Sugarcane Farming  Agrowon
यशोगाथा

Sugarcane Farming : अभ्यासूवृत्तीने वाढवली उसाची उत्पादकता

Sugarcane Productivity : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील कानगाव येथील अजित शेलार यांना पूर्वी उसाचे एकरी ५० ते ६० टनांपर्यंतच उत्पादन मिळायचे. सातत्याने अभ्यास, प्रशिक्षण, तज्ज्ञांची संगत, सुधारित व्यवस्थापन व तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून दरवर्षी सरासरी ८० ते ९० टन उत्पादनात सातत्य ठेवण्यात त्यांनी यश मिळवले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Sugarcane Farming Management : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर असलेल्या कानगाव येथे शेलार कुटुंबीयांची शेती आहे. सध्या नव्या पिढीतील तीन भावांपैकी अजित व अमित शेतीची संपूर्ण जबाबदारी पाहतात.

तिसरे बंधू अभिजित व्यवसाय पाहतात. वडील बापूराव यांची चार एकर शेती होती. परंतु शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागल्यानंतर त्यांनी टप्प्याटप्पाने शेती विकत घेण्यास सुरवात केली. आजमितीस त्यांच्याकडे १९ एकर शेती आहे.

त्यात ऊस व कांदा ही मुख्य पिके असून १३ एकर क्षेत्र उसाखाली आहे. अजित अभ्यासूवृत्तीचे आहेत. त्यांनी ऊसशेतीची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी उसाचे एकरी उत्पादन ५० ते ६० टनांच्या दरम्यान होते. मात्र अजित यांना ते आश्‍वासक वाटत नव्हते.

मग त्यांनी पिकाचा शास्त्रीय अभ्यास सुरू केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सानिध्यात ते आले. बारामती कृषी विज्ञान केंद्रातही प्रशिक्षण घेतले. त्यातूनच व्यवस्थापनात सुधारणा घडवून एकरी उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

व्यवस्थापनात केले असे बदल

लागवडीपूर्वी शेणखत, कोंबडी खत, प्रेसमड, कंपोस्ट किंवा ताग गाडून जमीन तयार केली जाते. त्यानंतर चांगल्या पद्धतीने मशागत करून सरी काढली जाते.

पूर्वी तीन फुटी सरी पद्धतीचा वापर व्हायचा. आता पट्टा पद्धतीचा अवलंब केला आहे.

पुढील वर्षी किती क्षेत्रावर लागवड करायची हे आधीच ठरवले जाते. त्यानुसार बेण्याची गरज लक्षात घेऊन अर्धा ते एक एकरावर चांगल्या प्रतीचा बेणे मळा तयार करण्यावर भर देतात. दरवर्षी जुलैमध्ये लागवड केली जाते. त्यामुळे उगवण क्षमता चांगली होण्यात मदत होते. साधारणपणे ८ ते १० महिन्याच्या दरम्यानच्या उसाचा वापर होतो.

सन २०१४ पासून ते शेतातच नर्सरी तयार करून कोकोपीट व एक डोळा पध्दतीच्या कांडीपासून रोपे तयार करतात. त्यासाठी बेणे मळ्यातील उसाचाच वापर होतो. साडेचार बाय दोन फूट अंतरावर रोपांची लागवड करतात. एकरी सुमारे ७८०० रोपे असतात.

मातीच्या गुणवत्तेचे महत्त्व कळल्यानेच दरवर्षी प्रत्येक प्लॉटमधील मातीचे परिक्षण करून घेतात. त्यातून सेंद्रिय कर्ब किंवा अन्नद्रव्यांचे प्रमाण कळून त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करणे शक्य होते.

ऊस तोडणीस गेल्यानंतर त्या शेतात कांदा, ज्वारी, गहू, हरभरा अशी विविध पिके घेण्यास सुरवात झाली. त्यामुळे चांगल्या प्रकारे बेवड तयार होऊन पुन्हा ती जमीन उसासाठी सशक्त होऊन जाते. त्यामुळे ऊस उत्पादनात वाढीस चालना मिळाल्याचा अनुभव घेतात.

प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी संजीव माने यांच्या मार्गदर्शनानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केले जाते. एक विहीर व एक बोअरवेल आहे. भीमा नदीवरून पाणी शेतात आणले आहे. सध्या दहा एकरांत ठिबक सिंचन केले आहे. दोन ट्रॅक्टर्स व त्यावर आधारित अवजारे उपलब्ध आहेत. पाचट कुट्टी करण्याचे यंत्र घेतले आहे.

ऊस तोडणीनंतर खोडव्याचे नियोजन आहे. पाचटाची कुट्टी करून ती सर्वत्र पसरवली जाते. खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर त्यात कापूस व मग त्याच्या काढणीनंतर कांदा व त्यानंतर मग पुन्हा लागवडीचा ऊस अशीही पीक पद्धती अलीकडेच राबवली आहे. उसाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आता त्यात तसेच कपाशी पिकातही फ्लॉवरचे आंतरपीक घेण्यास सुरवात केली आहे.

उत्पादनवाढीचे मिळाले फळ

पूर्वी मिळत असलेले लागवडीच्या उसाचे एकरी ५० ते ६० टन उत्पादन आता सरासरी ८० ते ९० टनांपर्यंत जाऊन पोचले आहे. एकरी सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च येतो. सुमारे तीन वर्षांपूर्वी एकरी १०० टनांचा पल्लाही गाठला आहे. सन २०११ मध्ये फुले २६५ वाणाचे एकरी ८४ टनांच्या सरासरीने उत्पादन घेतले आहे.

खोडव्याचे एकरी ५५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. नजीकच्या साखर कारखान्याकडून प्रति टन तीन हजार रुपये दर मिळतो. बारामती नजीकच्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेकडून २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट ऊस उत्पादनातील प्रगतशील शेतकरी म्हणून अजित यांचा गौरव झाला आहे. शेलार कुटुंबाने शेतीतून दमदार प्रगती साधली आहे. शेतात डौलदार घर बांधले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनाही अजित ऊस उत्पादनाविषयी मार्गदर्शन करतात.

माती परिक्षणावर सतत भर असतो. मातीची सुपीकता जपण्याचा व जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न आहे. एका प्लॉटमध्ये सेंद्रिय कर्ब ०.७ टक्के झाला आहे. एक प्लॉट चोपण आहे. येथे निचरा प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर केला. पूर्वी तेथे १० ते १२ कांड्यांपेक्षा अधिक ऊस वाढत नव्हता. आता तो २५ ते ३० कांड्यांवर वाढला आहे.
अजित शेलार ९४०५८४८३०७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT