Women Impowerment Agrowon
यशोगाथा

Women Impowerment : ‘सीमा’ताईंनी संघर्षातून फुलविला मळा

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

संतोष मुंढे

Seema Sadanand Kshirsagar : प्रयत्नांच्या परकाष्ठेतून बागायतदार झालेल्या कडवंची (जि. जालना) गावातील सीमा सदानंद क्षीरसागर यांच्या संघर्षाला तोड नाही. पती सदानंद यांच्यावर किडनीच्या आजारामुळे शेतीकामाच्या मर्यादा आल्या. त्यामुळे सीमाताईंनी शेती व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. आज द्राक्ष, डाळिंब बागेतील दैनंदिन व्यवस्थापनाच्या बरोबरीने ट्रॅक्टरद्वारे फवारणी, शेती मशागतीची सर्व कामे त्या स्वतः करतात. पशुपालन आणि शिवणकामातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न दिशादर्शक आहे.

साधारणत: २०१३ मध्ये जालना जिल्ह्यातील येवला (ता. घनसावंगी) हे माहेर असलेल्या सीमा यांचा विवाह कडवंची (ता.जि. जालना) येथील सदानंद विनायक क्षीरसागर यांच्याशी झाला. सदानंद यांच्याकडे साडेचार एकर हलकी मध्यम शेती. यशवंतराव चव्हाण मुक्‍त विद्यापीठातून त्यांनी कृषी डिप्लोमाचे शिक्षण घेतले. त्यांच्या संसारवेलीवर आरूष आणि वेद नावाची दोन फुले बहरली. सदानंद यांनी २०१५ मध्ये विहिरीतील पाण्याची उपलब्धता पाहून एक एकर द्राक्ष बाग लावली. २०१७ मध्ये शासनाच्या योजनेतून खोदकामाच्या अनुदानावर शेततळे घेतले. जल, मृद्‍ संधारणाच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध बांधबंदिस्ती केली. दोन वर्षांमध्ये बागेतून उत्पन्न सुरू झाले. शेती व्यवस्थापनात आई प्रयागबाई, वडील विनायकराव, पत्नी सीमा यांची चांगली मदत होत होती.
या दरम्यान २०१८ मध्ये डोळ्याने कमी दिसत असल्याने सदानंद क्षीरसागर पहिल्यांदा जालना येथील नेत्र रुग्णालयात तपासणीसाठी गेले. सतत रक्‍तदाब वाढला असल्याने त्यांनी वैद्यकीय तपासण्या केल्या.

यातून किडनीचा आजार लक्षात आला. वर्षभर उपचार झाल्यानंतर त्यांनी किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय झाला. वडील विनायकराव यांनी सदानंद यांना आपली एक किडनी दिली. जानेवारी २०२० मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. यासाठी नातेवाइकांनी मोठा आर्थिक आधार दिला. प्रत्यारोपण झाल्यानंतर सदानंद यांच्यावर शेतीकामामध्ये मर्यादा आल्या. त्यामुळे सीमाताई यांच्याकडे कुटुंबाच्या जबाबदारीसोबत द्राक्ष बागेची देखील जबाबदारी आली. या संघर्षाच्या काळात सीमाताईंना सासूबाई प्रयागबाई यांची चांगली मदत झाली. घरच्या दैनंदिन कामामध्ये मदत करणाऱ्या सासूबाई ऑगस्ट २०२२ मध्ये अल्पशा आजारात जग सोडून गेल्या आणि सीमा यांच्यावर संपूर्ण घर, शेतीसह सर्व कामांची जबाबदारी आली. कुटुंबाचे सर्वांगाने अर्थकारण कोलमडले असताना न डगमगता सीमाताईंनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढत शेतीचेही नियोजन पती सदानंद यांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने केले आहे.

सदानंद बनले मार्गदर्शक ः
किडनी प्रत्यारोपणामुळे शेतीकामात मर्यादा आलेल्या सदानंद यांनी पत्नी सौ. सीमा यांना द्राक्ष, डाळिंब आणि हंगामी पिकाच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सदानंद यांच्या मार्गदर्शनाखाली सीमाताईंनी कुटुंबाच्या साडेचार एकरांपैकी दोन एकर द्राक्ष बाग (जात ः गणेश, माणिक चमन, सादा सोनाका) आणि एक एकर डाळिंब बाग (जात ः भगवा) आणि एक एकरामध्ये सोयाबीन, चारा पिकांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले आहे.

शेतीकामामध्ये पारंगत ः
शेतीची सर्व जबाबदारी आल्यानंतर सीमाताईंनी द्राक्ष बागेचे शास्त्र आणि दैनंदिन कामकाजाचे नियोजन त्यांनी सदानंद यांच्याकडून समजून घेतले. द्राक्ष बागेत फूट काढणी, शेणखत, रासायनिक खत देणे, पाणी देणे, घड बांधणे या सर्व शेतीकामामध्ये सीमाताई पारंगत झाल्या आहेत. द्राक्ष, डाळिंब बागेत फवारणी करणे तसेच वाहतुकीच्या दृष्टीने त्यांनी ट्रॅक्टरदेखील शिकून घेतला. एप्रिल, ऑक्‍टोबर छाटणी तसेच ऑक्‍टोबरची फूट काढणी वेळेत करावी लागत असल्याने मजुरांची मदत घेतली जाते. नव्याने लागवड केलेल्या डाळिंब बागेतील शेंडा खुडणी, झाडाला आकार देण्यासाठी छाटणी, खुरपणी, वाय कळ्या काढणे आदी सर्व कामे स्वतः सीमाताई करतात.

शेती व्यवस्थापनाच्या दृष्टीने गावातील प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत क्षीरसागर, सूर्यभान क्षीरसागर, गोरख क्षीरसागर आणि गणेश क्षीरसागर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. याचबरोबरीने सीमाताई खरपुडी (जि. जालना) येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचा पीक व्यवस्थापनासाठी सल्ला घेतात.

मिळाली बचत गटाची साथ...
गेल्या सहा वर्षांपासून सीमाताई गावातील संभाजीराजे बचत गटाच्या सक्रिय सदस्या आहेत. दर आठवड्याला सीमाताई गटामध्ये २० रुपयांची बचत करतात. बचत गटातील सदस्यांनी कर्ज उचलून ते पैसे पूरक उद्योगाच्या उभारणीसाठी वापरले आहेत. सीमाताईंना देखील पूरक उद्योग करायचा होता, परंतु पती सदानंद यांच्या दीर्घकालीन आजारपणामुळे पूरक उद्योगासाठी जमविलेले पैसे उपचारासाठी खर्च झाले. परंतु बचत गटाच्या बचतीमधून त्यांनी घेतलेली म्हैस आजही त्यांच्याकडे आहे. या म्हशीचे सकाळी दोन लिटर आणि सायंकाळी तीन लिटर दूध गावातील डेअरीमध्ये देतात. म्हैसपालनातून त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. याशिवाय वेळात वेळ काढून सीमाताई शिवणकामदेखील करतात. तसेच कुटुंब, शेतीची जबाबदारी सांभाळून वेळ मिळाला की गावातील महिलांना शिवणकामाबाबत मार्गदर्शन करतात. त्यातूनही थोडी आर्थिक मदत कुटुंबाला होते.

पहाटे साडेपाचला सुरू होतो दिवस
सीमाताईंच्या दिवसाची सुरुवात पहाटे साडेपाचला होते. पहिल्यांदा गोठा स्वच्छता आणि म्हशीची धार काढली जाते. त्यानंतर कुटुंबाचे चहापाणी झाल्यानंतर मुलगा आरूषच्या शाळेची तयारी करणे, त्यानंतर पती सदानंद यांच्या औषधाचे नियोजन, कुटुंबातील सदस्यांचा नाश्‍ता आणि त्यानंतर दुपारसाठी जेवण तयार करून त्या दहा वाजल्यानंतर शेतीकामामध्ये रमतात.
शेतातील खुरपणी असो की द्राक्ष, डाळिंब बागांमधील फवारणी त्या स्वत: करतात. फळबागेच्या गरजेनुसार मजुरांची मदत घेतली जाते. सायंकाळी सहा वाजता फळबागेतून घरी परतल्यानंतर गोठा स्वच्छता, म्हशीचे दूध काढणे, वैरण, पाणी केल्यानंतर मुलांच्या शाळेचा अभ्यास आणि कुटुंबासाठी जेवणाची तयारी सुरू होते. द्राक्षाचा हंगाम सुरू झाल्यानंतर सीमाताईंचा सकाळी साडेपाचला सुरू होणारा दिवस कोणताही किंतु, परंतु न करता रात्री दहा वाजता संपतो. सुरुवातीपासून अलीकडच्या चार महिन्यांपर्यंत सदानंद यांच्या उपचारासाठी महिन्याकाठी बारा हजार खर्च व्हायचा. अलीकडे हा खर्च डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आठ हजारांवर आला आहे. अपार कष्टातून सीमाताईंनी फळबाग आणि संसार चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे.
-----------------------------------------------------------
संपर्क ः सौ. सीमा क्षीरसागर, ९८२२८३४७१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT