Sudhir Duddalwar Agrowon
यशोगाथा

Poultry Business : ‘पॅशन’ ठेवल्यानेच पोल्ट्री व्यवसायात यश

Poultry Farming : स्वतः पशुवैद्यक असलेल्या सुधीर दुद्दलवार यांनी काही वर्षे नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर स्वतःचा ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. व्यवसायात टिकून राहण्यासोबतच आश्वासक उलाढाल करण्यात दुद्दलवार यांनी यश मिळवले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले

Success Story of Poultry Business : यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्‍यातील हरसूल गावची लोकसंख्या जेमतेम आहे. कपाशी, सोयाबीन, तूर यासारखी पारंपरिक पिके या भागातील शेतकरी घेतात. याच हरसूल येथील मूळ रहिवासी असलेले सुधीर दुद्दलवार नागपूर येथे स्थायिक झाले आहेत.

सन १९९४ च्या सुमारास ते ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायात आले. त्यापासून सुमारे तीस वर्षांपासून यशस्वी पोल्ट्री व्यावसायिक अशी ओळख त्यांनी टिकवून धरली आहे. ‘मास्टर ऑफ व्हेटरनरी सायस’ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी चार वर्षे पुणे येथे पोल्ट्री व्यवसायातील प्रसिद्ध कंपनीत नोकरी केली.

त्यानंतर हॅचरी क्षेत्रातील एका कंपनीत नागपूर येथेही दोन वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. पण स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याची पॅशन त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यातूनच नोकरीचा राजीनामा देत सन १९९४ मध्ये दोन हजार पक्षी संगोपनापासून पोल्ट्री व्यवसायाचा प्रारंभ केला. उमरेड मार्गावरील पाचगाव (जि. नागपूर) येथे सुधीर यांची आठ एकर जागा आहे. तेथेच शेड उभारण्यात आले.

व्यवसाय विस्तार

नोकरीत असताना पोल्ट्रीशी संबंधित अनेक तांत्रिक आणि व्यावसायिक बारकावे माहीत झाले होते. त्याचाच उपयोग स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी झाला. शेडमध्ये पुरेशी हवा, मोकळी जागा राहावी, जेणे करून पक्ष्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी प्रति पक्षी सव्वा ते दीड चौरस फूट अशी जागा ठेवली आहे. अनुभव येत राहील त्या पद्धतीने शेड व पक्ष्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला.

आज आठ शेड्‍सची उभारणी झाली आहे. एकूण शेड्‍सचा आकार ६५ ते ७० हजार फूट आहे. बॅचनुसार वर्षभरात एकूण तीन ते साडेतीन लाखांपर्यंत पक्ष्यांचे संगोपन होते. पक्ष्यांना पाणी देण्यासाठी दोन बोअरवेल्सची सुविधा व निप्पल यंत्रणा आहे. पशुखाद्य ही पोल्ट्री व्यवसायातील सर्वांत खर्चिक बाब असते.

त्यावरील खर्च कमी व्हावा यासाठी स्वतःची फीडमिल उभाररली आहे. पंधरा टन प्रति दहा ते बारा तास अशी त्याची क्षमता आहे. त्याचबरोबर ‘सायलो’ व ‘फीडर’ यांच्या साह्याने यांत्रिक पद्धतीने खाद्य देण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सोया डीओसी (तेलविरहित पेंड), मका, खनिजे, संप्रेरके (इन्झाइम्स), जीवनसत्त्वे, प्रतिजैविके यांचे सुयोग्य मिश्रण करून पशुखाद्य तयार केले जाते.

विक्री व्यवस्थेचे नियोजन

सुधीर सांगतात की पक्षांची मरतुक कमीत कमी म्हणजे तीन ते पाच टक्क्यांपर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. साधारण ४० ते ४५ दिवसांत पक्षी दोन ते अडीच किलो वजनाचा होतो. त्यानंतर तो विक्रीयोग्य होतो. सुधीर महत्त्वाची गोष्ट विषद करतात ती म्हणजे पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण मक्याचे बाजारपेठेतील दर, एकदिवसीय पिलांचे दर यावर बरेच अवलंबून असते.

बाजारातील मागणी आणि पुरवठा या तत्त्वानुसार पक्ष्यांच्या दरांत सातत्याने चढ-उतार होतात. प्रति किलो अगदी ४० रुपयांपासून ते कमाल १४० रुपये देखील दर मिळू शकतो. दरांमध्ये नीचांकी घसरण झाल्यास संयम ठेवावा लागतो. दर कमी असलेल्या काळातील नुकसानीची भरपाई शक्‍य होत नाही. सुधीर यांनी नागपूर भागातील व्यापाऱ्यांसोबत संपर्क तयार केले आहे. त्या माध्यमातून जागेवरच खरेदी केली जाते.

तेव्हाच होईल व्यवसाय फायदेशीर

सुधीर यांची आजची व्यवसायातील उलाढाल सहा ते सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. फीडमिलसह या व्यवसायातून १० ते १२ जणांना थेट तर अन्य काही लोकांना अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे.

तांत्रिक ज्ञान, अनुभव, व्यवसायाची पॅशन आणि खेळते भांडवल या बाबी तुमच्याकडे असतील तरच या व्यवसायात टिकून राहणे सोपे होते असे ते सांगतात. नागपूर येथील महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सुधीर सदस्य आहेत. आज या व्यवसायाची मुख्य जबाबदारी मुलगा अंकित सांभाळतो आहे.

...असे आहे ‘पोल्ट्री मार्केट’

राज्यातील ‘पोल्ट्री मार्केट’बाबत बोलायचे तर चिकन आणि अंड्यांची बाजारपेठ विस्तारित असली, तरी अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहे. ‘पोल्ट्री’सारख्या पूरक व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे याकरिता काही राज्यांनी पशुखाद्य, वीजपुरवठा, शेड बांधकाम या कामांसाठी अनुदान दिले आहे. त्यामुळेच तमिळनाडू राज्यातील नमक्‍कल येथे दररोज सात कोटींपर्यंत अंडी उत्पादन होते.

‘नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी’चे राज्य समन्वयक श्‍याम भगत यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार महाराष्ट्राची रोजची अंडी मागणी पावणेदोन कोटी नग आहे. त्या तुलनेत साडेतीन हजार लेअर पोल्ट्री व्यवसायांमधून एक कोटीपर्यंतच उत्पादन होते. त्याचा सध्याचा दर पाच रुपये २० पैसे आहे.

लेअर पोल्ट्री व्यवसायाला संधी असतानाही पशुखाद्यातील वाढ व अन्य कर प्रणालींमुळे या व्यवसायात येण्याचे धाडस नवे व्यावसायिक करीत नाही अशी स्थिती आहे. ब्रॉयलर पक्षी व्यावसायिकांची संख्या राज्यात नऊ लाखांच्या घरात आहे. प्रति व्यवसायात सरासरी सात हजार पक्ष्यांचे संगोपन होते. बाजारात सहा महिन्यांपासून दर दबावात असताना सध्याचा प्रति किलो दर १०५ रुपये असून, उत्पादन खर्च ९० रुपये वा त्याआसपास आहे.

- सुधीर दुद्दलवार, ९८२२६९२३३९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT