Potato Farming Agrowon
यशोगाथा

Vegetable Farming : बटाटा, कांदा शेतीत मिळविले प्रावीण्य

विकास जाधव 

Agriculture success Story : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात सर्वाधिक बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यातील गादेवाडी सुमारे ५०० लोकसंख्या असलेले गाव. येथील मधुकर बबन जाधव हे प्रगतिशील शेतकरी आहेत. बारावी शिक्षण घेतल्यानंतर काही दिवस मुंबई येथे खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र शेतीची आवड असल्याने २००० मध्ये गावी येऊन मधुकररावांनी पूर्णवेळ शेती करण्यात सुरुवात केली.

घरची साडेचार एकर शेती. त्यातील काही शेती जाखणगाव या गावात येते. येथे जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यापैकी एक सिमेंट बंधारा जाधव यांच्या शेताजवळ आहे. त्यामुळे विहिरीला चांगले पाणी लागले आहे. दोन विहिरी, तीन बोअरवेल यांच्या माध्यमातून सर्व शेती टप्प्याटप्प्याने मधुकर यांनी बागायत केली.

शेतीमध्ये खरिपात बटाटा, घेवडा, तर रब्बीमध्ये कांदा ही प्रमुख पिके घेतात. अधूनमधून भाजीपाला पिकांची लागवड ही करतात. शेतीमध्ये नवनवे प्रयोग तसेच पीक पद्धतीत बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यातूनच या वर्षी झेंडू, बीन्सची लागवड केली आहे. शेती कामांमध्ये पत्नी सौ. सुनंदा, मुले हर्षद, कार्तिक यांची मदत होत असल्याचे मधुकर जाधव सांगतात.

बटाटा लागवडीतील मुख्य बाबी

  • खरिपातील प्रमुख पीक म्हणून दरवर्षी एक ते सव्वा एकरात बटाटा लागवड.

  • लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रात एक वर्षाआड एकरी ३ ट्रॉली शेणखत दिले जाते.

  • उन्हाळ्यात जमिनीची ट्रॅक्टरने नांगरट करून रोटर मारून मशागत केली जाते.

  • जुलै महिन्यात बटाटा लागवडीचे नियोजन असते.

  • लागवडीसाठी प्रथम ट्रॅक्टरच्या साह्याने सऱ्या काढल्या जातात. त्यानंतर महिलांच्या मदतीने बटाटा लागवड केली जाते.

  • लागवडीसाठी मध्यम आकाराचा बटाटा अर्धा कापून घेतला जातो. सव्वा फूट अंतरावर बटाट्याची लागवड केली जाते.

  • लागवड केल्यानंतर छोट्या ट्रॅक्टरने भर लावली जाते.

  • सिंचनासाठी ठिबक किंवा मायक्रो स्प्रिंकरचा वापर केला जातो.

  • दर्जेदार बियाणे लागवडीवर भर असल्याने पंजाबमधून बियाणे आणले जाते. उत्पादनात बियाण्याचा वाटा मोठा असल्याचे जाधव यांना वाटते.

  • फुलकळी येण्यास सुरुवात झाल्यानंतर बैल जोडीच्या साह्याने दुसरी भर लावली जाते.

  • लागवडीनंतर सरासरी नव्वद दिवसांनी बटाटा पीक काढणीस येते.

  • बटाट्याची काढणी टॅक्ट्ररच्या साह्याने केली जाते. त्यानंतर वेचणी करून बांधावर ठेवले जातात. जागेवरून विक्री करण्यावर भर दिला जातो.

  • मजूरटंचाई संकट जास्त असल्याने यांत्रिकीकरणावर भर दिला. यामुळे कामे वेळेत होण्यास मदत होते.

शेतीला पूरक म्हणून ट्रॅक्टर व्यवसाय

घरच्या शेती कामांसाठी तसेच पूरक व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर व्यवसाय मधुकरराव करतात. त्यासाठी १८ एचपी छोटा ट्रॅक्टर घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असणारे वेगवेगळी पेरणी यंत्र, बटाटा लागवडीसाठी विविध अवजारे घेतली आहेत. गाव परिसरातील शेतकऱ्यांकडून खरिपात पेरणी कामांसाठी ट्रॅक्टरला मागणी असते. हा व्यवसाय कमी दिवसांचा असलातरी चांगले अर्थकारण होते. या व्यवसायातून दरवर्षी तीन ते साडेतीन लाख रुपये उलाढाल होते. त्यामुळे शेतीसाठी खेळते भांडवल उपलब्ध होत असल्याचे मधुकर जाधव सांगतात.

...असे आहे अर्थशास्त्र

बटाटा लागवडीतून एकरी सरासरी ८ टनांपर्यंत उत्पादन मिळते. मशागतीपासून काढणीपर्यंत ६० ते ६५ हजार रुपये भांडवली खर्च येतो. गाव जवळील पुसेगाव येथील व्यापाऱ्यांना बटाट्याची विक्री केली जाते. गतवर्षी जाधव यांना जागेवरच बटाट्यास २५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. खर्च वजा जाता एक ते सव्वा लाख रुपये हाती शिल्लक राहत असल्याचे जाधव सांगतात.

कांद्यासह आले, घेवडा लागवड

  • खरिपात दरवर्षी सरासरी एक एकरावर कांदा लागवड केली जाते. बाजारातील दरांचा अंदाज घेऊन क्षेत्र कमी जास्त होत असते. कांदा लागण ही रोपांची करत नाहीत. त्याऐवजी स्वतःकडील ट्रॅक्टरच्या माध्यमातून कांदा बी पेरणी करतात. कमीत कमी एक एकरावर कांदा पेरणी केली जाते. कांदा लागवडीमध्ये ठिबक, मायक्रो स्प्रिंकलरचा वापर केला जातो. कांदा लागवडीमधून एकरी सरासरी आठ ते नऊ टनांपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे जाधव सांगतात.

  • खरिपात घेवडा तसेच नगदी पीक म्हणून आले लागवडही केली जाते.

  • कोरोना काळात त्यांनी अधिक रस असलेल्या पुंड्या उसाची १६ गुंठ्यांत लागवड केली होती. त्याला रसवंतिगृहाकडून चांगली मागणी मिळाली होती. त्यातून सुमारे साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या पैशातून कुटुंबासाठी एक चारचाकी गाडी घेतली आहे.

  • बाजारांत हंगामात फुलांना चांगले दर मिळत असल्याने फुलशेती करण्याचे ठरविले. सुरवातीला २२ गुंठे क्षेत्रावर लाल, पिवळ्या झेंडूची लागवड आहे. यातील ११ गुंठे क्षेत्रात फुले लागली असून, उर्वरित ११ गुंठ्यांत नुकतीच नव्याने लागवड केली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने झेंडू फुलांना चांगले दर मिळत असल्याचे जाधव सांगतात.

मधुकर जाधव ९८२२१४८०९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT