Sericulture : रेशीम व्यवसायाने दिली आर्थिक बळकटी

किनगाव बुद्रुक (जि. जळगाव) येथील विनय पाटील यांनी आपल्या पंधरा एकर शेतीला रेशीम शेतीची जोड दिली आहे. वर्षाला आठ ते नऊ बॅचेस, अभ्यासूवृत्ती व नेटके व्यवस्थापन याद्वारे प्रति शंभर अंडीपुंजांमागे ९० किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन ते साध्य करतात. या व्यवसायाने त्यांना आर्थिक बळकटी मिळवून देण्याबरोबर सामाजिक प्रतिष्ठाही मिळवून दिली आहे.
Silk Farming
Silk Farming Agrowon

जळगाव जिल्ह्यात किनगाव बुद्रुक (ता. यावल) शिवारात विनय साहेबराव पाटील यांची १५ एकर शेती (Agriculture) आहे. वडिलोपार्जित शेतीत (Ancestral Agriculture) प्रगती करीत असतानाच विविध प्रयोग त्यांनी केले. कापूस (Cotton), मका, खरीप व रब्बी कांदा (Rabi Onion), गहू, ऊस आदी पिके घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. एखाद्या पिकाखाली अधिक क्षेत्र न आणता सर्व पिकांना समान क्षेत्र देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मिनी ट्रॅक्टर तसेच दोन विहिरी आहेत.

Silk Farming
Silk Farming : तुमच्याकडे नेमकी कोणती पिके घेतात, शेती करतात कशी?

रेशीम शेतीची धरली वाट

शेतीला जोड व्यवसाय असावा यासाठी विविध व्यवसायांचा विचार पाटील यांनी केला. गावातील प्रमोद रामराव पाटील यांच्याकडून रेशीम शेतीची प्रेरणा व माहिती मिळाली. विविध भागांत जाऊन प्रयोग, बारकावे, धोके, बाजारपेठ, खर्च, गुंतवणूक आदी बाबी अभ्यासल्या. सुनसगाव (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे मधुकर पाटील यांच्या रेशीम शेतीतून ऊर्जा मिळाली. गावात वसुंधरा रेशीम शेती गटाची स्थापना झाली आहे. त्याचे १८ सदस्य आहेत. पाटील यांचाही त्यात समावेश आहे. अशा रीतीने त्यांच्या रेशीम शेतीला २०१६ मध्ये सुरुवात झाली.

रेशीम शेडची रचना

किनगाव खुर्द येथील शेतात सिमेंट, पत्रे यांच्या मदतीने ५० बाय २० फूट आकाराचे रेशीम कीटक संगोपन गृह (शेड) उभारले.

आतील भागात काँक्रिटीकरण.

पूर्व व पश्‍चिम भागात झाडांची लागवड.

शेडची मध्यभागातील उंची बारा फूट. आजूबाजूची उंची सुमारे साडेनऊ फूट.

लोखंडी रॉड, सळयांच्या मदतीने दोन्ही बाजूंना ४० बाय साडेचार फूट आकाराची पाच मजली (एकूण १०) ‘रॅक सिस्टीम’.

दोन मजूर तैनात. पाटील शेतीचे व्यवस्थापन सांभाळून स्वतःही सर्व कामे करतात. त्यातून मजुरी खर्चावर नियंत्रण.

Silk Farming
Silk Farming : रेशीम शेतीमुळे उत्पन्नात शाश्वतता आली

हवामान नियंत्रण

तापमान नियंत्रणासाठी ‘एक्झॉस्ट फॅन’.

रेशीम कीटक २० ते २३ अंश से. तापमान व ६० ते ७५ टक्के आर्द्रतेत अधिक सक्रिय असतात. हे लक्षात घेऊन नियोजन.

पावसाळ्यात आर्द्रता अधिक असल्याने शेडमध्ये हवा खेळती ठेवण्याचे व गरज भासल्यास टेबल फॅनच्या मागे उष्णता देणारी शेगडी ठेवून बाष्प दूर करण्याचा प्रयत्न.

उन्हाळ्यात शेडच्या छतावर हिरवी नेट. त्यावर तुषार सिंचन. शेडमध्ये ‘फॉगर्स’.

हिवाळ्यात छतावर ताडपत्री अंथरून टाकून तापमान वाढविण्याचा प्रयत्न.

शेड बंदिस्त ठेवले जाते. आत रॅकभोवती प्लॅस्टिक पेपर लावून थंड वारे रोखण्यात येते.

तुतीचे व्यवस्थापन

अंडीपुंज, उत्पादन, बॅच यांचा विचार करून खाद्य उपलब्ध होण्यासाठी व्ही वन तुती वाणाची तीन एकरांत लागवड.

तीन प्लॉटमध्ये त्याचे वर्गीकरण. प्रति प्लॉटमध्ये पाला तयार होण्यास ४५ ते ६० दिवसांचा कालावधी.

एका प्लॉटमधील कापणी झाल्यानंतर दुसऱ्या प्लॉटमध्ये पाला उपलब्ध होतो.

अधिकाधिक कापणीवर भर. त्यामुळे जोमात फुटवे येतात. दर्जेदार पाला उपलब्ध होतो.

रेशीम कोष उत्पादन

उन्हाळ्यात सुमारे २५ दिवस, हिवाळ्यात ३५, तर पावसाळ्यात २२ ते २३ दिवसांत रेशीम कोषांचे उत्पादन होते. वर्षभरात आठ ते नऊ बॅचेस घेतल्या जातात. प्रति बॅच १०० ते १५० अंडीपुंजाची असते. पूंज धामणगाव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथून चॉकी घेण्यात येतात. त्यामुळे कोषनिर्मितीचा कालावधी सुमारे १० दिवसांनी कमी होतो. प्रति बॅच शंभर अंडीपुजांमागे ९० किलोपर्यंत, तर काही प्रसंगी १०१ किलोपर्यंत उत्पादन साध्य केले बॅच आटोपल्यानंतर संगोपन गृहाची स्वच्छता होते. शिफारसीत घटकांच्या मदतीने निर्जंतुकीकरणही केले जाते.

शेतीतील सक्रियता

दर्जेदार रेशीम कोष उत्पादनासाठी पाटील यांचा जालना येथे खरेदीदारांकडून सत्कारही झाला आहे. प्रमोद रामराव पाटील, रेशीम अधिकारी रवींद्र सांगळे, यावल तालुका कृषी विभाग, कृषी अधिकारी एम. डी. पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. गावातील कैलास वराडे, प्रमोद नथ्थू पाटील, सुरेश महाजन, विलास पाटील, मनोज ठाकूर, मुकेश चौधरी, प्रमोद सुतार, श्यामराव महाजन, गजानन इंगळे, देविदास कोळी, समाधान पाटील या रेशीम कोष उत्पादकांच्या ते संपर्कात असतात. मक्याचे एकरी २८ क्विंटलपर्यंत, तर आडसाली उसाचे एकरी ७८ टन उत्पादन त्यांनी साध्य केले आहे.

बाजारपेठ व विक्री

पाटील यांच्या गटातील सुमारे १८, तर परिसरातील गावांत मिळून ४० पर्यंत रेशीम उत्पादक आहेत. त्यांना १८५ किलोमीटरवरील जालना येथील रेशीम बाजारपेठ उपलब्ध आहे. ही मंडळी एकत्रपणे मालवाहू वाहन भाडेतत्त्वावर घेऊन या बाजारपेठेत रेशीम कोष घेऊन जातात. गुणवत्ता चांगली असल्याने किनगावच्या रेशीम कोषांना चांगला उठाव असतो. कोविड काळात येथे किलोला २०० ते २२० रुपये दर मिळाला. गेल्या दोन वर्षांत हा दर ७०० रुपयांपर्यंत मिळतो आहे.

किफायतशीर व्यवसाय

वर्षभरातील एकूण बॅचेसमधून काही लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रति बॅच किमान खर्च १५ हजार रुपये येतो. व्यवसायातील उत्पन्नातून कापूस, मका, कांदा, ऊस शेतीमध्ये गुंतवणूक करणे शक्य झाले. काही वेळेस पिकांमध्ये येणारा तोटा रेशीम शेतीतून भरून काढला आहे.

विनय पाटील, ९७६५६३४१५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com