Shevga Farming News : ‘आयटी’ क्षेत्रातील अनेक जण आज शेतीकडे करिअर म्हणून वळले आहेत. त्यातील अनेक जण यशस्वी होऊन त्यात रमले देखील आहेत. नांदेड शहराजवळील पावडेवाडी येथील मंजूषा व गुलाबराव या पावडे दांपत्याबाबत हेच म्हणता येईल.
दोघेही ‘आयटी’ क्षेत्रातील अभियंते आहेत. दोघांनी पुणे व हैदराबाद येथे आयटी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये सुमारे १५ वर्षे नोकरी केली. चांगले पगार होते.
गुलाबराव याबाबत सांगतात, की महाशहरात असताना शेतीची आवड खुणावत होती. त्याचवेळी वडिलांना अर्धांगवायू झाला असल्याने त्यांना गावी आधार देणे गरजेचे होते. सर्व विचारांती शेतीतच करिअर करायचे असा विचार पक्का झाला.
शेवगा शेतीला प्रारंभ
घरची सुमारे दहा एकर शेती आहे. त्यानुसार सन २०१८ पासून पावडे दांपत्याने शेतीचे नियोजन करण्यास सुरुवात केली. शेवगा हे मुख्य पीक ठेवले आहे. हैदराबाद येथे वास्तव्यास असताना तेथे शेवगा शेतीचे कल्चर पाहण्यात आले.
शेवग्याच्या पाल्याची, अर्थात मोरिंगा पावडरची महती ध्यानात आली होती. कंपनीत नोकरीला असताना अनेक सहकारी अधिक किंमत मोजून ही पावडर खरेदी करीत असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळेच या पिकावर भर दिला.
ओडीसी तीन हे वाण सुरुवातीला तीन एकरांत घेतले. अलीकडे नवी लागवड धरून एकूण नऊ एकरांत शेवगा आहे. शेतीचा अनुभव नसला तरी ॲग्रोवन मार्गदर्शक म्हणून धावून आला.
यातील शेवगा लागवडीचे लेख, यशोगाथा यातून माहिती घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण माहितीचे संकलन वहीत उतरून घेतले. शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देत व्यवस्थापन जाणून घेतले. पती पत्नी दोघेही शेतात राबू लागले. दोन ओळींत नऊ फूट अंतरावर लागवड केली आहे.
एका ठिकाणी चार रोपे लावण्याची पद्धत अवलंबिली आहे. शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करताना घरच्या सुमारे सात ते आठ जनावरांच्या शेण-गोमूत्रापासून जिवामृत तयार केले जाते. व्हर्मिवॉशचा वापर होतो. उत्पादनाचे तंत्र हळूहळू अवगत होऊ लागले आहे.
पाल्यापासून पावडर निर्मिती
गुलाबराव सांगतात, की शेवगा उत्पादन तर हाती येऊ लागले. पण मग त्यापुढे जाऊन पाल्यापासून पावडर व तीही सेंद्रिय पद्धतीने तयार करण्याचे दांपत्याने ठरवले. मंजूषा यंनी डिजिटल मार्केटिंग व ‘आयात- निर्यात’ अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. त्यामुळे पावडर विक्री करण्याचा मार्ग सुकर झाला.
आता शेवगा शेतीचा अनुभव सुमारे चार वर्षांचा झाला असून, एक वर्षापासून पावडर निर्मितीचा अनुभवही त्यात जमा झाला आहे.
प्रक्रिया पद्धत
लागवडीनंतर सुमारे तीन महिन्यांनंतर पावडर बनविण्यायोग्य पाला उपलब्ध होऊ लागतो. पाल्याची तोडणी मजूरांसह स्वतः पावडे दांपत्य करते. सकाळी कोवळ्या उन्हात ही तोडणी झाल्यानंतर पाला प्रक्रियेसाठी घेतला जातो.
प्रति दिवस सुमारे दोन क्विंटल पाला उपलब्ध होतो. पाला तोडणीनंतर मीठ व कडुनिंबाची पाने पाण्यात टाकून त्याचे द्रावण तयार केले जाते. शेवग्याचा पाला त्यात बुडवून तो स्वच्छ केला जातो. त्यानंतर दोन ते तीन दिवस सावलीत वाळवला जातो.
त्यापासून पावडर बनविण्यासाठी ‘मिनी ग्राइंडर’चा वापर केला जातो. त्याद्वारे २०० ते ३०० आरपीएम गती ठेवून पावडर तयार केल्यास त्यातील सत्त्व टिकून राहते, असे मंजूषा सांगतात.
पावडर विक्री व्यवस्था
ओल्या शेवग्याच्या प्रति क्विंटल पाल्यापासून दहा किलो यानुसार मागणीचा अंदाज घेऊन दररोज वीस किलोपर्यंत पावडर तयार होते. अडीचशे, पाचशे ग्रॅम तसेच एक किलो वजनाचे पॅकिंग केले जाते. एक हजार रुपये प्रति किलो दराने व श्री ऑरगॅनिक मोरिंगा एक्स्पोर्ट फूड या ब्रॅण्डने विक्री होते.
मधुमेह तसेच विविध विकारांवर ही पावडर गुणकारी असल्याने डॉक्टरांकडून त्यास अधिक मागणी असल्याचे गुलाबराव सांगतात. त्याचबरोबर शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंतही या उत्पादनाचा प्रचार केला आहे. पुढील काळात निर्यात करण्यावरही भर असल्यानेच सेंद्रिय पद्धतीवर भर दिला आहे.
अलीकडेच पुणे येथील एका ग्राहकाकडून निर्यातीच्या उद्देशाने ५० किलोची मागणी केली. त्याने ती पुढे किलोला ३८०० रुपये दराने विकली असे समजल्याचे गुलाबराव यांनी सांगितले. निर्यात यशस्वी करायची तर क्षेत्र अधिक प्रमाणात लागेल. त्यादृष्टीने पुढील प्रयत्न आहेत.
शेतकऱ्यांना संधी
पावडे यांना गेल्या चार वर्षांत शेवग्याच्या शेंगांना किलोला ३०, ४० रुपये व त्याहून पुढे दर मिळाले. तथापि अनेक वेळा शेंगांचे दर खूप पडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते.
काही वेळा शेतकरी झाडे काढून टाकतात. मात्र पावडर निर्मितीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाहावे, असे मत मंजूषा व्यक्त करतात.
संपर्क - गुलाबराव पावडे, ९१७२८९५५८९, ९३७३०२१५०४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.