Reshim Udyog Agrowon
यशोगाथा

Reshim Udyog: रेशीम शेतीतून संघर्षमय जीवनाला आला ‘अर्थ’

नाशिक जिल्ह्यातील कृष्णनगर (ता. इगतपुरी) येथील सखाहरी कचरू जाधव यांनी शेती, दुग्ध व्यवसाय असे प्रयत्न केले. मात्र अर्थकारण काही सुधारेना. अखेर रेशीम शेतीचा पर्याय त्यांनी निवडला. शास्त्रीय पद्धतीने कामकाज, कुटुंबातील सर्वांची मदत, संघर्षाची तयारी व गुणवत्तापूर्ण रेशीम कोष उत्पादन या गुणांच्या जोरावर या व्यवसायात जाधव यांनी आर्थिक उन्नती साधली.

मुकूंद पिंगळे

नाशिक जिल्ह्यातील कृष्णनगर (ता. इगतपुरी) येथील सखाहरी कचरू जाधव यांच्या वडिलांकडे अवघी साडेतीन एकर शेती (Agriculture Land) होती. काही खडकाळ, काही पाणथळ, सिंचनाची (Irrigation) योग्य सुविधा नसल्याने ती असून, नसल्यासारखी होती. आर्थिक बिकट परिस्थितीमुळे सखाहरी यांना नववी इयत्तेतच शाळा सोडावी लागली. त्यानंतर ते शेतीत उतरले.

अनुभव येत गेला तशी गहू (Wheat), टोमॅटो, वांगी, काकडी अशी पिके घेत येणाऱ्या उत्पन्नातून पाइपलाइन केली. मात्र खर्च व उत्पन्नाचे गणित व्यस्त होते. अखेर उत्पन्नाचा अन्य पर्याय मिळवण्यासाठी खासगी शिक्षण संस्थेत ‘हॉस्टेल इन्चार्ज’ म्हणून पाच वर्षे काम केले. पण मन न रमल्याने नोकरी सोडली.

त्यानंतर १२ म्हशी खरेदी करून तीन वर्षे दुग्ध व्यवसाय केला. पण तोही अडचणीत आल्याने बंद करावा लागला. पुन्हा दोन वर्षे भाजीपाला शेती केली. मात्र आर्थिक ताळेबंद जुळत नसल्याने अखेर सखाहरी त्यातूनही बाहेर पडले.

रेशीम शेतीचा श्रीगणेशा

सन २०१६ मध्ये भाचा धनाजी राव यांच्याकडून रेशीम शेतीची माहिती झाली. हा व्यवसाय आशादायक वाटून जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांशी संपर्क केला. गट असेल तर अनुदान मिळते, असे कळल्यानंतर १० शेतकऱ्यांना सोबत घेतले. तेथून रेशीम शेतीला सुरुवात झाली.

व्यावसायिक टप्पे :

डिसेंबर-२०१७- एक एकरांत तुती लागवड

ऑगस्ट-२०१८ : म्हैसूर येथील केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन व प्रशिक्षण संस्थेत चॉकी संगोपन प्रशिक्षण.

ऑगस्ट ते डिसेंबर- २०१८ : प्रयोगशील रेशीम उत्पादकांकडून मार्गदर्शन, घरीच गोठा वजा शेडमध्ये अल्प भांडवलात कीटक संगोपन गृह उभारणी.

पहिल्या बॅचमध्ये आश्‍वासक उत्पन्न. काटेकोर व्यवस्थापनातून व्यवसाय यशस्वी होऊ शकतो हा आत्मविश्‍वास निर्माण झाला. कुटुंबानेही हाच पर्याय पुढे नेण्याची तयारी दाखविली.

व्यवस्थापनातील ठळक बाबी :

सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत, तर संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत संपूर्ण कुटुंब व्यवसायात व्यस्त. सखाहरी यांना आई जनाबाई, पत्नी तुळसाबाई व मुले राहुल, जनार्दन यांची मदत.

दोन एकर तुती लागवड, ठिबक सिंचन. आंतर मशागतीसाठी पॉवर टिलर.

पाला तोडल्यानंतर फांद्या, फुटवे छाटणीसाठी ब्रश कटर किंवा हॅण्ड कटरचा वापर.

पाच गुंठ्यांवर तुती रोपवाटिका

जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयाकडून अंडीपुंज पुरविले जातात. १५ बाय १५ फूट आकाराचे चॉकी सेंटर उभारले आहे. त्यातून स्वतःसाठी व इतरांसाठी चॉकीचा पुरवठा. वर्षाला सुमारे तीन हजार अंडीपुंजांचे संगोपन.

सुमारे तीन हजार चौरस फूट आकाराच्या शेडमध्ये ३०० अंडीपुंज संगोपन क्षमता. त्यासाठी ४५ बाय ५ फूट अंतराप्रमाणे एक रांगेत सहा, तर दोन रांगांत १२ स्तर.

आर्द्रता व तापमान नियंत्रण यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी तापमान मापक यंत्राचा वापर

तापमान किमान २२ ते कमाल २८ अंश सेल्सिअस, तर आर्द्रता ६० ते ७० टक्क्यांवर नियंत्रित

थंडीत प्लॅस्टिक पेपरद्वारे तापमान नियंत्रण. उन्हाळ्यात बाजूला थंड बारदाने व सूक्ष्म तुषार फवारे.

रोग नियंत्रणासाठी विजेता पावडर, चुना, ब्लिचिंग पावडरची योग्य मात्रेत सुती कपड्यातून धुरळणी.

रेशीम कोषांची निर्मिती झाल्यानंतर ३० व्या दिवशी कोष चंद्रिकेतून संकलित.

स्वच्छतेवर भर, संसर्ग व रोग टाळण्यासाठी ‘बेड’ कोरडे ठेवण्याकडे लक्ष.

प्रत्येक बॅच संपल्यानंतर संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण.

संगोपनगृह उभारणीसाठी ‘मनरेगा’अंतर्गत १०० टक्के अनुदान. सुरुवातीला कीटक संगोपनात काही रोगांनी ग्रासले. मात्र मार्गदर्शन घेत वेळीच प्रादुर्भाव आटोक्यात आणला.

काढणीपशअचात हाताळणी व प्रतवारी व्यवस्था.

व्यवसायाने दिली प्रतिष्ठा

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरेत असलेले जाधव हे निर्व्यसनी व आदर्श कुटुंब आहे. स्वामी शांतीगिरिजी महाराजांच्या कृषिसेवा परंपरेचा वसा त्यांनी सार्थ ठरविला आहे. रेशीम संचालनालयाने रेशीमदिनी (२०१९) ‘रेशीम श्री’, २०२१ मध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्याकडून ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’, तर २०२२ जिल्हा रेशीम कार्यालयाकडून ‘उत्कृष्ट रेशीम शेतकरी’ असे अनेक पुरस्कार सखाहारी यांनी मिळवले आहेत.

त्यामुळे पैसा आणि प्रतिष्ठाही या व्यवसायाने दिली आहे. रेशीम व्यापाऱ्यांमध्ये ‘नाना जाधव’ अशी त्यांची वेगळी ओळख तयार झाली आहे राज्यातील प्रयोगशील रेशीम उत्पादकांमध्ये नाव झाले आहे. वेळोवेळी आलेले अनुभव सखाहारी शेतकऱ्यांसोबत ‘शेअर’ करतात. दररोज किमान पाच शेतकरी प्रकल्पाला भेट देतात. तर ५० हून अधिक शेतकऱ्यांना फोनवरून मार्गदर्शन होते.

उत्पादन, बाजारपेठ व अर्थकारण

वर्षाला सुमारे ८ बॅचेस. प्रति बॅच उत्पादन खर्च २० ते २५ हजार रु.

प्रति बॅच कोष उत्पादन- २५० ते २७५ किलो.

सरासरी दर- ४५० ते ७५० रु. प्रति किलो.

रेशीम कोषांचे संकलन झाल्यानंतर बारदानात २० किलोप्रमाणे पॅकिंग होते. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत येथे खरेदी होते.

वर्षाला एक हजारापर्यंत चॉकीची विक्री होते. त्यातून पूरक उत्पन्न मिळते.

तुतीची रोपवाटिका असून, ५० हजार रोपांची निर्मिती होते. सुमारे एक ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

नवी पिढीही रेशीम शेतीतच

रेशीम शेतीचे भविष्य ओळखून कुटुंबातील तरुण पिढीही याच व्यवसायात स्थिरावल्याने त्यांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. सखाराम यांचा मोठा मुलगा मुलगा राहुल पदवीधारक असून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून त्याने रेशीम व्यवसाय पदविका घेतली आहे. धाकटा मुलगा जनार्दनही पदवीधर असून, याच व्यवसायात रमला आहे.

मन खचू न देता प्रगती

भाजीपाला शेती सोडून रेशीम शेती सुरू केल्यानंतर नातेवाईक, भाऊबंद यांच्याकडून अवहेलना झाली. पण सखाहारी यांनी मन खचू दिले नाही. उलट जोमाने काम सुरू ठेवत गुणवत्तापूर्ण रेशीम कोष उत्पादनावर भर दिला. पूर्वी आर्थिक अडचणी होत्या.

पीककर्ज फेडणे अशक्य असायचे. आता रेशीम उद्योगातून कुटुंबाने सहा वर्षांत चांगली आर्थिक उन्नती साधली आहे. टुमदार घर, मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, ट्रॅक्टरसह शेती यांत्रिकीकरण या बाबी साध्य केल्या. रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, दिलीप हाके, जिल्हा रेशीम अधिकारी सारंग सोरते, रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांची मोठी मदत झाली.

सखाहरी जाधव, ९७६६२७३४०९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT