Derle Family
Derle Family Agrowon
यशोगाथा

Success Story : गाजर पिकातून नांदतेय समृद्धी

मुकुंद पिंगळे

Carrot Farming : नाशिक जिल्ह्यात शिंगवे (ता. निफाड) हे गोदावरी नदीकाठी वसलेले गाव आहे. पूर्वी उसाच्या लागवडीवरच इथल्या शेतकऱ्यांचा भर असायचा. गावातील धनराज डेर्ले ऊस, भाजीपाला घेत.सन २००० नंतर राजेंद्र, काशिनाथ व ज्ञानेश्‍वर ही त्यांची मुले शेतीत आली.

उसातील समस्या लक्षात घेता कुटुंब पर्यायी पिकाचा शोध घेत होते. सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा गावात त्या वेळी गाजराची शेती व्हायची. पण उन्हाळ्यात पाणी नसल्याने तेथील नातेवाइकाने शिंगवे येथे कराराने गाजर शेती सुरू केली होती. ही पद्धती अभ्यासून डेर्ले यांनीही हा प्रयोग करायचे ठरवले.

सुधारित पद्धतीचा अवलंब

डेर्ले गाजर शेतीत अनुभवी होऊ लागले. पण या पारंपरिक शेतीत खर्च, वेळ, श्रम व मजूरबळ अधिक लागायचे. एकविचाराने वाटचाल करणाऱ्या कुटुंबाने समस्यांवर मात करण्याच्या उद्देशाने उपाय शोधून व्यवस्थापनात बदल केले. दरम्यान, परिसरातील साखर कारखाने बंद पडल्यानंतर कुटुंबाने एक एकराऐवजी आपल्या संपूर्ण तीन एकर शेतीत गाजर हेच हक्काचे पीक केले. आजमितीला या पिकात २३ वर्षात अनुभव व हातखंडा तयार झाला आहे.

व्यवस्थापनातील बाबी सांगायच्या तर दिवसा जमीन तापली असल्याने सिंचन दिल्यास गाजराचा कंद खराब होतो. त्यामुळे जमीन थंड झाल्यानंतरच सिंचन केले जाते. पूर्वी ते प्रवाही पद्धतीने व्हायचे. दोन वर्षे रेन पाइपचा वापर केला. पण अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने आता इनलाइन ठिबक सिंचनाचा अवलंब होतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते. कंदाची चांगली वाढ होऊन गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते असा अनुभव आहे.

उत्पादन - एकरी १५५, १६० ते १६५ क्विंटलपर्यंत.

टप्प्याटप्प्याने लागवडीचा फायदा

गाजराचे सुमारे चार महिन्यांचे पीक आहे. फेब्रुवारीपासून काढणी सुरू होते. सुरुवातीला कमी असलेली आवक मार्चपासून मेपर्यंत वाढत जाते. १५ जूननंतर कमी होते. त्यामुळे नोव्हेंबरच्या दरम्यान तीन ते चार टप्प्यांत थोड्या थोड्या क्षेत्रात लागवड केल्याने मालाचा पुरवठा कायम राहतो.

बाजारात आवक असण्याच्या काळात दरांचा फायदा होतो. दरांत घसरण असेल तेव्हा गाजर जमिनीत ठेवण्यात येते. दरांत सुधारणा होताच पुढील दोन ते तीन महिन्यांत माल काढण्यात येतो. मध्यम व एकसारख्या रंगाच्या गाजराला बाजारपेठेत पसंती असते. गुणवत्तेसाठी वाणाची निवडही महत्त्वाची ठरते. लग्नसराई व उत्सवाच्या काळात गाजरांना देशभर मागणी असल्याचा डेर्ले यांचा अनुभव आहे.

दर प्रति किलो रुपये

वर्ष किमान कमाल सरासरी

२०२१ ७ १६ १२

२०२२ ८ ३५ २२

२०२३ ८ ४१ २३

जागेवरच खरेदी

संपूर्ण शिंगवे गावात गाजर लागवड होते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शिवार खरेदी पद्धतीचा अवलंब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवरच मार्केट मिळाले आहे. येथून मुंबई, दक्षिण, उत्तर भारतीय राज्ये, गोवा या ठिकाणी पुरवठा होतो. काही व्यापारी शेत पाहून एकराप्रमाणे सौदा करतात. तर काही काढणीपश्‍चात स्वच्छ व प्रतवारीयुक्त मालाची वजनी पद्धतीने खरेदी करतात.

गाजरे धुणाऱ्या यंत्राचा वापर

पूर्वी काढणीनंतर काथ्या वापरलेल्या चार पायाच्या बाजेवर घासून गाजरे स्वच्छ केली जात. त्यात वेळ, श्रम अधिक खर्च व्हायचे. मग काशिनाथ यांनी लोखंडी टाकीचा वापर व बुद्धिकौशल्यातून गाजर धुण्याचे यंत्र बनविले. पुढे २०१४ मध्ये नातेवाईक गणपत पुंजा बोराडे यांच्या मदतीने दोन क्विंटल क्षमतेचे गाजर धुण्याचे ट्रॅक्टरचलित यंत्र विकसित झाले.

आता दोन ते तीन तासांत गाजर धुणाऱ्या सात क्विंटल क्षमतेच्या स्वयंचलित यंत्राचा वापर डेर्ले करतात. या यंत्राद्वारे विहिरीतून पाणी उचलून आणणे व गाजरे धुण्याचे काम होते. या पद्धतीमुळे श्रम, वेळ व मजुरबळात मोठी बचत झाली आहे. अन्य गाजर उत्पादकांनाही प्रति क्विंटल ४० रुपये दराने गाजरे धुऊन दिली जातात. त्यातून चांगले अतिरिक्त उत्पन्न मिळते.

उंचावले जीवनमान

धनराज वयाच्या २० व्या वर्षापासून शेतीत राबतात. पूर्वी गरिबी होती. मात्र सातत्याने प्रयोग करणे व उपलब्ध भांडवलाप्रमाणे आवश्यक सुविधा निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव राहिला आहे. सध्या १५ दुधाळ जनावरे आहेत. दुग्धव्यवसायाची ही जबाबदारी बंधू काशिनाथ यांच्याकडे आहे. कुटुंबाला टांगा शर्यतीची आवड आहे.

त्यासाठी अश्‍व संगोपन होते. मोठे बंधू भाडेतत्त्वावर ट्रॅक्टरचालवण्याचा व्यवसाय करतात. पूर्वी भांडवलासाठी विकास सोसायटीत चकरा माराव्या लागत. श्रमप्रतिष्ठा जपल्याने आता आर्थिक उन्नतीतून सामाजिक प्रतिष्ठा वाढली आहे. अवजारे, यांत्रिकीकरण केले आहे. मालवाहतुकीसाठी वाहन आहे. पूर्वी पत्र्याच्या घरात कुटुंब राहायचे.आता संयुक्त कुटुंबाचे पक्के घर आहे. वाहने दारासमोर उभी आहेत. कृषी ज्ञानासह आर्थिक साक्षरता कुटुंबातील प्रत्येकात रुजली आहे.

ज्ञानेश्‍वर डेर्ले,

९८२३७२८८१६/८९९९७२१११३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

SCROLL FOR NEXT