Agriculture success Story : नागपूर जिल्ह्यात सेलू (ता. कळमेश्वर) येथील सुधाकर मधुकर कुबडे यांची सात एकर शेती आहे. सन २००८ पासून त्यांनी शंभर टक्के सेंद्रिय शेतीला सुरवात केली. आजगायत म्हणजे पंधरा वर्षे या शेती पद्धतीत सातत्य आहे. फळे व भाजीपाला अशी त्यांची व्यावसायिक पीक पद्धती आहे. जोडीला खरीप व रब्बीची हंगामी पिके असतात.
पीक पद्धती
फळांमध्ये संत्रा तीन एकर, पेरू २० गुंठे, केळीचेही साधारण तेवढेच क्षेत्र. त्यात पपईचे आंतरपीक.
प्रत्येकी १० ते १५ गुंठे क्षेत्रात वर्षभर म्हणजे चक्राकार पद्धतीने वाल शेंगा, मुळा, भेंडी, चवळी शेंगा, टोमॅटो, वांगी, मिरची, शेवगा अशी पिके.
संत्रा पिकात सोयाबीनचे आंतरपीक. मका, ज्वारी व नॉन बीटी कापूसही.
सेंद्रिय शेती व्यवस्थापन- ठळक बाबी
आंबिया व मृग अशा दोन्ही बहरांतून संत्र्याचे तीन एकरांत २२ टनांपर्यंत उत्पादन. केळीचा १० ते २० किलोचा घड मिळतो.
विहिरीस मुबलक पाणी असले, तरी अतिरिक्त स्रोत म्हणून बोअरवेल.
घनजिवामृत, जिवामृत, दशपर्णी अर्क, वनस्पतिजन्य अर्क आदींचा वापर.
शेतावरच निविष्ठा तयार करून रासायनिक घटकांवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न.
पहाटे पाच वाजल्यापासून सुधाकर यांच्यासह पत्नी वैशाली, मुलगा संदीप, भूपेंद्रदेखील शेतीत राबतात. सर्वांच्या समन्वयातून शेती सुकर, कमी श्रमाची झाली आहे.
विक्री व्यवस्था
सेलू ते नागपूर अंतर अंदाजे २२ किलोमीटर आहे. नागपुरातील अभ्यंकर नगरात सुधाकर यांचे मित्र अंबरीष ठवकर यांचे घर आहे. येथूनच दर बुधवारी व रविवारी सेंद्रिय मालाची विक्री सुधाकर करतात. महिन्याला सरासरी ८०० किलो प्रमाणात विविध भाजीपाल्याची हातोहात विक्री होते.
सेंद्रिय माल घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा पाहण्यास मिळतात. कोणतीही भाजी घेतली तरी सरासरी त्याचा दर सध्या प्रति किलो ६० रुपये निश्चित केला आहे. (काळ व स्थितीनुसार तो बदलतो.) कृषी विभागाच्या महोत्सवातही कुबडे यांचा स्टॉल असतो. त्यातून अनेक ग्राहकांची उपलब्धता झाली. सध्या दीडशेपर्यंत ग्राहकांचे नेटवर्क सुधाकर यांनी उभारले आहे.
संत्र्याचे ‘मार्केटिंग’
संत्रा, मोसंबी यांची विक्री ५५ ते ६० रुपये प्रति किलोप्रमाणे होते. व्हॉट्सॲप ग्रुपवर फळ तोडणीची तारीख जाहीर केल्यानंतर मुंबई, दिल्ली, पुणे येथील व्यापारी संपर्क करतात. ‘ऑनलाइन’ पेमेंट केल्यानंतर रेल्वे, ‘ट्रॅव्हल्स’ यापैकी उपलब्ध पर्यायाद्वारे बॉक्स पॅकिंग करून माल पाठविला जातो. वाहतूक आणि पॅकिंग खर्च व्यापाऱ्याला करावा लागतो.
सेंद्रिय गटाची बांधणी
कुबडे केवळ स्वतःपुरती सेंद्रिय शेती करून थांबले नाहीत. शाश्वत शेती योजने अंतर्गत दत्तप्रभू सेंद्रिय शेतीमाल उत्पादक गटाची स्थापना त्यांनी २०१४ मध्ये केली. गटाचे ते अध्यक्ष आहेत. गटात सेलू, केतापार, कळंबी या गावांतील २५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ६० एकरांत सेंद्रिय पद्धतीने उत्पादन होते. सामूहिक पद्धतीचे म्हणजे ‘पीजीएस’ प्रमाणीकरण ‘आत्मा’च्या माध्यमातून झाले आहे. नागपूर येथील दुकानात गटातील शेतकऱ्यांचा मालही ठेवण्यात येतो.
कृषिभूषण सन्मान
सेंद्रिय शेतीतील प्रयोग, व्यवस्थापन व उभारलेली विक्री व्यवस्था या कार्याची दखल घेत २०१७ मध्ये राज्य शासनाच्या सेंद्रिय कृषिभूषण पुरस्काराने कुबडे यांना गौरविण्यात आले आहे. शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी शेतीला भेट देत असतात.
अमेरिकेतील एक विद्यार्थिनी तसेच मॉरिशस येथूनही अभ्यासक शेतावर अभ्यास करण्यासाठी आल्याचे सुधाकर यांनी सांगितले. विविध कार्यशाळांमध्ये ते मार्गदर्शनही करतात. तालुका कृषी अधिकारी राकेश वसू, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत राऊत, कृषी पर्यवेक्षक उज्ज्वल डाखोळे, कृषी सहायक प्रेमराज सुधाकर फलके, ‘आत्मा’चे संतोष टेंभूळकर यांचे मार्गदर्शन मिळते.
दूध व्यवसायाची जोड
देशी गोपालन हा सेंद्रिय शेतीतील महत्त्वाचा घटक आहे. त्या दृष्टीने पाच गीर व तीन देशी गायींचे पालन.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील अनुदानातून २२ बाय १६ फूट आकाराचा गोठा.
सध्या ३० लिटर दुधाची उपलब्धता.
सेंद्रिय शेतीमालाप्रमाणेच दुधाचा ८० रुपये प्रति लिटर दर निश्चित. सुमारे २५ ग्राहकांना होम डिलिव्हरी. मोठा मुलगा संदीप दुचाकीच्या माध्यमातून दूध पोहोचवतो.
शेण, गोमूत्रापासून विविध घटकांची निर्मिती.
चाऱ्यासाठी नेपियर गवताची २० गुंठ्यांत, तर गुजरातहून आणलेल्या लाल गवताची (रेड नेपियर) पाच गुंठ्यांत लागवड. अन्य खाद्यांसह शेवगा, कडुनिंबाचा पालाही देण्यात येतो.
सुधाकर कुबडे ९७६४५०८०१५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.