Rural Entrepreneurship: परभणी जिल्ह्यातील पान्हेरा (ता.परभणी) येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी घुले यांनी शेतीला मधमाशीपालन व्यवसायाची जोड दिली. अनेक वर्षांपासून त्यास सातत्य जपून कौशल्य व ओळख तयार केली आहे. भाडेतत्त्वावर मधपेट्यांचा पुरवठा, विक्री, मधविक्री याद्वारे त्यांनी पूरक उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण केला आहे.
परभणी- पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील पेडगावजवळ परभणीपासून १६ किलोमीटवर सिकंदराबाद ते मनमाड रेल्वे मार्गालगत पान्हेरा गाव वसले आहे. गावशिवारातील बहुतांश जमीन हलकी आहे. गावातील शेतकरी प्रामुख्याने खरीप, रब्बी पिकांसोबत भाजीपाला, फळपिकांचे उत्पादन घेतात. अनेक अल्पभूधारक शेतकरी उत्पनवाढीच्या दृष्टीने पूरक व्यवसायाकडे वळले आहेत.
गावातील शिवाजी नारायणराव घुले यांनी दहावीपासून शिक्षण घेत असतानाच शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. बारावीच्या शिक्षणानंतर पूर्णवेळ त्यांनी शेतीत लक्ष घातले. गावाच्या पश्चिमेला भोगाव साबळे रस्त्यावर घुले यांची तीन एकर पारंपरिक शेती आहे. हलक्या प्रकारची जमीन असून काही वर्षांपूर्वी जिरायती क्षेत्रामुळे कापूस आणि तूर ही प्रमुख पिके होती.
सन १९९८ मध्ये त्यांनी विहीर खोदून सिंचनाची सुविधा तयार केली. आता भाजीपाला पिकांमध्ये कांदा, भेंडी, मिरची, गवार आदी पिके ते घेऊ लागले आहेत. जमीन धारणाक्षेत्र कमी असल्याने गावातील अन्य शेतकऱ्यांकडील जमीन बटईने पद्धतीने ते करतात. अलीकडील काही वर्षांत हवामान बदलांमुळे शेतीतील जोखीम वाढली आहे. खात्रीलायक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे पूरक उद्योगाची जोड देण्याचा विचार शिवाजी करीत होते.
मधमाशीपालनाचा मिळाला पर्याय
खादी व ग्रामोद्योग महामंडळांतर्गत अनुदानावरील मधमाशीपालन व्यवसायासाठी अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात होते. त्यास प्रतिसाद देत शिवाजी यांनी परभणी येथील कार्यालयात जाऊन अर्ज केला. घुले यांची अनुदानासाठी निवड झाली. त्या वेळी २० टक्के स्वहिस्सा वाटा व ८० टक्के अनुदान असे योजनेचे स्वरूप होते. त्यानुसार २२ हजार रुपयांची प्राथमिक गुंतवणूक केली.
व्यवसायास सुरुवात करण्यापूर्वी महाबळेश्वर येथे एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. यात मधमाशांच्या एपिस मेलिफेरा, एपिस डॉरसेटा, एपिस फ्लोरिआ आदी पाच जातींचे संगोपन, मध उत्पादन, विक्री व्यवस्था आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन मिळाले. सन २०१२ च्या जून -जुलै महिन्यांत खादी व ग्रामोद्योग महामंडळाकडून ५० मधुपेट्या तसेच एपिस मेलिफेरा जातीच्या मधमाश्यांची वसाहत, मधकाढणी यंत्र आदी सामग्री उपलब्ध करून देण्यात आली.
मधमाशीपालनातील चिकाटी
परागीभवन हा मधमाशीपालनातील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. त्यादृष्टीने शिवाजी यांनी शेताच्या बांधावर पेट्या ठेवल्या. त्या वेळी त्यांच्याकडे कपाशी, सोयाबीन, भाजीपाला आदी पिके होती. पीक व्यवस्थापन करताना खूप काळजी घेतली. परंतु शेजारील शेतकरी पिकांवर विविध प्रकारच्या कीटकनाशकांची पवारणी करीत. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर मधमाशा मृतही पावल्या. मोठे आर्थिक नुकसानही सोसावे लागले. परंतु त्यामुळे शिवाजी यांनी धीर व चिकाटी सोडली नाही.
दुसऱ्या वेळी ४- पेट्यांच्या आधारे सातेरी मधमाशांचे संगोपन सुरू केले. या भागातील वातावरण मधमाशांना अनुकूल ठरले. एकूण हंगाम कालावधीनंतर ४० ते ५० किलोपर्यंत मध उत्पादन मिळाले. व्यावसायात जम बसत गेला तशा दरवर्षी ३० ते ४० नव्या पेट्या खरेदी केल्या. टप्प्याटप्प्याने मधपेट्याची संख्या ३०० पर्यंत वाढवली आहे. पिके फुलोरा अवस्थेत असतात त्या ठिकाणी पेट्या ठेवण्यात येतात. परागीभवन होण्यामुळे पिकांची उत्पादकता वाढण्यासह मधाचेही उत्पादन जोडीला मिळत जाते.
मध निर्मिती
मध उपलब्धतेसाठी खरीप पिके फुलोरा अवस्थेत आल्यानंतर ऑगस्टच्या दरम्यान तर उन्हाळी हंगामातील पिके फुलोरा अवस्थेत असतात त्या काळातील परिस्थिती अनुकूल ठरते. शिवाजी यांच्याकडे दोन मधयंत्रे आहेत. त्याद्वारे वसाहतीतील मध वेगळा करून तो मोठ्या आकाराच्या कॅन मध्ये साठवून ठेवण्यात येतात. काचेच्या बाटल्यांमध्ये ३० ग्रॅम ते एक किलो वजनांमध्ये पॅकिंग केले जाते.
स्थानिक परिसरात, परभणी तसेच परिसरातील गावांमध्ये मधाची विक्री होते. त्याशिवाय विविध ठिकाणची कृषी प्रदर्शने, महिला बचत गटांची प्रदर्शने यामध्ये स्टॉल उभारूनही मधाचे ब्रॅंडिंग व ‘प्रमोशन’ केले जाते. सध्या प्रति किलो ५०० रुपये दर आहे. वर्षभरात १०० ते १५० किलोपर्यंत एकूण मध उत्पादन मिळते. अन्न सुरक्षितता विभागाच्या ‘एफएसएसएआय’ विभागाचा परवाना घेऊन मधसूर्या ब्रॅण्डने आता विक्री केली जात आहे.
परागीभवनासाठी मधपेट्यांचा पुरवठा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा बीजोत्पादन, टरबूज, खरबूज, मिरची, वांगे, संत्रा, मोसंबी आदी पिकांत परागीभवनासाठी मधपेट्या भाडेतत्वावर देण्यात येतात. त्यामध्ये १५ दिवसांसाठी दोन हजार रुपये भाडेशुल्क आकारण्यात येते. यात काही रक्कम अनामत म्हणून घेण्यात येते. पाच हजार रुपये दराने वर्षभरात ५० ते ६० पेट्यांची विक्री होते. परागीभवन चांगले झाल्यामुळे उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत असल्याने पेट्यांना मागणीही चांगली असते.
व्यवसायातील दीर्घ अनुभव व कमावलेले कौशल्य यातून शिवाजी आता उत्तम प्रशिक्षकही झाले आहेत. घरच्या शेतासह कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे या ठिकाणी ते प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतात. प्रशिक्षण घेतलेल्या काही शेतकऱ्यांनी आता स्वतःचाही मधमाशीपालन व्यवसाय सुरू केला आहे.
शेतीकडेही काटेकोर लक्ष
मधमाशीपालन करताना शेतीकडेही तेवढेच काटेकोर लक्ष शिवाजी यांनी दिले आहे. पोखराअंतर्गत अडीच एकरांत तीन वर्षांपूर्वी सीताफळाची लागवड केली आहे. यंदा व्यावसायिक पद्धतीचे उत्पादन सुरू होईल. शिवाय ज्वारी, सूर्यफूल, तूर, कांदा, भाजीपाला पिके घेतली जात आहेत. देशी गोवंशाच्या भाकड पशुधनाचा सांभाळही घुले कुटुंब करते. कालवडी, गाई, बैल मिळून ७० पर्यंत पशुधन आहे. मुक्तसंचार पद्धतीचा गोठा तसेच निवाऱ्याची सोयही केली आहे. पाण्यासाठी हौद बांधले आहेत.
शेण, गोमूत्रापासून गोखूर खत तयार होते. घरच्या शेतात त्याचा वापर होतो. तसेच ५० किलो पॅकिगमधून त्याची विक्री होते. शिवाजी यांच्या समवेत पत्नी गंगाबाई, आई सरूबाई, मुलगा कृष्णा हे कुटुंबातील सदस्य देखील शेतीत राबतात. कुटुंब शेतातच वास्तव्याला आहे. कृष्णा यांनी आता वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मधमाशीपालन व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली आहे. रासायनिक विविष्ठांच्या ऐवजी दशपर्णी अर्क, सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती व वापर होतो. त्यातून उत्पादन खर्च कमी होण्यास मदत मिळते आहे.
शिवाजी घुले ७७६८८५५९००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.