Grape
Grape  Agrowon
यशोगाथा

Grape : प्लॅस्टिक आच्छादनाने केले द्राक्ष बागेचे संरक्षण

Abhijeet Dake

सांगली जिल्ह्यातील खानापूर हा अवर्षणग्रस्त (Rained) भाग असला तरी द्राक्षपिकासाठी (Grape Crop) हा भाग राज्यात प्रसिद्द आहे. द्राक्षाची निर्यातही (Grape Export) इथले बागायतदार करतात. तालुक्यातील विटा या प्रसिद्ध शहरापासून दक्षिणेला कुर्ली गाव आहे. येथील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत पाणी टंचाईला (Water Shortage) सामोरे जावे लागले. मात्र प्रयोगशील वृत्तीच्या शेतीतून शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती भक्कम केली.

गावातील विठ्ठल पिसाळ यांची दहा एकर शेती आहे. त्यांचे वडील रघुनाथ शेतीच करायचे. त्यातून अत्यल्प उत्पादन मिळायचे. दरम्यान, परिसरात द्राक्षशेती झपाट्याने वाढ होती. आपणही या नगदी पिकाकडे वळायचे व आर्थिक परिस्थिती सुधारायची असा विचार त्यांनी केला. सन २००१ च्या दरम्यान एक एकर द्राक्ष बाग लावली. पाण्याची दुर्भिक्षता असल्याने त्यातील प्रवास आणखीच बिकट झाला. पण कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर बाग बहरू लागली. तीन हंगाम हाताशी आले. पैसा हाती येऊ लागला.

प्रगतीकडे वाटचाल

सन २००३-०४ च्या दुष्काळात बाग काढावी लागली. पीक हातून गेले. पुढे काय करायचे हा प्रश्‍न सतत घोंघावू लागला. त्यातून मार्ग दिसला तो म्हणजे भाजीपाला लागवडीचा. सन २००४ पासून उपलब्ध पाण्यावर टोमॅटो, सिमला मिरची, कारली अशी पिके घेण्यास सुरुवात केली. बाजारपेठेच्या मागणीनुसार या पिकातून उत्पन्न मिळू लागले. आर्थिक प्रगती साधली. विठ्ठल आपला अनुभव सांगताना म्हणाले की द्राक्ष हे अतिसंवेदनशील पीक आहे. अति पाऊस झाला तर नुकसान होते. सतत दुष्काळ पडला तर काढून टाकावे लागले. पण जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे २०१७ मध्ये पुन्हा एक एकरात द्राक्षाची लागवड केली. दोन हंगाम हाती आले पण पुढे पावसाने खूप नुकसान केले. तरीही पुन्हा मागे वळायचे नाही असा निर्धार केला.

मार्ग शोधला दुष्काळ आणि अतिपावसामुळे दोन वेळा बागेला फटका बसला. त्यावर शाश्‍वत मार्ग काढणे आवश्यक होते. त्यासाठी काय करता येईल याचे डोक्यात विचार चक्र सुरू झाले. नाशिक, सातारा जिल्ह्यांतील फलटण परिसरात द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक पेपर आच्छादन केल्याची माहिती मिळाली. मग विठ्ठल यांनी मित्र अतुल बाबर यांच्यासोबत दौरे करून प्रत्यक्ष प्लॉट व वेगवेगळी तंत्रे पाहिली. आपल्या बागेत आच्छादनासाठी उंची किती हवी, हवा खेळती राहण्यासाठी चारही बाजूंनी अंतर किती ठेवायचे यावर विचार मंथन केले.

फायदेशीर प्रयोग

विठ्ठल यांच्याकडे जुलैमध्ये (आगाप) छाटणी असते. एसएसएन या वाणाचा ते वापर करतात. सन २०१९ मध्ये प्लॅस्टिक पेपर आच्छादनाचा एक एकरात त्यांनी प्रयोग केला. जमिनीपासून सुमारे १२ फूट उंचीवर लोखंडी स्ट्रक्चर वा ॲगलची उभारणी केली. जमिनीपासून ओलांड्यापर्यंत पाच फूट व तेथून वरती पाच फूट अशी या पेपरची मांडणी केली. त्याच्या मध्यभागापासून अडीच फुटाचा डहाळ दिला. पहिल्या वर्षी एक एकरांत उत्साहवर्धक परिणाम आढळल्यानंतर आता हा प्रयोग दोन एकरांत केला आहे. भुरीसारखे रोग उद्‍भवू नयेत यासाठी पुरेसे ‘व्हेंटिलेशन’ तयार केले आहे. हवा खेळती राहण्यासाठी बागेच्या चारही बाजूंनी अडीच फूट जागा रिकामी ठेवली आहे.दोन सरींच्या मध्ये प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अंथरला आहे. जेणे करून पावसाचे पडणारे अतिरिक्त पाणी त्यावाटे वाहून जाईल.

प्रयोगातील ठळक बाबी

-९० जीएसमचा प्लॅस्टिक पेपर.

-अतिनील किरणांपासून संरक्षण. त्यामुळे सूर्यप्रकाश हवा तितकाच बागेला मिळतो.

-वरच्या भागात पेपरचे घर्षण टाळण्यासाठी पाच एमएम सिंथेटिक वायरचा वापर

-पेपर बांधण्यासाठी तीन एमएम इलॅस्टिक वायर. अति वारे आले तरी त्यामुळे ताण येत नसल्याने पेपरचे नुकसान होत नाही.

-एकरी पाच लाख याप्रमाणे दोन एकरांत १० लाख रुपये खर्च आला.

छाटणी ते ‘हार्वेस्टिंग’ या काळात हे आच्छादन वापरले जाते. व्यवस्थापन चांगले असल्यास एक पेपर सुमारे चार वर्षे वापरता येतो.

प्रयोगाचे झालेले फायदे

-फुलोरावस्थेत गळ व कुजीचे होणारे नुकसान टळले.

-फूट एकसमान पद्धतीची राहिली.

-घड जिरण्याचे प्रमाण कमी राहिले. शेंड्यांची वाढ चांगली होते. एकूणच पिकाची वाढ चांगली राहिली.

-डाऊनीसारख्या रोगांचा त्रास कमी झाला.

-काढणीवेळी पाऊस असेल तर क्रॅकिंगमुळे होणारे नुकसान टळले.

-पाण्याचा अतिरिक्त वापर टळला.

-कीडनाशकांच्या सुमारे आठ ते त्याहून फवारण्यांची व त्यावरील खर्चात बचत झाली.

प्रति फवारणी खर्च सुमारे तीन ते चारहजार रुपये होतो.

-मालाचा दर्जा सुधारला. प्रति किलो १०५ रुपयांपर्यंत दर द्राक्षाला देशांतर्गत बाजारपेठेत मिळू लागला आहे.

हवामान केंद्राची उभारणी

विठ्ठल यांनी बागेचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नुकतेच हवामान केंद्रही (वेदर स्टेशन) उभारले आहे. जमिनीतील ओलावा आणि तापमान समजण्यासाठी तीन सेन्सर्स बसवले आहेत. एकरी ११ ते १२ टन उत्पादन त्यांना दरवर्षी मिळते.

विठ्ठल रघुनाथ पिसाळ, ९७३०२०६३३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT