Sangita Pingale Mukund Pingale
यशोगाथा

Grape Farming : प्रयोगशील शेतीत जिद्दीने ‘ती’ राहिली उभी

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हावं,अशी इच्छा होती. मात्र प्रगतशील शेतकरी कुटुंबात वडिलांनी विवाह करून दिला. सारं काही आनंदात असताना पतीचे अकाली अपघाती निधन झाले, अन दुःखाचा डोंगर कोसळला. कर्ता पुरुष नसल्याने शेतीची सर्व जबाबदारी सांभाळताना रडत बसण्यापेक्षा लढणे तिने पसंत केले. विविध संकटांशी भिडत मातोरी (ता.जि.नाशिक) येथील संगीता अनिल पिंगळे यांनी जिद्दीने द्राक्ष, भाजीपाला शेतीमध्ये वेगळे स्थान तयार केले आहे.

मुकुंद पिंगळे

-मुकुंद पिंगळे
-------------------------------------------------
शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या संगीता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी २००० साली रसायनशास्त्र (Chemistry) विषयात पदवी पूर्ण केली. स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) द्यायच्या आणि अधिकारी व्हायचं असे त्यांचे स्वप्न होते. मात्र वडील कै.हरिश्चंद्र कहांडळ (शिलापूर,ता.जि.नाशिक) यांनी मातोरी (ता.जि.नाशिक) येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील अनिल पिंगळे यांच्याशी संगीता यांचा २००० साली विवाह लावून दिला.

त्यावेळी शेतीकामे सोडाच;शेतात जाण्याचीसुद्धा माहेरी सवय नव्हती. ‘गृहिणी’ म्हणून जबाबदारी त्यांच्यावर पडली. उच्च शिक्षण होऊनही अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याची खंत त्यांच्या मनात होती. २००१ मध्ये त्यांना श्रेया हे कन्यारत्न झाले. दरम्यानच्या काळात वडील हरिश्चंद्र यांचे निधन झाले. पुढे २००४ साली त्यांना पुत्ररत्न झाले. मात्र बाळ जन्मताच अपंग असल्याने ५ वर्षे सांभाळ करूनही मृत पावले. दुःख आणि संकटे त्यांची पाठ सोडत नव्हती.

अशातच २००७ साली सुखी संसाराला दृष्ट लागली. गरोदरपणात नववा महिना सुरू असताना पती अनिल यांचे अपघाती निधन झाल्याने आभाळ कोसळलं. पती गेल्यानंतर १५ दिवसांनी मुलगा झाला. सासू-सासरे,दीर-जाऊ आणि मुले असा एकत्र परिवार होता. पतीच्या निधनानंतर ९ वर्षे संगिताताई एकत्रित कुटुंबात राहिल्या. मात्र २०१६ साली कुटुंब विभक्त झाल्यानंतर संगिताताईंच्या वाट्याला १३ एकर शेती आली.

त्यावेळी सासरे रामदास खंडू पिंगळे, सासू अनुसया यांनी भक्कम आधार दिला. शेतीचा फारसा अनुभव नसताना सासरे यांनी प्रोत्साहन दिल्याने त्या शेतीमध्ये रमू लागल्या. मात्र पुढे तीन महिन्यातच सासऱ्यांचेही निधन झाले. यानंतर सासू, मुलगी, मुलगा हे सोबतीला होते. त्या संकटाशी भिडत राहिल्या काळ परीक्षेचा असताना जगण्याचा नवा अध्याय सुरु झाला.

शेती केली यशस्वी ः
"शेती बोलणं खूप सोपं...करून दाखव!" अशी टोचून बोलणी कानी पडायची. घरातील महिला शेती पाहणार, ही भूमिका काहींना पटत नव्हती. पण पर्याय नसल्याने शेती पुन्हा फुलवून दाखवायची असा संकल्प संगिताताईंनी केला. मावसभाऊ, कृषीतज्ज्ञ यांचा सल्ला घेऊन संगिताताई शेतीत उतरल्या. द्राक्ष हे मुख्य नगदी पीक होते; मात्र त्यासाठी भांडवल नव्हते.

त्यावेळी घराबाहेर पडण्यासाठी अडचण व्हायची. दागिने गहाण ठेऊन पहिली एक स्कूटर खरेदी केली. शेती नावावर, मात्र मुलगा लहान असल्याने शेतीसाठी कुठलेही कर्ज मिळत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नातेवाईकांकडून भांडवलाची जुळवाजुळव करून संगिताताईंनी टोमॅटो लागवड केली. दर्जेदार उत्पादनामुळे चांगला आर्थिक नफा झाला. या उत्पन्नातून द्राक्षशेतीसाठी भांडवल उभे केले. द्राक्षासारख्या संवेदनशील पिकात काम करताना दिवस-रात्र संघर्ष करण्याची त्यांनी तयारी ठेवली. शेती नियोजनामध्ये त्यांना सख्खा भाऊ बाळा कहांडळ तसेच मावस भाऊ दीपक पिंगळे,सुनील पिंगळे यांचे मार्गदर्शन मिळू लागले.

एकीकडे भांडवल, दुसरीकडे अस्थिर वीज पुरवठा, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि अस्थिर बाजारपेठ अशी अनेक आव्हाने होती. कुटुंब विभक्त झाल्यावर वाट्याला आलेल्या शेतीमध्ये ७ एकर थॉमसन आणि २ एकर जंबो काळी जातीची लागवड होती. सुरवातीला अनुभव नसल्याने द्राक्ष शेतीचे वार्षिक कामकाज समजून घेतले. त्यांनतर ऑक्टोबर बहर छाटणी, सिंचन व्यवस्थापन, शेती यंत्रांची दुरुस्ती, मजूर व्यवस्थापन आणि शेतीमाल विक्री अशी कामे अनुभवातून संगिताताई शिकत गेल्या.

पहिल्यावर्षी एकरी १२ टन द्राक्ष उत्पादन हाती आल्याने आत्मविश्वास वाढला. त्यातूनच पहिल्या वर्षात घेतलेली आर्थिक मदतीची परतफेड केली. एवढेच काय तर,पुरुषांप्रमाणे निविष्ठा, इंधन खरेदी, किराणा असो वा मुलांचे शिक्षण तर कधी आजारपण या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. “एकटी महिला शेती करू शकत नाही" ही भावना खोडून काढली.

नियोजनात आणली सुसूत्रता ः
पावसाळ्यात शेतीत पाणी साचून राहिल्याने लवकर वाफसा होत नाही. त्यामुळे द्राक्ष बागेत ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र वापरता येत नसल्याने नळी पसरून फवारण्या करण्याची वेळ संगिताताईंवर यायची. एकीकडे शेती तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्यांनी शेती कामात सुसूत्रता आणली. याकाळात सासू अनुसयाबाई यांचा भक्कम आधार राहिला. संगिताताईंना वाहन चालविण्याचा अनुभव होता. त्यामुळे कीडनाशक फवारणी, शेतमाल वाहतूक ही कामे त्या करू लागल्या. कृषी निविष्ठा खरेदी, हंगाम नियोजन, मजूर व्यवस्थापन, छाटणी ते काढणी अशी सर्व कामे पाहतात. कार्यक्षमता वाढीसाठी अत्याधुनिक यांत्रिकीकरण, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकडे त्यांचा कल आहे. कुटुंबात मायलेकी प्रमाणे सासू-सुनेची एकी आहे. मुलांचे शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी त्या आदर्श पद्धतीने पार पाडत आहेत.

गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे कल:
द्राक्षाच्या एकूण उत्पादनापैकी ६० टक्के निर्यात आणि ४० टक्के देशांतर्गत विक्री असे नियोजन असते. संगिताताई गोडी बहर छाटणी झाल्यानंतर माल धरताना उत्पादन वाढविण्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देतात. त्यामुळे विरळणी करून मर्यादित घड वेलींवर ठेवला जातो. पीक व्यवस्थापन, हंगामी कामे वेळेवर झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनावर त्यांचा भर आहे. त्यामुळे दरही चांगले मिळतात, उत्पन्न वाढीसाठी मदत होते, असा त्यांचा अनुभव आहे.
द्राक्ष शेतीचा विस्तार:
जात...लागवड(एकर)...रंग
सुधाकर...२...सफेद गोलाकार
अनुष्का...१...सफेद लांबट
एसएसएन...२...सफेद लांबट
रेड ग्लोब...१...रंगीत गोलाकार
ग्रीनस (वाईन द्राक्ष)...३ लागवड प्रस्तावित

कामकाजातील ठळक बाबी:
-जुन्या झालेल्या,पारंपारिक पद्धतीने जोपासलेल्या बागा काढून बाजारपेठेत मागणीकेंद्रित नव्या द्राक्ष जातींची लागवड.
-खत, पाणी व्यवस्थापन करण्यापूर्वी पान-देठ-माती परीक्षण.
-रासायनिक खते, कीडनाशकांचा गरजेपुरता वापर; जैविक निविष्ठांवर भर.
-सिंचन व्यवस्थापनासाठी केंद्रीकृत सिंचन वितरण प्रणालीसह ठिबक सिंचनाचा अवलंब.
-कृषी पंप सुरु करण्यासाठी ऑटो पद्धतीने मोबाईलचलित व्यवस्था.
- एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब; कामगंध,चिकट सापळ्यांचा वापर.
- खर्च, वेळ वाचविण्यासाठी द्राक्ष शेतीमध्ये अत्याधुनिक ट्रॅक्टर, फवारणी यंत्रांचा वापर.
- वार्षिक ७ ते ८ मजुरांची मदत घेऊन हंगामी कामकाज.
- एकरी सरासरी १२ टन द्राक्ष उत्पादन.
- उपलब्ध क्षेत्र आणि बाजारपेठ मागणी अभ्यासून टोमॅटो, भोपळे वांगी, कोथिंबीर लागवड.

स्वतःला सावरून कुटुंबाची आदर्श वाटचाल ः
पती गेल्यानंतर संगीताताईंनी डोंगराएवढे दुःख काळजात लपविले. सासूचा त्या चांगल्या पद्धतीने सांभाळ करतात. याशिवाय मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष आहे. मुलगी श्रेया हीने ‘सेट डिझायनिंग’ विषयात पदवी पूर्ण केली आहे. लहान मुलगा शिवम हा दहावीमध्ये आहे. स्वतःला सावरून त्या आदर्श महिला शेतकरी आहेतच, सोबतच आदर्श आई आणि सून देखील आहे. संघर्षमय कार्याची दखल घेत सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून ‘नवदुर्गा सन्मान’, ‘कृषीथॉन प्रयोगशील महिला शेतकरी सन्मान’, जेसीआय यांच्या वतीने 'महिला शेतकरी सन्मान' या पुरस्कारांनी संगिताताईंचा गौरव झालेला आहे.
--------------------------------
संपर्क: संगीता पिंगळे,९६९९४५७७४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT