नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वाखारी) हे पूर्वी दुष्काळी गाव (Drought Village) होते. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीही (Water) मोठा संघर्ष करावा लागे. अशातच १९९४ मध्ये गावातील एक- दोन शेतकऱ्यांनी ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसायाची (Poultry Business) संधी शोधली. मात्र शास्त्रीय ज्ञान, पिले यांची अनुपलब्धता, बाजारपेठेची अडचण यामुळे अल्पावधीत व्यवसाय थांबवावा लागला.
पुन्हा नव्याने ओळख
गावात पाण्यासाठी टँकर सुरू होते. उदरनिर्वाहासाठी सक्षम पर्याय म्हणून १९९८-९९ च्या सुमारास काही शेतकऱ्यांना पुन्हा पोल्ट्री व्यवसायात संधी दिसली. भांडवल नसल्याने बांबू, उसाचे पाचट, घरच्या घरी मातीच्या विटा बनवून त्यांनी पक्षिगृह उभारले. ही प्रयोगशीलता पाहून इतरांचा हुरूप वाढला. एकविचाराने दिशा मिळत गेली. सुरवातीला संघर्ष करावा लागला. शास्त्रीय मार्गदर्शन मिळू लागल्यानंतर भांडवल उपलब्धतेनुसार पक्षिगृह क्षमतेत वाढ झाली. सन १९९९ ते २००५ पर्यंत गावात सात लाख पक्षी संगोपन क्षमतेचे व्यवसाय तयार झाले. आज ही संख्या १० लाखांवर पोहोचली आहे. आज पिंपळगाव (वाखारी) गाव ‘पोल्ट्री क्लस्टर’ म्हणून विकसित झाले आहे. राज्यात ‘कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग’ पद्धतीने व्यवसायाचे जाळे विस्तारले. मात्र व्यक्तिगत पातळीवरील ब्रॉयलर कुक्कुटपालनाचे अधिक प्रमाण याच गावात पाहण्यास मिळते.
प्रयोगशीलता जपलेले गाव
जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायातील आघाडीचे उद्योजक उद्धव अहिरे, श्रीकृष्ण गांगुर्डे, संजय देवरे, अरुण पवार यांचे या गावाशी ऋणानुबंध कायम असून, त्यांचे मार्गदर्शन गावाला मिळते. तज्ज्ञांना निमंत्रित करून समूहचर्चा व तांत्रिक मार्गदर्शन घडवले जाते. दादा निकम, माणिक सोनजे, विलास सोनजे अशी गावातील काही प्रातिनिधिक प्रगतिशील कुक्कुटपालकांची नावे सांगता येतील. काहींनी या व्यवसायातील तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अमेरिका व दक्षिण आफ्रिकेत त्यांना नोकरीची संधी मिळाली आहे. काहींची मुले ‘बी.एस्सी. पोल्ट्री’चे शिक्षण कोइमतूर (तमिळनाडू) येथे घेत आहेत.
देशभरात थेट विक्री जाळे
सन २००४ च्या काळात गुजरात व मुंबईतील व्यापारी व खरेदीदार यांच्याकडे पुरवठ्यासाठी फोनवरून बुकिंग करावे लागे. दरम्यान, गावातील प्रगतिशील कुक्कुटपालक मनोज कापसे यांनी ‘एसटीडी बूथ’ सुरू केला. कुक्कुटपालकांना त्याचा आधार झाला. ज्यांच्याकडे संवाद कौशल्य कमी होते त्यांना मनोज मदत करायचे. आज मोबाईलच्या युगात देशातील व्यापारी, पोल्ट्री उद्योजक, मका व सोयाबीन व्यापारी गावाशी जोडले आहेत. आजही मनोज देशभरात विक्रीसाठी समन्वय साधतात. महाराष्ट्र (मुंबई, पुणे), गुजरात (सुरत, बडोदा, अहमदाबाद, वापी, अंकलेश्वर), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, भोपाळ, इंदूर) व दिल्ली येथे पक्ष्यांची विक्री होते. त्यामुळे दरवाढीसाठी दबाव टाकण्याची ताकद गावात आहे.
नकारात्मकेत उभे राहिले
पोल्ट्री व्यवसायाला २००४ मध्ये बर्ड फ्ल्यूमुळे मोठी झळ बसली. अनेकांकडील भांडवल संपले. शंभर टक्के आर्थिक नुकसान झाले. नैराश्य आले होते. काहींचे विवाह मोडले. नातेवाइकांनी पाठ फिरवली. अशावेळी काही जण खंबीरपणे उभारले. सोने-नाणे गहाण ठेवून भांडवल उभे केले. चिवट संघर्ष करून व्यवसायात टिकून राहिले. एकमेकांना धीर दिला. पुन्हा पक्षी खरेदी करून व्यवसायात उभारी घेतली. अशा अनेक संकटांनी गावकऱ्यांची परीक्षा पाहिली. पण इच्छाशक्ती कामी आली. बर्ड फ्ल्यूमुळे मंदी असताना ग्राहक प्रबोधनासाठी २००४ मध्ये देशातील ग्रामीण भागातील पहिला ‘चिकन फेस्टिव्हल’ देवळा येथे आयोजित केला. त्याची दखल राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी घेतली.
गावातील पोल्ट्री व्यवसाय- ठळक मुद्दे
-गावातील कुक्कुटपालक- ७० ते ८०
-१५,०० पासून ते ३० हजार पक्षी संगोपन क्षमता.
-प्रति बॅच सरासरी २ ते २.५ लाख पक्षी ‘प्लेसमेंट’
-गावातील एकूण क्षेत्र: २,६४३ हेक्टर, पैकी कृषक क्षेत्र : १,९९१ हेक्टर
-१२०० हेक्टर मकाक्षेत्र.
संघटितपणे कामकाज
-गावात कुठलीही नोंदणीकृत संघटना नाही. मात्र सामूहिक निर्णयातून दिशा हे कामकाजाचे सूत्र.
-व्यवसाय उभारणी, भांडवल, पक्षी संगोपन, रोग प्रादुर्भाव नियंत्रण व तयार पक्षी विक्रीसाठी चर्चा व नवीन घटकांना मार्गदर्शन
-कुकुटटपालकाच्या गरजेनुसार सामूहिक पद्धतीने मका, सोया पेंड खरेदी व वितरण
--दैनंदिन खाद्यपुरवठा, औषधे, आरोग्य, वजन, मरतुक याबाबत दैनंदिन नोंदी. परिसरात रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास एकमेकांच्या सल्ल्याने एकात्मिक नियंत्रणावर भर. गरजेनुसार पशुवैद्यकांची मदत.
-मका, सोयापेंड, खनिजद्रव्ये, औषधी घटक यांचे मिश्रण करून खाद्याची संतुलित पद्धतीने घरगुती निर्मिती.
-प्लेसमेंट करण्यापूर्वी भांड्यांची स्वच्छता व पक्षिगृह निर्जंतुकीकरण. पक्ष्यांची मरतुक कमी होण्यासाठी जैवसुरक्षेकडे विशेष लक्ष. खाद्य खराब होऊ नये यासाठी स्वच्छ व कोरडे वातावरण.
-पाणीटाक्या सावलीत ठेवण्याची व्यवस्था; पाण्यातील सामू नियंत्रण, स्वच्छता व निर्जंतुकीकरणावर भर
-अपेक्षित वजनवाढ होऊन ४२ ते ४५ दिवसांत पक्षीविक्री.
अर्थकारण बदलले
पिंपळगाव वाखारीच्या ग्रामविकासात पोल्ट्रीचा मोठा वाटा राहिला आहे. पूर्वी येथे मका पीक घेतले जात नव्हते. आज गावपरिसरात ते मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. मक्याची खरेदी-विक्री येथे होऊ लागल्याने १० ते १२ स्थानिक व्यापारी तयार झाले. शेतकऱ्यांना दरही चांगला मिळू लागला. भूमिहीन व अल्पभूधारकांना पक्षी संगोपन, वाहतूक व्यवसाय, मजुरी यात स्थानिक रोजगाराच्या संधी मिळाल्या. अनेकांची आर्थिक पत वाढली. टुमदार बंगले झाले. मुलांना उच्च शिक्षण देता आले. व्यावसायिक दृष्टिकोन रुजलाच. शिवाय जीवनपद्धती सुधारली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.