Poultry Farming Industry
Poultry Farming Industry Agrowon
यशोगाथा

Poultry Farming : तंत्रज्ञानयुक्त नावारूपास आलेला पोल्ट्री उद्योग

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Poultry Farming: विदर्भात पोल्ट्री व्यवसायाने (Poultry Industry) चांगलेच पाय रोवले आहेत. अनेकांनी उद्योगाचे मोठे जाळे उभे केले आहे. दर्यापूर (जि. अमरावती) येथे डॉ. गजानन वानखडे आणि प्रेमचंद पाटील या दोघा मित्रांनी उभा केलेला ब्रॉयलर कोंबडीपालन व्यवसाय (Broiler Poultry Business) चांगलाच नावारूपाला आला आहे.

विदर्भातील ते ठळक आदर्श उदाहरण आहे. पशुवैद्यकीय विषयातून पदवी घेतलेल्या वानखडे यांनी गोरखपूर, रत्नागिरी (Ratnagiri), पुणे (Pune) या भागांत खासगी कंपन्यांत नोकरी केली. सन १९९९ मध्ये नोकरी सोडत स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला हैदराबाद येथून एक दिवसाचे पक्षी घाऊक पद्धतीने खरेदी व पुढे ते विक्री करीत. नोकरीत असताना पोल्ट्री (Poultry) व्यवसायिकांशी असलेला संपर्क उपयोगी आला. त्याच पोल्ट्रीधारकांना महिन्याला दोन ते अडीच लाख पक्षी पुरवठा व्हायचा. सन १९९९ ते २००५ पर्यंत व्यवसायात सातत्य ठेवले.

जुन्या यंत्रणा केली वापरायोग्य

दरम्यान, सावनेर (जि. नागपूर) तालुक्‍यातील मानेगावचे असलेल्या प्रेमचंद पाटील या मित्रापुढे भागीदारीत पशुखाद्य निर्मिती उद्योग (फीडमिल) उभारण्याचा प्रस्ताव मांडला. सन २००५ मध्ये सुरुवात झाली.

प्रेमचंद यांची घरी पीठ गिरणी होती. त्याच शेडचा उपयोग करण्याचे ठरले. डॉ. वानखेडे यांच्या आजरा (जि. कोल्हापूर) येथील मित्राकडे ग्राइंडर, मिक्‍सर, कन्व्हेअर आदी फिडमिलला लागणारी जुनी यंत्रणा होती.

नवी यंत्रणा खरेदीसाठी भांडवल खर्च करण्यापेक्ष्या हीच जुनी यंत्रणा अवघ्या २५ हजार रुपयांत घेतली. वापराअभावी धूळ खात बंद अवस्थेतील या यंत्रांची दुरुस्ती केली.

काही सुधारणा व काही ‘असेंब्लिंग’ करून यंत्रणा वापरायोग्य केली. पीठगिरणी, थ्रेशर यात वापरल्या जाणाऱ्या मोटारचा वापर केला.

पशुखाद्य निर्मिती

सन २००५ च्या अखेरीस प्रकल्प कार्यान्वित झाला. सोया पेंड (Soya), मका (maize), औषधीजन्य व अन्य घटकांचा वापर करून पशुखाद्य निर्मिती सुरू झाली. नागपूर, छत्तीसगड भागांत विक्रीचे प्रयत्न केले.

संपर्कात वाढ आणि पशुखाद्याचा दर्जा चांगला ठेवल्याने मागणी वाढली. चार वर्षांत टप्प्याटप्प्याने डेक्‍कन ब्रॅण्ड पशुखाद्याची विक्री१४०० ते १५०० टनांवर विक्री पोहोचली.

आधुनिक तंत्राचा पोल्ट्री व्यवसाय

बदलता काळ, बाजारपेठेतील संधी व आर्थिक उलाढाल वाढवण्याच्या संधी दोघा मित्रांनी ओळखल्या. त्यानुसार करार शेतीअंतर्गत ब्रॉयलर कोंबडीपालन व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

हे करताना व्यवसायाचे आधुनिकीकरण व तंत्रज्ञान बदल करणे गरजेचे वाटले. पूर्वीचे डेक्कन हे नाव बदलून ‘व्यंकटेश हॅचरीज ॲण्ड फूड्‌स’ या नावाने कंपनीची नोंदणी २०१७ मध्ये केली.

तंत्रज्ञानभिमुख व्यवसायातील ठळक बाबी

१) आज विदर्भातील सुमारे २२० पोल्ट्री उत्पादकांसोबत करार केला आहे. गोंदिया, गडचिरोली हे दोन जिल्हे सोडून उर्वरित नऊ जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील काही भागांतही हा व्यवसाय विस्तारला आहे.

या शेतकऱ्यांना संपूर्ण तांत्रिक पाठबळ व मार्गदर्शन केले जाते. केवळ पक्षी वाढवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची असते.

२) ब्रीडिंग फार्मची उभारणी- करारावरील पोल्ट्री उद्योगासाठी आवश्‍यक असलेल्या ‘ब्रीडिंग फार्म’ची उभारणी केली आहे. त्याची क्षमता २७ हजार पक्ष्यांची आहे.

या ठिकाणाहून अंडी उत्पादन होते. त्यासाठी जातिवंत पक्ष्यांचे संगोपन केले जाते.

३) हॅचरी- या पक्ष्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अंड्यांना उबविण्याचे काम ‘हॅचरी’त होते. प्रति आठवडा सरासरी एक लाख २० हजार, तर कमाल एक लाख ६० हजार पक्षी अशी हॅचरीची क्षमता आहे.

४) अंड्यातून बाहेर आलेल्या एकदिवसीय पक्ष्यांचा पुरवठा होतो. मात्र त्यापूर्वी त्यांचे स्वयंचलित लसीकरण तंत्राने (ऑटोमेटिक व्हॅक्सीनेटर) लसीकरण होते.

या तंत्रात सेन्सर असतो. पक्ष्यांना इंजेक्शन देण्याचे काम होते. किती डोस दिला त्याची नोंदही होते. या तंत्रामुळे मानवी कामांमुळे होणाऱ्या चुका कमी होऊन काम अचूक होते.

५) पक्षी शेतकऱ्यांकडे पाठवताना ‘कोल्ड चेन’ सुविधा ठेवली आहे. यात गरजू औषधांचा संच सोबत पाठवला जातो. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या भागात एखाद्या औषधांची कमतरता भासू नये.

६) फीडमिल- शेतकऱ्यांची संख्या भरपूर असल्याने प्रति दिन ८० टन पशुखाद्याची गरज भासते. सध्या त्या क्षमतेचे जुने यंत्र आहे.

मात्र नव्याने १० टन उत्पादन प्रति तास या क्षमतेने चालणारे यंत्र घेतले आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. सध्या महिन्याला दोन हजार टन उत्पादन होते.

७) यंत्र संगणकीकृत असून खाद्यातील प्रत्येक घटकाचे किती मिश्रण करायचे याचा ‘मॅन्युअली प्रोग्रॅम’ त्याला दिला जाईल. त्यानुसार यंत्र स्वयंचलित पद्धतीने तेवढी मात्रा काढून घेऊन खाद्याचे मिश्रण करेल.

त्यानंतर स्वयंचलित पद्धतीनेच शिलाई अर्थात पॅकिंग होईल. यंत्राकडून ही हाताळणी असल्याने मानवी चुका कमी होतील.

८) पॅलेट यंत्रही घेतले असून लवकरच तेही कार्यान्वित होईल. कोल्ड प्रेसिंग सोया पेंड प्रकल्पही उभारला जाणार आहे.

शेतकऱ्यांशी करार

साधारण ४० दिवसांची एक बॅच असते. त्या काळात पक्ष्याचे वजन दोन किलो ३०० ग्रॅमपर्यंत होते. त्यानंतर प्रति किलो सहा रुपये दर देऊन पोल्ट्री उत्पादकांकडून पक्षी घेण्यात येतात.

बाजार दर आणि पक्षीवाढ व गुणवत्ता याआधारे ‘इन्सेटिव्ह’ ही देण्याची पद्धती आहे. पक्ष्यांचे पाच टक्‍के मरतुकीचे प्रमाण निश्‍चित करून त्यानुसार पक्षी दिले जातात. या टक्केवारीपेक्षा मरतुक कमी झाल्यास त्याचेही अतिरिक्‍त पैसे दिले जातात.

साधारण पाच हजार पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्याला सरासरी ७० ते ७५ हजार रुपये प्रति बॅचमधून मिळू शकतात.

मका लागवडीस प्रोत्साहन

खाद्यनिर्मितीसाठी आवश्‍यक मका शेतकऱ्यांसह लहान व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहनही दिले आहे. त्यांना पेमेंटही वेळेवर कले जाते.

याद्वारे दीडशे व्यक्‍तींना थेट रोजगार मिळाला आहे. ‘एमव्हीएससी’ (पशुवैद्यकीय पदव्युत्तर पदवी) घेतलेल्या अबोली वानखडे हिने या व्यवसायाची जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे.

मी यापूर्वी अनेक कंपन्यांसोबत पोल्ट्री विषयातील करार शेती केली. परंतु व्यव्सथापन आणि खाद्य गुणवत्ता याबाबत ‘व्यंकटेश’ सोबतचा अनुभव चांगला आला. अपेक्षित परतावाही मिळाला आहे.
आकाश खुरद, लसणापूर, चांदूरबाजार, जि. अमरावती
कोरोना काळात पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला असताना आम्हा शेतकऱ्यांना निश्‍चित परतावा देत ‘व्यंकटेश’ने चांगला आधार दिला.
शिवाजी पवार, पोल्ट्री व्यवसायिक, अंजनगाव सुर्जी, अमरावती

प्रेमचंद पाटील, ९३७३१४४३५६ डॉ. गजानन वानखडे, ९३७००१०११९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT