Baswant Bee Garden : परागीभवन सेवा, ॲपिथेरपी बसवंत मधमाशी उद्यानाचा स्तुत्य उपक्रम

Pollination services and Apitherapy : बसवंत मधमाशी उद्यान - कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून परागीभवनाच्या बरोबरीने ॲपिथेरपी या नव्या आरोग्याभिमुख पर्यायाविषयी सुरू असलेला विचारविमर्श प्रशंसनीय आहे.
Baswant Bee Garden Activity
Baswant Bee Garden Activity Agrowon
Published on
Updated on

Nashik News : बसवंत मधमाशी उद्यान - कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून परागीभवनाच्या बरोबरीने ॲपिथेरपी या नव्या आरोग्याभिमुख पर्यायाविषयी सुरू असलेला विचारविमर्श प्रशंसनीय आहे. सामाजिक स्वास्थ्य रक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल अतिशय लोकोपयोगी असे परिपूर्ण कृषी पर्यटन म्हटले पाहिजे, असे प्रतिपादन बंगळूरस्थित स्कूल ऑफ सायन्स गार्डन युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. एच. आर. भार्गव यांनी केले.

‘ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि.’ संचलित बसवंत कृषी- उद्योग पर्यटन केंद्राच्या वतीने, बसवंत मधमाशी उद्यान (पिंपळगाव बसवंत, ता. निफाड) येथे ॲपिथेरपी आणि मधमाश्यांच्या माध्यमातून होणारे परागीभवन या विषयी आयोजित राष्ट्रीय परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. २१ ते ३० डिसेंबर दरम्यान येथे सुरू असलेला बसवंत हनी बी फेस्टिव्हल ही मधुपालन व्यवसाय जागृतीच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

Baswant Bee Garden Activity
Bee Keeping : बसवंत हनी बी पार्क ‘वसुंधरा मित्र संस्था’ पुरस्काराने सन्मानित

बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, अस्थिरोग, हृदयविकार, यकृतविकार, कर्करोग व त्या अनुषंगाने मानसिक अस्वास्थ्य वाढत आहे. मध, प्रोपोलिस, परागकण, रॉयल जेली यांसह मधमाशीचे डंखविष यांच्या वैद्यकीय उपयोगातून या विविध व्याधींवर उपचार पद्धती विकसित झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. बंगळूर येथील मधमाशी संशोधक आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ. एम. एस. रेड्डी,

‘सीबीआरटीआय’च्या माजी प्रकल्प समन्वयक डॉ. डेझी थॉमस, माजी सहायक संचालक डॉ. के. लक्ष्मी राव तसेच डॉ. धनंजय वाखले, सेंटर फॉर बी डेव्हलपमेंटचे कार्यकारी संचालक डॉ. गोपाल पालीवाल, ‘केव्हीआयसी’चे माजी संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केशव कांबळे हे परिसंवादाचे विशेष निमंत्रित होते. ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बी. बी. पवार, संजय पवार, डॉ. भास्कर गायकवाड, महेश पाटील, संदीप वाघ आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

Baswant Bee Garden Activity
Bee Keeping : नैसर्गिक अधिवासामधून डंखविरहित मधमाशीची वसाहत काढण्याचे तंत्र

ग्रीनझोन ॲग्रोकेमचे तज्ज्ञ संचालक डॉ. भास्कर गायकवाड यांनी निमंत्रितांचा परिचय करून देऊन मधमाशीपालन प्रशिक्षण व प्रसाराचे कार्य उपस्थित अनुभवी विषयतज्ज्ञांच्या सहयोगाने विस्तृत आयाम लाभेल, असा विश्‍वास व्यक्त केला. ग्रीनझोन ॲग्रोकेमचे कार्यकारी संचालक श्री. संजय पवार यांनी या उपक्रमाचे हेतुकथन केले. ॲपिथेरपीच्या उपयोगाने नजीकच्या काळात व्यापक जनहित साध्य करता येईल, अशी आपली भूमिका असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमात राज्यभरातून निवडलेल्या मधू उद्योजकाचा ‘बसवंत मधुक्रांती’ पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. संस्था श्रेणीचा पुरस्कार गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्राला मिळाला. विस्तार कार्यातील व्यक्ती पुरस्कार तळेगाव दाभाडेच्या श्री. हेमंतकुमार डुंबरे यांना देण्यात आला.

उद्योजक श्रेणीतील विभागीय पुरस्कारांनी विकास क्षीरसागर (विदर्भ), वाल्मीक गर्जे (मराठवाडा), युवराज वाघ (उत्तर महाराष्ट्र), प्रतीक कर्पे व श्री. सतीश शिर्के (पश्‍चिम महाराष्ट्र) आणि विनय पाटील (कोकण) यांना गौरविण्यात आले. ‘पूर्वा कृषिदूत’ मासिकात सातत्यपूर्ण तसेच उत्कृष्ट लेखनाचे योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. शिल्पा साळुंके - मोडेकर (शिरवळ- सातारा), प्रा. डॉ. शुभम भोसले (पानीव- सोलापूर) आणि प्रा. संजय बडे (दहेगाव- छत्रपती संभाजीनगर) यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ. एम. एस. रेड्डी यांनी मधमाशीकडून होणारे परागीभवन आणि यातून साध्य होणारा उद्योजकता विकास या विषयी मार्गदर्शन केले. या चर्चा सत्रात डॉ. के. लक्ष्मी राव, डॉ. धनंजय वाखले, डॉ. केशव कांबळे, डॉ. गोपाल पालीवाल, डॉ. डेझी थॉमस यांनी महाराष्ट्रातील मधमाशीचे ॲपिथेरपी आणि परागीभवन यातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. मधपाळांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच उपयुक्त धोरण ठरविण्यास प्रयत्न करेल असे विचार महाराष्ट्र मधपाळ असोसिएशनचे अध्यक्ष राजू कानवडे यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. रूपेश ठाकरे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com