Milk Production
Milk Production Agrowon
यशोगाथा

Dairy Business : दुग्ध व्यवसायातून भक्कम केले कुटुंबाचे अर्थकारण

Team Agrowon

माणिक रासवे

परभणी जिल्ह्यातील मालेगाव (ता. जिंतूर) येथील किशनराव घुसळे यांचे कुटुंब भूमिहीन होते. त्या वेळी तालुक्यात महाविद्यालयीन शिक्षणाची (Education) सोय नसल्याने परभणी येथील महाविद्यालयात शिकण्यासाठी ते परभणी येथे वास्तव्यास राहिले. वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ अस्थायी स्वरूपाची नोकरी केली.

त्यानंतर १५ वर्षे परभणी शहरात किराणा दुकान चालविले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत सेवक म्हणून रुजू झाले. काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले. दरम्यानच्या काळात मालेगाव येथे तीन एकर जमीन खरेदी केली. त्याआधी १९८२ मध्ये परभणी शहरातील तुळजा भवानी नगर येथे जागा खरेदी केली. किशनरावांना अशोक आणि संतोष ही दोन मुले आहेत.

सन १९९९ पासून अशोक वृत्तपत्र विक्री व्यवसाय करू लागले. परभणी शहरातील घरोघरी जाऊन ते वर्तमानपत्र पोहोचवत. ठरावीक रकमेची बचत करीत. लोकवस्त्यांचा विस्तार होत असताना दुधाची मागणीही वाढत असल्याचे व त्यात संधी असल्याचे कुटुंबाने हेरले. त्यातून दुग्ध व्यवसायाकडे वळायचे निश्‍चित केले.

दुग्ध व्यवसायाला आकार

वृत्तपत्रविक्री व्यवसायातील उत्पन्न व अन्य बचतीतून २००३ मध्ये परभणी येथील खंडोबा बाजारातून म्हैस खरेदी केली. तुळजाभवानी नगर येथील जागेत निवारा उभारून दुग्ध व्यवसाय सुरू केला. सुरवातीला दोन्ही वेळचे मिळून १० लिटर दूध संकलित होई. घरोघर रतीब घालून विक्री सुरू केली. बचत सुरूच होती.

त्यातून आणखी चार म्हशी खरेदी केल्या. त्यातून दूध उत्पादन व उत्पन्न वाढले. आज अशोक पूर्णवेळ वृत्तपत्रविक्री तर संतोष दुग्ध व्यवसाय सांभाळतात. मुऱ्हा, जाफराबादी, गावरान अशा एकूण १५ म्हशी आणि तीन संकरित गायी आहेत. भाकड म्हशीची विक्री केली जात नाही. त्यामुळे दूध उत्पादनात खंड पडत नाही.

गोठा व घराची उभारणी

वांगी रस्त्यावरील ८० बाय ६० फूट जागा आहे. तेथे घर व गोठा असे बांधकाम केले आहे. गोठ्यासाठी लोखंडी खांब, छतासाठी टीन पत्र्यांचा वापर केला आहे. जमिनीवर सिमेंटच्या फरशा बसविल्या आहेत. त्यामुळे गोठा स्वच्छ राखण्याचे काम सोपे होते. वासरे बांधण्यासाठी, चारा साठविण्यासाठी, पाण्यासाठी बोअर अशी व्यवस्था आहे. घराच्या छतावर दोन हजार लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक टाक्या बसविल्या आहेत.

जनावरांचे व्यवस्थापन

वाळका आणि हिरवा चारा, सरकी पेंड, भरडा आदींचा जनावरांच्या आहारात समावेश आहे. कुट्टी यंत्राचा वापर होत असल्याने चाऱ्याची नासाडी होत नाही. घरच्या रब्बी ज्वारीचा सुमारे दोन हजार पेंड्या कडबा दरवर्षी उपलब्ध होतो.

आमडापूर (ता. परभणी) येथील साखर कारखान्याच्या ठिकाणी जाऊन उसाचे वाढे खरेदी करण्यात येतात. शहरातील व्यापाऱ्यांकडून सरकी पेंडही खरेदी केली जाते. दररोज ६५ किलो सरकी पेंड आणि १० किलो हरभऱ्याचा भरडा अशी गरज भासते. घटसर्प, लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण व पशुवैद्यकांकडून नियमित तपासणी होते.

चारा पिकांचे नियोजन

कुटुंब परभणी येथे वास्तव्यास असले, तरी गावाकडील तीन एकर शेती संतोष स्वतः करतात. मशागती, पेरणी आदी कामे भाडेतत्त्वावरील ट्रॅक्टरद्वारे तर सोयाबीन, ज्वारीच्या सुगीची कामे मजुरांकरवी करून घेण्यात येतात. तीन एकर क्षेत्रामध्ये दरवर्षी दोन एकर सोयाबीन तर एक एकरावर चारा पीक असते.

सोयाबीन काढणीनंतर रब्बी हंगामात संपूर्ण तीन एकरांत ज्वारीची पेरणी होते. त्यापासून एकरी पाच क्विंटल धान्य, तर दोन हजार पेंड्या कडबा मिळतो. धान्यामुळे घरच्या वर्षभराच्या धान्याची तजवीज होते. सोयाबीनचा भुस्सा व ज्वारी कडब्यामुळे चाऱ्याची गरज भागते.

वाहतूक व्यवसायातून पूरक उत्पन्न

दुग्ध व्यवसायातील मिळकतीतूनच २०११ मध्ये मालवाहू वाहन खरेदी करणे संतोष यांना शक्य झाले. या वाहनाची क्षमता १० क्विंटल माल वाहून नेण्याची आहे. मालेगाव येथील शेतातून कडबा, तसेच अन्य चारा आणण्यासाठी त्याचा वापर होतोच. शिवाय नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत विविध ठिकाणी व्यापारी, उद्योजक, ग्राहकांचा माल पोहोच करण्याचा व्यवसायही केला जातो. त्यातून पूरक उत्पन्नही मिळते. सुरुवातीला एकच म्हैस होती.

व्यवसायाचा टप्प्याटप्प्याने विकास होत गेला, तसे त्यातील उत्पन्नातूनच म्हशींची संख्या १५ पर्यंत नेली. दोन मजली घराचे बांधकाम केले. मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण देता आले. एखाद्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी चारचाकीही आहे. आगामी काळात सिमेंटचा गोठा बांधण्याचा मानस आहे.

दूधविक्रीची व्यवस्था

दोन्ही वेळचे मिळून १०० लिटर दूध संकलित होते. वर्षभर ही सरासरी कायम ठेवण्याचा प्रयत्न होतो. संतोष यांनी पंधरा किलोमीटर परिसरात सुमारे ३० ग्राहकांचे ‘नेटवर्क’ तयार केले आहे. त्यातून ५० लिटर दुधाचे प्रति लिटर ७० रुपये दराने रतीब (वरवे) घातले जाते. उर्वरित दूध परभणी शहरातील एका विक्री केंद्राला ६५ रुपये दराने पुरवले जाते. दूध शिल्लक राहिल्यास त्याचे पनीर तयार करून ३२० रुपये प्रति किलो दराने विक्री होते.

व्यवसायातून प्रगती

गेल्या सतरा वर्षांपासून व्यवसायात सातत्य व चिकाटी ठेवल्यानेच संतोष यांना प्रगती करता आली आहे. दूध काढणी करण्याबरोबरच प्लॅस्टिक कॅनमध्ये भरणे, दुचाकीवर कॅन ठेवून घरोघरी रतीब (वरवे) घालणे अशी कामे ते दररोज चोख पार पाडतात. वर्षातील एकही दिवस त्यात खंड पडत नाही. सुरुवातीपासून ते आतापर्यंत इतक्या वर्षांत आपण क्वचितच आजारी पडलो असेन असे ते सांगतात.

त्यांना गोठ्याची स्वच्छता, म्हशी गायींना चारा, पाणी देणे आदी कामांमध्ये आई गोदावरीबाई, वडील किशनराव, पत्नी अयोध्या यांचीही मोठी मदत मिळते. एक सालगडीही आहे. वर्षभरात सुमारे १५ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. एक वर्ष शेतात वापर तर एक वर्ष त्याची विक्री प्रति ट्रॉली १५०० रुपये दराने होते. दरवर्षी विविध भागांतील शेतकऱ्यांकडून त्यास मागणी असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage : चिंताजनक! देशातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ २५% पाणीसाठा, राज्याचीही स्थिती बिकट

Nutrients Use : अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने वापर

Tomato Disease : टोमॅटो पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज’

Fertilizer Management : आले पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

SCROLL FOR NEXT