Deshmukh Family Agrowon
यशोगाथा

Tur Crop Farming: देशमुख झाले तुरीतील अभ्यासू, ज्ञानी शेतकरी

Modern Agriculture Technique: पूर्णपणे जिरायती पट्टा असलेल्या आपल्या मांडवगण (जि. अहिल्यानगर) भागाला अनुकूल अशी तुरीची प्रयोगशील शेती युवा शेतकरी प्रशांत देशमुख यांनी यशस्वी केली आहे. अकरा वर्षांपासून तूर पिकात सातत्य ठेवण्यासह लागवड अंतर, वाणबदल असे प्रयोग व व्यवस्थापन यातून एकरी ८, १२, १६ क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांनी साध्य केले.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Technology: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड हे तालुक्यांमध्ये नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना शेतकरी प्राधान्य देतात. मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील प्रशांत अनिल देशमुख यांची प्रगतिशील आणि प्रयोगशील युवा शेतकरी अशी ओळख आहे. पूर्वी एकत्रित कुटुंबाची ५५ एकरांपर्यंत शेती होती. वाटणीनंतर त्यांच्या वडिलांच्या वाट्याला सुमारे १७ एकर शेती आली. प्रशांत यांनी ‘मायक्रोबायोलॉजी’ विषयातून पदवी घेतल्यानंतर सन २००७ च्या दरम्यान शेतीला सुरुवात केली.

त्या वेळी उसाचे अधिक क्षेत्र होते. ठिबकही केले होते. सन २०१२ मध्ये भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्या वेळी कमी पाण्यात येणारे व उसाला पर्याय ठरणारे पीक शोधताना ‘ॲग्रोवन’मध्ये तूर शास्त्रज्ञ डॉ. वंजारी यांचा लेख वाचनात आला. त्यांचे मार्गदर्शन घेऊन याच पिकाची निवड केली. त्यानंतर २०१३ ३ पासून ते २०२४-२५ पर्यंत सुमारे ११ वर्षे या पिकात प्रशांत यांनी विविध प्रयोगांमधून सातत्य ठेवत हे पीक यशस्वी केले.

तूर लागवड तंत्रज्ञान

उत्पादन अधिक व खर्च कमी या तत्त्वानुसार व्यवस्थापन. दरवर्षी तुरीचे १० एकरांदरम्यान क्षेत्र. सुरुवातीला दोन ओळींत दीड फूट, दोन रोपांत सहा इंच या पद्धतीने १७ एकरांवर प्रयोगास सुरुवात. त्या वेळी पाच जून ते तीन जुलै कालावधीपर्यंत पेरणी केली. पाच जूनच्या पेरणी प्लॉटचे एकरी १६ क्विंटल उत्पादन मिळाले. पेरणीच्या तारखा पुढे होत गेल्या तसे उत्पादन कमी म्हणजे एकरी ८ क्विंटलपर्यंत मिळत गेले. पेरणीची वेळ अधिक उत्पादनासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रशांत सांगतात.

पुढील वर्षांमध्ये आधीचेच लागवड अंतर, मात्र जोडओळ पद्धत व दोन जोडओळीत सहा फुटांवरून बारा फुटांपर्यंत अंतर असे नियोजन केले. १५ एकरांत टोकण केली. एकेवर्षी जून ते ऑगस्ट पाऊसच नव्हता. गरजेनुसार प्रति दिन १० ते १५ मिनिटे ठिबक सुरू ठेवले. अशा प्रतिकूल स्थितीत एकरी आठ क्विंटल उत्पादन मिळाले. एकरी झाडांची संख्या अपेक्षित ठेवण्यासाठी दोन वर्षांपासून दोन ओळींत साडेचार फूट तर दोन झाडांत सहा इंच अंतर ठेवून लागवड. दोन ओळी, रोपांतील अंतर व जोडओळनुसार एकरी झाडांची संख्या सातहजार, आठ हजार, दहा हजार व त्यापुढे अशी वेगवेगळी राहते.

पेरणीपूर्वी एकरी ३ ते ४ ट्रॅक्टर ट्रॉली शेणखताचा दरवर्षी वापर. यापूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (परभणी) बीडीएन ७११ वाणाचा वापर.हे वाण जिरायतीसाठी अनुकूल आहे. यंदा याच विद्यापीठाच्या गोदावरी वाणाचा वापर. हे वाण बागायती असून, त्याचा कालावधी १५ ते २० दिवस अधिक आहे. मर व वांझ रोगाला ते प्रतिकारक असल्याचे प्रशांत सांगतात. तुरीच्या दोन ओळींत अंतर जास्त असल्याने कमी कालावधीची पिकेही घेण्याचे व पीक फेरपालट प्रयोग.

दुष्काळाचे पेलले आव्हान

अडीच एकरांत ऊस आहे. सहा बाय एक फूट अंतरावर लागवड असते. यंदा हे अंतर आठ बाय एक फूट ठेवले आहे. बारा महिन्यात येणाऱ्या या उसाचे यापूर्वी ६७ टन तसेच यंदा दोन एकरांत ९३ टन उत्पादन घेतले आहे. सन २००७ ते २०११ या काळात लागवड केलेल्या सतरा एकरांपैकी पाच एकरांत उसाचे पाच खोडवेही ठेवले होते. शेतात पाचट कुट्टी वापरण्यावर भर असतो. पूर्वी देशमुख यांच्याकडे आंबा, डाळिंब, चिकू, मोसंबी अशी पिके होती. सन २०१२ मध्ये दुष्काळात काही फळपिके काढून टाकावी लागली. त्या वेळी मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागला. सन २०१८ मध्ये लागवड केलेली लिंबाची साडेतीनशे झाडे असून ती उत्पादन देत आहेत. दुष्काळासोबत लढत देशमुख कुटुंब शेतीत प्रगती करण्याचा प्रयत्न करते आहे.

किफायतशीर ठरलेले पीक

अलीकडील वर्षांत विविध हवामान अवस्थांनुसार एकरी ८ ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे प्रशांत सांगतात. पूर्वी ते कंपन्यांसाठी बीजोत्पादन करायचे. आता व्यापाऱ्यांनाच विक्री होते. यंदा क्विंटलला ७५०० रुपये दर होता. दरवर्षी एकरी उत्पादन खर्च १२ हजार रुपयांपर्यंत येतो. कितीही दुष्काळ असला, पाण्याची स्थिती वाईट असली तरी कमी बियाणे दर, कमी मशागत खर्चाततुरीचे पीक दरवर्षी चांगला आर्थिक आधार देते असे प्रशांत सांगतात. श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुका काही वर्षांपासून तुरीचे आगर होत आहे. सन २०१५ मध्ये तुरीला प्रति क्विंटल १७ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. तेव्हापासून क्षेत्र वाढीस चालना मिळाली आहे.

‘हार्वेस्टर’द्वारे मजूरटंचाईवर मात

मजूरटंचाई लक्षात घेऊन प्रशांत यांनी सहकारी संभाजी वाघ यांच्यासोबत भागीदारी करून चार वर्षांपूर्वी २३ लाख रुपये गुंतवून हार्वेस्टर घेतले. यंदा २७ लाखांचा अजून एक आधुनिक हार्वेस्टर घेतला आहे. तूर, गहू, करडई, मका, सूर्यफूल आदींमध्ये त्याचा वापर करता येतो. प्रशांत अन्य शेतकऱ्यांनाही एकरी अडीच हजार रुपये दराने हार्वेस्टरची सेवा देतात. यंदा ८०० एकरांपर्यंत तूर तर चारशे एकरांपर्यंत गव्हात त्यांनी ही सेवा दिली आहे. प्रशांत यांना वडिलांसह बंधू प्रीतम यांचीही साथ मिळते.

प्रशांत देशमुख ९९७००२३००७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT