Spices Industry Agrowon
यशोगाथा

Spices Industry : घरगुती मसाले उद्योगाने दाखवली यशाची वाट

मनी जिद्द, कष्टांची तयारी, बाजारपेठांचा अभ्यास, गुणवत्ता आणि व्यावसायिक वृत्ती या बाबींना प्राधान्य दिल्यास यशस्वी उद्योजक होता येते. इंझोरी (जि. वाशीम) येथील गोपाली आणि मनोज या भूमिहीन दिघडे दांपत्याने हे सिद्ध केले आहे.

 गोपाल हागे

Rural Success Story : ग्रामीण भागात रोजगार, उद्योगांची वानवा असते. त्यातही वाशीमसारख्या जिल्ह्यातील मानोरा तालुका हा विकासाच्या क्षेत्रात तुलनेने पिछाडीवर आहे. तालुक्यातील इंझोरी येथे गोपाली आणि मनोज हे भूमिहीन दिघडे दांपत्य राहते. गोपाली यांनी गृह अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे.

लग्नानंतर कुटुंबाकडे शेती नसल्याने त्यांना मोलमजुरी करावी लागली. शिक्षणाचा उपयोग करीत प्राथमिक शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्या केल्या. शिवणकामाचे वर्ग घेतले. यातून जेमतेम मिळकत व्हायची. पती मनोज कारंजालाड येथे कापडाच्या दुकानात नोकरी करायचे.

त्यातून ग्राहकांसोबत संवाद साधण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती भक्कम करण्यासाठी आपण एखादा उद्योग सुरू करावा असे दांपत्याने ठरवले.

त्यांच्या पाठीशी सासरे राजकुमार उभे राहिले. परिसरातील बाजारपेठा, उत्पादनांची मागणी यांचा अभ्यास केल्यानंतर मसाला उत्पादनांना चांगली मागणी असल्याचे लक्षात आले.

मसाले उद्योगाची वाटचाल

उद्योगाची दिशा पक्की केल्यानंतर सन २०१७ च्या दरम्यान उभारणी सुरू झाली. सुरुवातीला ३५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. केवळ अर्धा-अर्धा किलो साहित्य घेतले थोड्या पैशातून गिरणी (चक्की) खरेदी केली.

गरम मसाला, चहा मसाला, सांभार मसाला, हळद, तिखट, धणे पावडर बनविण्यास सुरुवात केली. पॅकिंग ‘मॅन्यूअली’ केले जायचे. घरगुती व अस्सल चवीच्या या मसल्यांना हळूहळू मागणी वाढू लागली. मग ग्राहकांच्या मागणीनुसार मुखवास म्हणून भाजलेली बडीशेप, भाजलेले जवस व भाजलेला ओवा आदी उत्पादने तयार होऊ लागली.

मग कारळा, जवस, तीळ- शेंगदाणा, कुसला (जाड मिरचीवर आधारित) आदींपासून चटण्या बनविण्यास सुरुवात केली. सन २०१९ मध्ये उत्पादनांचे ‘गोपी मसाले’ नामकरण केले. लागणारा काही कच्चा माल शेतकऱ्यांकडून तर काही बाजारातून खरेदी केला जातो. शेतकऱ्यांशी संपर्क साधून वर्षभरासाठी लागेल एवढी साठवणूक केली जाते.

यंत्रांची खरेदी

कोरोना- लॉकडाउन काळात सर्व उद्योगांवर परिणाम झाला. हीच संधी मानून दिघडे यांनी ग्राहकांना घरपोच सेवा देत व्यवसायाचे स्वरूप बदलले. आठवडे बाजारात स्टॉल उभारून थेट विक्री सुरू केली. यातून पैशांबरोबर उद्योगासाठी लागणारा आत्मविश्‍वासही वाढत गेला.

बचतीतून जमवलेल्या पैशांमधून भाजणी यंत्र तयार करून घेतले. त्यामुळे अधिक प्रमाणात माल तयार होऊ लागला.पॅकिंग व त्यास लेबल चिकटविण्यात वेळ जात होता.

दरम्यान, मालेगाव कृषी विभागात कार्यरत वर्षा वाडवे यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाशी संबंधित पंतप्रधान योजनेबद्दल गोपाली यांना माहिती दिली. त्यानंतर स्टेट बँकेत कर्ज प्रकरण दाखल केले. प्रस्तावाची खातरजमा झाल्यानंतर चार लाखांचे कर्ज मंजूर झाले. त्यातून स्वयंचलित पॅकिंग व सीलिंग यंत्र खरेदी केले. त्याचबरोबर

करडा कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान शाखेच्या तज्ज्ञ शुभांगी वाटाणे यांनीही गोपाली यांना प्रशिक्षण दिले. सातत्याने संपर्कात राहून मालाची पौष्टिकता, त्यातील पोषणमूल्ये वाढवणे याबाबत मार्गदर्शन केले.

गोपी मसाले झाले लोकप्रिय

यांत्रिक व आर्थिक भांडवल क्षमता वाढल्यानंतर आता कमी वेळेत अधिक माल तयार होऊ लागला आहे. मालाच्या विक्रीसाठी कमिशन आधारित चार ‘सेल्समन’ ठेवले आहेत. मानोरा, कारंजा, मूर्तिजापूर, मंगरूळपीर तालुक्यांतील ५० ते ६० गावांमध्ये ते घरोघरी जाऊन उत्पादनांची विक्री करतात.

हॉटेल व्यावसायिकांना मनोज माल पुरवतात. शिवाय आठवडी बाजारातही ते दुकान थाटतात. आज खेड्यांमधून गोपी मसाले लोकप्रिय झाले आहेत.

प्रातिनिधिक उदाहरण सांगायचे तर महिन्याला ७० ते ८० किलो मिरची पावडर, ४० किलो हळदीची, २५ किलो धने पावडर, १० किलो चहा मसाला, एक क्विंटल भाजलेला ओवा, २५ किलो बडीशेप, ३० किलो जवस, २५ किलोपर्यंत कारळा, जवस चटणी यांची विक्री होते.

अन्य पदार्थांची जोड

मूगवडी, खारोड्या, पापड, जिरा, खोबरा, ड्रायफ्रूट आदींसह ग्राहकांना हंगामानुसार लागणारे पदार्थ उदा. दिवाळीच्या काळात फराळ, लोणची, वड्या आदी उत्पादनेही उपलब्ध केली जातात. प्रदर्शनांमधूनही त्यांची विक्री होते.

आश्‍वासक उलाढाल

आज उद्योगात सुमारे पंधरा उत्पादने तयार केली जातात. सुमारे १२ महिला व आठ पुरुषांना पूर्णवेळ रोजगार उपलब्ध केला आहे. महिन्याला दीड ते दोन लाख रुपये, तर वर्षाला २४ लाख रुपयांपर्यंत उलाढालीची मजल मारली आहे.

एकूण उत्पन्नात २० टक्क्यापर्यंत नफा मिळतो. प्रामाणिकता, गुणवत्ता व सचोटी या बळांवर उद्योग विस्तारला. त्याच बळावर नवे घर बांधले, उद्योगासाठी प्लॉट घेतला. मुलांचे शिक्षण सुरू आहे. टप्प्याटप्प्याने वृद्धी सुरू असल्याचे गोपाली सांगतात.

गोपाली दिघडे, ९६३७०४३४२८, ८३८०९३१२५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT