Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-वेंगुर्ला मार्गावर नेरूर गाव आहे. या गावातील माड्याची वाडी शाळेमध्ये शिक्षणासोबत विद्यार्थांना शेती आणि उद्यमशीलतेचे धडे दिले जातात. जिल्ह्यातील इतर शाळांसाठी ही शाळा आदर्श ठरली आहे. या गावशिवारात आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी लागवड मोठ्या प्रमाणात आहे.
याचबरोबरीने भात, नाचणी, भुईमूग लागवड केली जाते. शेतीवरच गावाचे अर्थकारण अवलंबून आहे. बहुतांश महिला शेती कामामध्येच रमलेल्या आहेत. गावातील बहुतांश महिला भात शेतीमध्ये काम करतात. भात शेती संपल्यानंतर परिसरातील बागायतीमध्ये मोलमजुरी करतात.
साधारणपणे २०१३ च्या सुमारास जिल्ह्यात महिला बचत गट चळवळीने जोर धरला होता. या वेळी माड्याचीवाडी येथील महिलांनी एकत्र येत सद्गुरू महिला बचत गटाची स्थापना केली. गटाने सुरुवातीला नारळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
त्यानंतर गटाने २०१३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून ४० हजार रुपये कर्ज घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. २०१५ मध्ये ८० हजार रुपये कर्ज घेऊन कुक्कुटपालन व्यवसायात वाढ केली. याशिवाय इतर छोटे मोठे व्यवसाय त्यांनी सुरू ठेवले. पाच वर्षांच्या अनुभवानंतर बचत गटाने व्यवसाय विस्तारण्याचा निर्णय घेतला.
मालवणी उत्पादनांना सुरुवात
स्थानिक बाजारपेठेच्या बरोबरीने मुंबई, पुणे बाजारपेठेत मालवणी मसाले, विविध पीठ उत्पादनांना मोठी मागणी असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी बैठक घेऊन प्रक्रिया उद्योगाबाबत चर्चा केली. पहिल्या टप्प्यात मालवणी तिखट मसाला, कुळीथ पीठ यांसह नवीन प्रक्रिया उत्पादने तयार करण्यावर एकमत झाले.
२०१८ पासून गटाने मसाला निर्मिती व्यवसाय सुरू केला. पहिल्यांदा दोन- तीन उत्पादने बाजारपेठेत विक्रीला आल्यानंतर परिसरातील ग्राहकांकडून मागणी वाढली.
त्यामुळे गटाने तांदळाच्या पिठाचे लाडू, फणसाचे वेफर्स, कोकम आगळ, कोकम सोल, उकड्या तांदळाचे पीठ, खोबऱ्याच्या वड्या, तांदळाचे पीठ, वड्याचे पीठ, घावन पीठ, मालवणी गरम मसाला, मालवणी मच्छी मसाला, सांडगी मिरची, काजूगर, गावठी हळद, आमसूल उत्पादनात टप्प्याटप्प्याने वाढ केली.
सुरुवातीला बचत गटांची उलाढाल खूप कमी होती. त्यामुळे पीठ, मसाला तयार करण्यासाठी दुसऱ्यांकडील यंत्रांचा वापर करावा लागत होता. त्यामुळे उत्पादनखर्च देखील वाढायचा.याचा विचार करून बचत गटाने बँकेतून दोन लाख रुपये कर्ज घेतले.
त्यातून पीठ गिरणी, मसाला कांडप यंत्र आणि पॅकिंग यंत्राची खरेदी केली.आता बहुतांशी उत्पादनांची निर्मिती गटामार्फत केली जाते. स्वतःची प्रक्रिया यंत्रणा असल्यामुळे उत्पादन खर्चात कपात झाली. ग्राहकांची मागणी तातडीने पूर्ण करता येते.
मिरची, कोकम, काजू बी, तांदूळ यांसह विविध कच्चा मालाच्या खरेदीपासून ते प्रकिया करणे, पॅकिंग करणे आणि माल विक्रीपर्यंतची सर्व कामे महिला स्वतः करतात. घरातील सर्व कामे आटोपून महिला निश्चित केलेल्या वेळेत एकत्र येऊन विविध उत्पादने तयार करतात.
थेट विक्रीवर भर
बचत गटाच्या उत्पादनांना मालवणी स्पेशल चव आणि घरगुती पातळीवर निर्मिती असल्यामुळे शहरी बाजारपेठेतून मोठी मागणी आहे. मुंबईतील ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादने तयार केली जाते. दर्जेदार उत्पादनावर भर दिल्यामुळे उत्पादित माल शिल्लक राहत नाही.
अनेक ग्राहक थेट माल मागवून घेतात. गटाचा देखील थेट विक्रीवर भर आहे. थेट विक्रीचे व्यवहार देखील रोखीने होत असल्यामुळे नवीन कच्चा माल खरेदीकरिता भांडवल उपलब्ध होते.
याचबरोबरीने गटातर्फे मुंबई महालक्ष्मी सरस, रत्नागिरी प्रदर्शन,सिंधुसरस अशा विविध प्रदर्शनांतून उत्पादनांची विक्री केली जाते. या प्रदर्शनामध्ये मोठी उलाढाल होते. दर रविवारी कुडाळ येथील गावठी आठवडा बाजारात उत्पादनांची थेट विक्री केली जाते. या बाजारात फक्त घरगुती उत्पादनांची विक्री केली जाते. त्यामुळे अनेक ग्राहक येथे येतात. गटाची वार्षिक उलाढाल साधारपणे १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
उत्पादनांची वार्षिक विक्री आणि दर
उत्पादन ---- वार्षिक विक्री (किलो) --- दर (प्रति किलो)
मिरची पूड--- ५०० --- ३००
मालवणी मसाला---५०० --- ६००
गरम मसाला---२०० -- ८००
घावन पीठ--- ६००---८०
कुळीथ मसाला पीठ---४००--- २४०
कुळीथ साधे पीठ ---२०० --- २००
सांडगी मिरची--- ४०० --- ४५०
काजूगर ---३००--- ७००
हळद ---५० --- २४०
लाडू---१०० --- ५००
कोकम आगळ---८० लिटर--- १५० (प्रति लिटर)
कोकम सोल --- २०० --- २००
‘‘बचत गटामुळे मला चांगली संधी मिळाली. गटामुळे आर्थिक प्रगती होत असून, मुलांचे शिक्षण, आरोग्याचा सर्व खर्च माझ्या उत्पन्नातून करते.’’मानसी विठ्ठल गावडे
‘‘सद्गुरू महिला बचत गटाचे काम चांगले आहे. २०१८ मध्ये हा गट उमेद सोबत संलग्न झाला. त्यानंतर या बचत गटाला १५ हजार रुपये फिरता निधी देण्यात आला. त्यानंतर एक लाख रुपये व्यवसाय कर्ज देण्यात आले आहे. प्रक्रिया उद्योगातून बचत गटाची उलाढाल वाढली आहे.’’वैदेही विघ्नेश गावडे, सीआरपी, प्रभाग तेंडोली
‘‘आमच्या बचत गटात १४ महिला सदस्या आहेत. सर्व सदस्या मेहनतीने काम करतात. कच्चा माल खरेदी, प्रकिया, पॅकिंग ते बाजारपेठेपर्यंतची सर्व कामे आम्ही करतो. या व्यवसायातून नफा मिळतोच, त्याचबरोबरीने आर्थिक स्वंयपूर्णतेचे समाधान अधिक आहे.’’प्रतिभा प्रणिल कोरगावकर, ९९२२१७२३२१ (अध्यक्ष, सद्गुरू महिला बचत गट)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.