दिनकर गुल्हाने
Success Story of Watermelon Farming : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात वनवार्ला येथील अप्पर पूस धरण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे .सिंचनासाठी पाण्याची शाश्वती झाल्याने शेतकरी नवनवीन पिकांचे प्रयोग करीत आहेत. आधुनिक तंत्राचा वापर करून उत्पादन व उत्पन्न वाढवित आहेत. पूस धरणाच्या खालील भागात वनवार्ला शिवारात जमशेदपूर येथील पंजाबराव नरसिंग राठोड यांची शेती आहे.
आर्थिक स्थिती अतिशय बिकट असल्याने त्यांनी बारावीनंतर डीएड व पुढे एम.ए. केले. मूळगाव जमशेदपूर (तांडा)पासून चार किलोमीटरवरील वडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांना शिक्षक म्हणून नोकरी लागली. त्यांचे वडील नरसिंग हाडाचे शेतकरी होते. ते शेतमजुरी करीत. शिक्षण सुरू असताना वडिलांकडून शेतीचे धडे घेत पंजाबरावांनाही काही काळ शेतमजुरी करावी लागली.
शेतीचा विकास
शिक्षकी पेशा सांभाळताना नोकरीतील पैशांची बचत करीत पंजाबरावांनी २००३ मध्ये साडेचार एकर जमीन विकत घेतली. त्यात कापूस, सोयाबीन, भुईमूग, हरभरा आदी पिके घेतली. पुढे आणखी पाच एकर खडकाळ जमीन घेतली. दरम्यान, बोअरवेल बंद पडली. सात एकर उन्हाळी भुईमूग शेंगा भरण्याच्या कालावधीत वाळून गेला.
मग पाण्याच्या शाश्वत स्रोतासाठी २०१८ मध्ये ७८ फूट खोल विहीर खोदली. वरून खडक असल्याने सुमारे १२ लाख रुपये खर्च आला. पण येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची वृत्ती, जिद्द, मेहनत, सोबत अभ्यास यातून शेती फुलविण्याचा प्रयत्न पंजाबरावांनी सुरूच ठेवला.
कलिंगडातून पीकबदल
शेतकऱ्याचे जीवन संकटाने भरलेले असते. पण हिंमत न हारता पुढे जात राहिले पाहिजे हा दिवंगत वडिलांचा संदेश मनात घोळवत पंजाबरावांनी पुढील दिशा आखली. कापूस, सोयाबीन या पिकांमधून समाधानकारक दर मिळत नव्हते. अशावेळी ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध कलिंगड शेतीच्या यशकथांनी प्रेरणा दिली. कमी कालावधीत उन्हाळ्यात हे पीक चांगले उत्पन्न देऊ शकते ही बाब हेरून त्याचा सखोल अभ्यास केला. कलिंगड उत्पादकांच्या शेतांना भेटी दिल्या.
पहिल्या वर्षी म्हणजे २०१९- २० मध्ये दोन टप्प्यांत प्रत्येकी पाच एकर असे दहा एकरांत कलिंगड घेण्याचे नियोजन केले. मिळालेले उत्पादन पाहता दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु मार्च- एप्रिलमध्ये कोरोनाचे संकट उभे ठाकले. मोठ्या प्रमाणात तयार झालेली कलिंगडांची कुठे विक्री करावी असा प्रश्न उभा राहिला. अशावेळी पत्नी रजनी, मुलगा शुभम व बंधू संजय यांच्या मदतीने वनवार्ला फाट्यावर थेट विक्रीचा सपाटा लावला. त्यातून मोठा नफा मिळाला नाही. मात्र साडेतीन लाख रुपयांनी आधार दिला. हे पीक यशस्वी करू शकतो याचा आत्मविश्वास आला.
गारपिटीचा तडाखा
पुढील वर्षीही सुमारे १० ते १२ एकर क्षेत्रात कलिंगड घेतले. त्यातून काही लाखांचा नफा देखील झाला. अजून हुरूप वाढला. सन २०२३ वर्षाने मात्र संयमाची कसोटी पाहिली. सुमारे अकरा एकरांत ठिबक सिंचन, पॉली मल्चिंगचा वापर करून लागवड केली होती.
मार्च - एप्रिलच्या रमजान काळात तोडणीचा हंगाम सुरू होण्याआधीच वनवार्ला शिवारात जोरदार गारपीट झाली. एकरी २० टन याप्रमाणे सुमारे १७५ ते २०० टनांच्या आसपास उत्पादन अपेक्षित असताना केवळ ११ टन मालाची विक्री करणे शक्य झाले. बाकी मालाचे पूर्ण नुकसान होऊन किमान सात लाखांना आर्थिक फटका बसला. होत्याचे नव्हते झाले.
पुन्हा नवी उमेद जागविली
कोरोना, गारपीट हे धक्के अनुभवल्यानंतर पुन्हा कलिंगड घेण्यासाठी मन धजावत नव्हते. परंतु आकस्मित उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे नाउमेद न होता नव्या धैर्याने कलिंगड हंगामानंतर त्यात खरिपात कापूस घेतला. आठ एकरांत सुमारे ८० क्विंटल उत्पादन मिळाले.
त्यास सातहजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यातील भांडवलाचा उपयोग करूनपुन्हा कलिंगडाचा प्रयोग करायचे ठरवले. मात्र क्षेत्र पाच एकरच ठेवले. त्यातील दीड एकरातयंदाच्या जानेवारीत लागवड केली. मेहनतीने खते, पाणी, फवारणी यांचे सुयोग्य नियोजन केल्याने फळ पदरात पडले. वेलींना तीन ते पाच किलो वजनाची फळे लगडली.
पुन्हा संकटाने गाठले
फळांची तोडणी करण्याची वेळ आली असतानाच पुन्हा एक नवे संकट उभे राहिले. विद्युत रोहित्र जळाल्याने तब्बल पाच दिवस वीज पुरवठा बंद पडला. त्यामुळे फळांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना पाणी मिळू शकले नाही. अखेर डिझेल जनरेटरची व्यवस्था करावी लागली. तोपर्यंत काही वेली सुकून गेल्या होत्या.
सुमारे २८ मार्चच्या दरम्यान तोडणी करण्यात आली. खडकाळ जमिनीत दीड एकरांत २७ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. व्यापाऱ्यांनी बांधावरच खरेदी केली. त्यातून दोन लाख २६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. पैकी ९० हजार रुपये खर्च आला. आता उर्वरित अडीच एकरांतील कलिंगड जोमात आहे. येत्या पंधरवड्यात त्याची काढणी सुरू होईल. त्यापासून किमान तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
जिद्दीने शेतीत यशस्वी वाटचाल
पंजाबरावांचे शेतीतील प्रयोग पाहून परिसरातील सुमारे २५ शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. पंजाबराव सांगतात, की दरवर्षी जानेवारीच्या सुमारास पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन टप्प्यांत कलिंगडाची लागवड करतो.
त्यामुळे मार्च- एप्रिलच्या कालावधीत उत्पन्नाचे चक्र सुरू राहते. अधिक उत्पादनक्षम, काळ्या पाठीचे, लांबोळके, वाहतुकीत टिकवणक्षमता चांगली अशी वैशिष्ट्ये पाहून वाणाची निवड करतो. आतापर्यंतचा अनुभव पाहता एकरी २० टनांपर्यंत उत्पादन व किलोला ८ ते १२ रुपये दर मिळतो. बांधावरूनच व्यापारी खरेदी करतात.
मुलांचे केले शिक्षण
शाळा सुरू होण्याच्या दोन तास आधी व त्यानंतर पुन्हा दोन तास दररोज शेतात मेहनत करतो असे पंजाबराव सांगतात. नोकरीच्या पैशांमधून घर चालते. पण दोन मुलांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण करण्यासाठी शेतीनेच मोठी साथ दिल्याचे पंजाबराव सांगतात.
धाकट्या मुलाने पुणे येथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले असून त्यात प्रावीण्य मिळवले आहे. शिवाय धाकट्या भावाच्या दोन मुलांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारीही पंजाबरावांनी उचलली आहे.
पंजाबराव राठोड ९९२१२१३४५१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.