Orange Farming Agrowon
यशोगाथा

Orange Farming : पाठक बंधूंनी दुष्काळी पट्ट्यात संत्रा उत्पादनातून मिळविली ओळख

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सूर्यकांत नेटके

Agriculture Success Story : पाथर्डी तालुक्यातील बहुतांश भाग कोरडवाहू. सातवड गावांच्या शिवारातही पाण्याची फारशी उपलब्धता नाही. येथील प्रगतिशील शेतकरी नानासाहेब भानुदास पाठक यांच्या बंडू (महादेव) व देविदास या दोन मुलांचे एकत्रित कुटुंब. पाठक कुटुंबाची वडिलोपार्जित हलक्या प्रतीची १८ एकर शेती. त्यात पाण्याची कमतरता. अशातही ज्वारी, बाजरी, हुलगे, मटकी यांसारखी पिकांचे उत्पादन घेतले जात असे.

बंडू (महादेव) व देविदास या दोघा भावांनी शेती करायला सुरुवात केल्यानंतर प्रथम ओबडधोबड जमिनीचे सपाटीकरण केले. शेतामध्ये तलावातील गाळ आणून टाकला. पारंपरिक पिकांसोबत पंधरा वर्षांपासून फळपिके आणि पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय करत कुटुंबाने कष्टातून टप्प्याटप्प्याने प्रगती साधली. संत्रा बागेच्या उत्पादनातून घर, चाकी वाहन तसेच शेती खरेदी केली. शेतीमधील कामांमध्ये पाठक बंधूंना वडील नानासाहेब, आई मंदाबाई यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांची मदत होते.

अर्धा एकरापासून संत्रा लागवड

दुष्काळी भागातील जमिनीत दहा वर्षांपूर्वी पाठक बंधूंनी अर्ध्या एकरावर संत्र्याच्या शंभर झाडांची लागवड केली. या अर्ध्या एकरावरील संत्रा बागेतून इतर पिकांच्या तुलनेत बऱ्यापैकी चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे दिसून आले.

याच काळात पाठक बंधूंनी संत्रा व अन्य फळपिकांच्या उत्पादनातील तांत्रिक बाबींची माहिती घेतली. त्यानंतर लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे ठरविले. मागील दहा वर्षांपूर्वी सात एकरांत संत्र्याची सुमारे १५०० झाडे, तर तीन वर्षांपूर्वी ७ एकरांत १५०० झाडांची लागवड केलीे. नवीन लागवडीतून अद्याप उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली नाही.

दोन झाडांमध्ये साधारण सोळा फूट अंतर राखत लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे झाडांमध्ये हवा खेळती राहते, तसेच मशागतीच्या कामांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होते. त्यातून बागेचे व्यवस्थापन करणे अधिक सोयीचे झाले आहे.

पीक फेरपालटीवर भर

संत्र्यासोबत साधारण आठ ते दहा एकरांवर खरिपात सोयाबीन, बाजरीसह अन्य पिके, तर रब्बीत कांदा उत्पादन घेतले जाते. रब्बीतील पिकांमध्ये शेणखतासह अन्य जैविक खतांचा वापर तसेच लागवड पद्धतीत बदल करण्यालाही प्राधान्य दिले जाते.

त्यामुळे उत्पादनात तुलनेने दहा ते पंधरा टक्के वाढ मिळत असल्याचे पाठक कुटुंबाचा अनुभव आहे. रब्बीत कांदा उत्पादन घेताना खरिपात दरवर्षी पीक फेरपालट करण्याला प्राधान्य दिले जाते.

कांदा लागवडीसाठी दरवर्षी एक एकरावर बियाणे तयार केले जाते. स्वतःच्या शेतात लागवड करून उर्वरित राहिलेल्या बियाणाची विक्री केली जाते. कांदा बियाणांच्या दर्जेदारपणामुळे मागणी आणि दरही चांगले मिळतात, असे पाठक बंधू सांगतात.

पशुपालनासाठी शेतकऱ्यांना पाठबळ

पाठक कुटुंबाने शेतीला पूरक म्हणून दूध व्यवसायाची जोड दिली आहे. स्वतःच्या चार गाईंसह दूध संकलन केंद्रही आहे. यात सातवड आणि परिसरातील गावांतील शेतकऱ्यांचे दूध संकलित केले जाते.

सातवड- त्रिभुवनवाडी सेवा सहकारी सोसायटीचे बंडू पाठक अध्यक्ष आहेत. नगर जिल्हा सहकारी बॅंकने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी चार गाई खरेदीसाठी तीन लाखांपर्यंत कर्ज देण्याची योजना सुरू केली.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बंडू पाठक पुढाकार घेतात. त्यातून अनेक शेतकऱ्यांना पशुपालन, दूध व्यवसायासाठी पाठबळ मिळाले आहे.

दर्जेदार उत्पादनात सातत्य

संत्रा बागेत सण, उत्सव व अन्य काळातील बाजारातील मागणीचा विचार करून बंडू (देविदास) पाठक बहराचे नियोजन करतात. दहा वर्ष जुन्या संत्रा बागेमध्ये मृग आणि आंबिया बहर धरला जातो. या बहरातील फळांना बाजारात मागणी आणि दरही चांगले मिळतात.

फळांचा दर्जा पाहून व्यापारी शक्यतो बागेमध्ये येऊनच खरेदी करतात. आंबिया बहरातून एकरी सुमारे १२ ते १४ टन, तर मृग बहरात एकरी १३ ते १५ टनांपर्यंत उत्पादन मिळते.

मागील पंधरा वर्षांपासून बागेत ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला जात आहे. झाडाच्या गरजेनुसार पुरेसे पाणी मिळत असल्याने कमी पाण्यातही दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचे पाठक बंधू सांगतात.

संत्रा बागेत रासायनिक खतांचा कमी वापर करत स्लरी, शेणखत आणि जैविक खतांच्या वापरावर अधिक भर दिला जातो. सध्या सत्तर टक्के सेंद्रिय, तर तीस टक्के रासायनिक खतांचा वापर बागेत केला जातो.

सेंद्रिय खतांच्या वापरामुळे फळांचा आकार वाढला, चकाकी येण्यास मदत झाली. याशिवाय बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो.

फळांची तोड झाल्यानंतर ताण कालावधीत प्रति झाड दहा किलोपर्यंत शेणखत, सोबत रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. याशिवाय वातावरणाचा अंदाज आणि झाडांचे निरिक्षण करून रासायनिक बुरशीनाशके तसेच कीटकनाशकांची फवारणी घेतली जाते.

बागेतील मशागत तसेच फवारणी व अन्य कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करण्यावर भर दिला जातो.

झाडाच्या खोडांना नियमितपणे बोर्डो पेस्ट लावली जाते. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सापळ्यांचा वापर होतो.

बंडू पाठक ९०६०६८९९९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT