मुंबई : राज्यातील १३ सहकारी साखर कारखाने (Cooperative Sugar Mills) आणि अन्य सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी देण्यात येणारी ९६ कोटी ५३ लाख रुपयांची रक्कम संबंधित जिल्हा बँकांकडे वर्ग करण्यात येणार आहे. थकहमी () देण्यात आलेले सहकारी साखर कारखाने (Sugar Mills) विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत.
ही रक्कम वर्ग करण्यापूर्वी संबंधित संस्थांना सरकारला हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. तसेच याआधीच सरकारने जाहीर केल्याप्रमाणे यापुढे कुठल्याही कारखान्याला थकहमी मिळणार नाही. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेची तीन कोटी तीन हजार, नांदेड जिल्हा सहकारी बँकेची २५ कोटी तीन हजार, तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६८ कोटी ४७ लाख रुपयांची थकहमी रक्कम आहे.
राज्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेने दिलेली थकहमीपोटी सरकारने देय असलेली रक्कम निश्चित करण्यासाठी २२ जुलै २०२१ रोजी वित्त विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला २२ ऑक्टोबर रोजी सादर केला.
या समितीने थकहमीची रक्कम वर्ग करण्यासाठी काही अटी आणि शर्थी निश्चित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेला त्याबाबतचे निर्देश दिले आहे. देवरा समितीने १२ सहकारी साखर कारखाने आणि एक खांडसरी सहकारी संस्थेची थकहमी रक्कम वर्ग करण्यास मान्यता दिली असली, तरी त्यास काही अटीही घातल्या आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतरच थकहमीची रक्कम बँकेस देण्यात येणार आहे.
थकहमी रक्कम वर्ग करण्यासाठी अटी
- थकहमीची रक्कम बँकेस मिळण्यासाठी विविध न्यायालयांमध्ये दाखल केलेले दावे, याचिका मागे घ्यावे लागणार आहेत.
- थकहमी रकमेबाबत भविष्यात कुठलाही वाद होणार नाही याबाबत हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे.
- सरकारकडून हमीपोटी रक्कम प्राप्त झाल्यानंतर हमीवरील कर्जाचे सर्व खाते निरंक झाल्याचा दाखला सरकारला सादर करावा लागणार आहे.
- आजारी सहकारी साखर कारखाने किंवा संस्थांच्या कर्ज वसुलीसाठी त्यांच्या मालमत्तांची पुनर्रचना करून संवर्धन किंवा विल्हेवाट लावण्यासाठीचे प्रस्ताव महाएआरसी लिमिटेड या कंपनीपुढे सादर करण्यात येणार आहेत.
- भविष्यात सरकारी थकहमीपोयी कोणत्याही साखर कारखान्यास थकहमी देण्यात येणार नाही.
थकहमी मिळालेल्या बँका आणि कारखाने
१) उस्मानाबाद जिल्हा बँक : नरसिंह सहकारी साखर कारखान, इंदापूर, उस्मानाबाद (३ कोटी ३ हजार)
२) नांदेड जिल्हा बँक :
- कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना, गांधीनगर (१९ कोटी ८५ लाख)
- गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना, शंकरनगर, बिलोली (४ कोटी ५७ लाख)
- संत तुकाराम सहकारी खांडसरी उत्पादक संस्था, उमरी (६१ लाख)
३) मुंबई जिल्हा बँक
- कोंडेश्वर सहकारी साखर कारखाना, फूलगाव, अमरावती (१० कोटी ७९)
- शिवशक्ती आदिवासी मागासवर्गीय सहकारी साखर कारखाना, सुताजपूर, शेगाव (९ कोटी ९९ लाख)
- सुधाकरराव नाईक (पुष्पावती) सहकारी साखर कारखाना, पुसद, यवतमाळ (१ कोटी २८ लाख)
- अंबादेवी सहकारी साखर कारखाना, अंजनगाव- सुरजी, अमरावती (१२ कोटी, ५७ लाख)
- श्रीसंत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना, एदलाबाद, जळगाव (४ कोटी ९५ लाख)
- बालाघाट शेतकरी सहकारी साखर कारखाना , उजनी, लातूर (७ कोटी सहा हजार)
- नृसिंह सहकारी साखर कारखाना, लाहगाव, परभणी (तीन कोटी ३१ लाख)
- जय अंबिका सहकारी साखर कारखाना, कुंटूर, नांदेड (७ कोटी ८७ लाख)
- राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना, हेटी-सुरळा, नागपूर (१० कोटी ५५ लाख)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.