Appleberry
Appleberry  Agrowon
यशोगाथा

Appleberry : उसाला पर्यायी ॲपलबेरचा निर्णय ठरवला सार्थ

Team Agrowon

सूर्यकांत नेटके

नगर जिल्ह्यात (Nagar District) श्रीरामपूर- नेवासा रस्त्यावरील टाकळीभान हे सुमारे पंचवीस हजार लोकवस्तीचे गाव आहे. भंडारदरा, निळवंडे धरणाच्या (Bhandardara Dam) पाण्याचा परिसराला लाभ मिळतो. त्यामुळे हा ऊसपट्टा (sugarcane) म्हणूनच ओळखला जातो.

उसाला पर्यायी शोध

गावातील दीपक भगवान कांबळे हे अल्पभूधारक शेतकरी. वडिलोपार्जित साडेचार एकर शेती. बारावीनंतर कृषी पदविका त्यांनी घेतली. चार वर्षे कृषी रसायन क्षेत्रातील कंपनीत विपणन विभागात नोकरी केली. त्यानंतर नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीतच लक्ष घातले. पूर्वी त्यांच्याकडे ऊसपीक होते.

मात्र दीर्घ कालावधीच्या या पिकातून अर्थकारण साधत नव्हते. त्याला पर्यायी शोध सुरू होता. बारा वर्षांपूर्वी दोन एकरांत डाळिंब व उर्वरित क्षेत्रावर गहू, कांदा आदी पिके होती. तेलकट डाग व मर रोग तसेच खर्च परवडणारा न राहिल्याने २०१४ मध्ये डाळिंब बाग काढली. त्याच काळात सलग तीन वर्षे दुष्काळही होता.

ॲपलबेरची निवड

नोकरीत फिरती असल्याने शेतावर जाणे येणे व्हायचे. अशात पुनदगाव (ता. नेवासा) येथील हसनभाई शेख यांच्याकडील ॲपलबेरची लागवड पाहण्यात आली. उसाला लागणारे पाणी, खर्च, पीक कालावधी, त्या तुलनेत मिळणारे उत्पन्न यांच्याशी तुलना करता हे पीक अधिक आश्‍वासक वाटले.

बाजारपेठ, मागणी, दर आदींबाबत अधिक अभ्यास करून अखेर २०१६ मध्ये दोन एकरांवर हिरव्या ॲपलबेरची लागवड करण्याचे धाडस केले. त्यासाठी येवला (नाशिक) भागातून रोपे आणली. हलकी, मुरमाड जमीन, चांगले व्यवस्थापन व पिकात सातत्य यातून हे पीक यशस्वी होत गेले. बांधावर व्यापारी येऊ लागले. राहाता भागातील व्यापारी त्याची विक्री परराज्यांत करू लागले.

या पिकातील आत्मविश्‍वास वाढल्यानंतर अजून दोन एकरांत विस्तार करायचे ठरवले. मात्र रेड ॲपलबेरला हिरव्या फळापेक्षा बाजारात अधिक मागणी असल्याचे ओळखून त्याला पसंती दिली. बोधेगाव (ता. शेवगाव) येथून रोपे आणली. आज ऊस पट्ट्यातील ॲपबलबेरचे यशस्वी उत्पादक म्हणून दीपक यांनी परिसरात ओळख निर्माण केली आहे.

ॲपलबेर शेती- ठळक बाबी

१) आजमितीला चार एकर क्षेत्रावर लागवड.

२) १८ बाय १० फूट अंतरावर लागवड. एकरी अंदाजे २४० झाडे.

३) मार्चमध्ये छाटणी. डिसेंबर ते फेब्रुवारी काढणी हंगाम.

४) फळतोडणीनंतर मार्चपर्यंत तीन महिने झाडांना विश्रांतीसाठी पाणी देणे बंद करतात.

५) शेळ्या-मेंढ्यांना झाडाचा पाला वापरात येत असल्याने मेंढपाळ छाटणी करून देतात. अशा प्रकारे छाटणीचा दोघांनाही फायदा होतो.

६) छाटणीनंतर प्रति झाड २० किलो शेणखत दरवर्षी. गरजेनुसार त्याची शेतकऱ्यांकडून खरेदी.

७) छाटणीनंतर दीड महिन्याने विरळणी करून प्रति झाडाला चार फांद्या ठेवतात. अन्य फांद्या काढून टाकतात. झाडाचा गरजेपेक्षा जास्त विस्तार होऊ नये व फळधारणा अधिक व्हावी यासाठी फांद्यांची योग्यवेळी शेंडेखुडणी.

८) भुरी रोग, फळ पोखरणारी अळी यांना रोखण्यासाठी कीडनाशकांचा वापर.

९) अधिक फळधारणा व्हावी यासाठी फुलोरा ते फळधारणा होईपर्यंत संजीवकांच्या फवारण्या.

१०) बोरे लगडल्यानंतर फांद्या मोडण्याची भीती असते. अशा वेळी झाडांना बांबूचा आधार दिला जातो.

११) पाण्याची मुबलकता असूनही दहा वर्षांपासून ठिबकच वापर.

उत्पादन व अर्थकारण

ॲपलबेरची पहिली लागवड फेब्रुवारीत सात वर्षांपूर्वी केली होती. अवघ्या नऊ महिन्यांत पहिले उत्पादन मिळाले. दिल्ली बाजारपेठेत मालाची विक्री झाली. आज हिरव्या फळांचे एकरी १७ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळत आहे. यंदा आतापर्यंत ३३ टन विक्री केली असून, २० ते २२ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. सात वर्षांत किमान दर सात रुपये तर कमाल दर ३० रुपये मिळाला आहे. रेड ॲपलबेरचे पहिल्या वर्षी एकरी १३ टन, तर दुसऱ्या वर्षी १७ टन उत्पादन मिळाले. यंदाचे तिसरे पीक आहे.

दर हिरव्या फळांपेक्षा जास्त म्हणजे किलोला ३० रुपये प्रति किलोपर्यंत मिळाला आहे. एकरी खर्च ७० हजार रुपयांपर्यंत येतो. उसापेक्षा या पिकातून चांगले उत्पन्न मिळत असून, घेतलेल्या निर्णयाबाबत समाधानी असल्याचे दीपक सांगतात. आर्थिक प्रगती साधताना शेतीच्या आधारावर घराचे बांधकाम केले. ट्रॅक्टर घेतला.

कुटुंबाचे श्रम व रोजगारनिर्मितीही

दीपक यांना शेतीत वडील भगवान व पत्नी वर्षा यांची मोठी साथ आहे. आई वयोमानामुळे थकली असली तरी तिचे मार्गदर्शन असते. बोर तोडणीच्या काळात दहा ते पंधरा मजुरांची गरज भासते. यंदा विदर्भातील १० मजुरांची मदत घेतली असून, तीन महिने त्यांना रोजगार मिळत आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही कुटुंबाने केली आहे.

स्टार फ्रूटची लागवड प्रयोग करण्याची धडपड ठेवणाऱ्या दीपक यांनी अर्धा एकरांत स्टार फ्रूट या फळपिकाच्या १४० झाडांची लागवड केली आहे. या भागात हा प्रयोग करणारे ते पहिलेच शेतकरी असावेत. ॲपलबेरही त्यांनी पहिल्यांदाच या भागात लावले होते. त्यांचे यशस्वी पीक पाहून अन्य काही शेतकऱ्यांनीही लागवडीचे अनुकरण केले.
दीपक कांबळे, ९८२३९०३७५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

Commodity Market : हळद, मुगाचे भाव वधारले

SCROLL FOR NEXT