोन्ही आठ इंच लांबीच्या आहेत. निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल नाशिक येथून, सुगंधी द्रव्ये कोलकाता, उज्जैन येथून, तर पॅकिंग घटक हैदराबाद येथून खरेदी केले जातात. प्लॅस्टिक बॉटल व पाऊच पॅकिंगमधून विक्री होते.

लहान बॉटल (१०० ग्रॅम) ६० रुपये, मोठी बॉटल (२२० ग्रॅम) १०० रुपये, पॉली पाउच (३० ग्रॅम) १० रुपये, तर १२० ते २५० ग्रॅम वजन पाउच १०० रुपये अशा किमती आहेत. जनाई ब्रॅण्ड तयार केला आहे.

देशी गायीच्या शेणापासून धूपकांडी

उदबत्तीसोबत धूप कांड्यांनाही मागणी आहे ही बाब लक्षात घेऊन त्याचीही निर्मिती सुरू केली आहे.त्यासाठी घरच्या दोन देशी गायींचे शेण उपलब्ध होते. त्यावर सुगंधी द्रव्यांची प्रक्रिया करून साच्याच्या साह्याने कांड्या तयार करून त्या वाळवल्या जातात. ३० नगाचे पॅकिंगची किंमत ५० रुपये ठेवली आहे.

विक्री व्यवस्था

वालूर गावामध्ये उदबत्ती, धूपकांडी यांची विक्री होते. गावातील आठवडी बाजारातही स्टॉल उभा केला जातो. सेलू, परभणी, बोरी आदी बाजारपेठांतही मागणी आहे. मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शन, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच जिल्हास्तरीय प्रदर्शनात उदबत्ती विक्रीचे स्टॉल पाथरकर दांपत्य सादर करते. वर्षाकाठी तीन ते चार लाख रुपयांची उलाढाल होते. वीस टक्के नफा मिळतो.

आम्ही पती-पत्नी एकदिलाने सर्व निर्णय घेतो. उद्योगात गुंतवणूक करून जोखीम पत्करावी लागते. बाजारपेठेतील मागणीनुसार उत्पादन करून पुरवठा करतो. त्यामुळेच गृह उद्योगाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कुटुंबाला आर्थिक उत्पन्नाचा मोठा आधार तयार झाला आहे.
सखूबाई पाथरकर, ७५८८१५८५५०

कुटुंबीयांची खंबीर साथ

सखूबाईंना पती तुकाराम यांची खंबीर साथ आहे. तुकाराम यांनी शासकीय नोकरीसाठी विविध स्पर्धा परिक्षा दिल्या. अनेक परीक्षेत काही टप्प्यांपर्यंत यशही मिळाले. काही काळ खासगी बँकेत नोकरी केली. शेळीपालन, कुक्कुटपालन केले.

परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. परंतु सहचरणी सखूबाई यांच्या सोबत उदबत्ती गृह उद्योगात मात्र त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तुकाराम कच्चा माल खरेदी, विक्री व्यवस्थापन बघतात. सखूबाई निर्मिती- उत्पादनाची धुरा सांभाळतात. त्यात सासू सुनंदाबाई, जाऊ शीतल पाथरकर या मदत करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT