Poultry
Poultry Agrowon
यशोगाथा

Poultry : कृषिपूरक व्यवसायातून सावरले घर!

Raj Chougule

तळसंदे येथील अनिता व शरद जाधव हे जोडपे. शरद यांची खासगी नोकरी, वडिलोपार्जित शेती यातून टुकीचा संसार चालला होता. मात्र सहा वर्षांपूर्वी अचानक शरद यांना मणक्याचा त्रास सुरू झाला. नोकरी सोडावी लागली. वास्तविक उत्पन्नाचा (Income Source) एक स्रोत कमी झाल्यामुळे ताण वाढला असला तरी एकमेकांना धीर देत त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. नोकरी नसली म्हणून काय झाले आपल्याला शेती (Agriculture) तर आहे असा विचार केला. या शेतीलाच शेतीपूरक व्यवसायाची (Agriculture Based Business) जोड दिली. हळूहळू गाईंची संख्या वाढवली. ब्रॉयलर (Broiler) आणि देशी कोंबडीपालन (Indigenous Poultry) सुरू केले. यश मिळत गेले तसा त्यांचा आत्मविश्‍वास वाढत गेला.

एक वर्षापूर्वी कोरोनामुळे शरद यांचे आई -वडील यांचे निधन झाले. वाट्याला आलेल्या साडेतीन एकर शेतीमध्ये ऊस उत्पादन घेतले. या शेतीतही तीन चतुर्थांश सेंद्रिय खते, तर एक चतुर्थांश रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि खर्चात बचतही साधते. त्यातून गत वर्षी एकरी ५० टन इतके उत्पादन मिळाले. त्याला गेल्या वर्षी प्रति टन २९७० रुपये दर मिळाला. साधारणपणे ऊस शेतीमध्ये एक लाखापर्यंत खर्च येतो.

गोठ्यावर चालतो आर्थिक गाडा

सहा वर्षांपूर्वी नोकरी सोडावी लागल्यानंतर कुटुंबाचा आर्थिक गाडा रुळावरून घसरला होता. तो पुन्हा मार्गावर येण्यासाठी वाटणीतून मिळालेल्या एका एचएफ गाईपासून गोपालन सुरू केले. कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून घरीच वंशावळ वाढवत अकरा गाईंपर्यंत गोठा नेला होता. मात्र शेती व व्याप यामुळे सध्या सहा लहान मोठ्या एचएफ गाई ठेवल्या आहेत. त्यातील चार दुधामध्ये आहेत. अनिता व शरद यांनी समन्वयाने मजुराशिवाय गोठा फायद्यात आणला. चाऱ्यासाठी बांधावर हत्ती घास लावले आहे. अतिरिक्त जमीन न अडकवता चारा उपलब्धतेचा त्यांचा प्रयत्न असतो. चाऱ्याव्यतिरिक्त गोठ्याची सर्व जबाबदारी अनिता सांभाळतात.

-सुरुवातीला हाताने धारा काढल्या जात. मात्र आता धारा काढण्याचे यंत्र घेतले आहे.

-जनावरांना सकाळी सहा ते दहा व सायंकाळी चार ते सहा या वेळेत चारा, पाणी, पशू आहार दिला जातो. जनावराकडून मिळणाऱ्या प्रति लिटर दुधामागे तीनशे ग्रॅम गोळी पेंड, एक किलो गहू भुस्सा व ४०० ग्रॅम सरकी पेंड दिली जाते. प्रति जनावर ५० ग्रॅम मीठ व दहा ग्रॅम खायचा सोडा दिला जातो.

-प्रत्येक गाय ६ ते १२ लिटर पर्यंत दिवसाला दूध देते. गाईंच्या वेतानुसार दररोज ३५ ते ६० लिटरपर्यंत दूध संघास दिले जाते. गेल्या वर्षी जाधव कुटुंबीयांना सर्वाधिक दूध पुरवठा केल्याबद्दल दूध संघाकडून बक्षीसही मिळाले आहे.

- या दुधाच्या विक्रीतून दहा दिवसाला दहा ते पंधरा हजार रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता ५००० ते ७००० हजार रुपयांचा निव्वळ नफा राहतो. त्यातून दरमहा पंधरा ते वीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे अनिता सांगतात. हे उत्पन्न एकेकाळी नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.

- जनावरांपासून प्रति वर्ष दहा ते अकरा ट्रॉल्या शेणखत मिळते. एक वर्षाआड स्वतःच्या शेतात आणि खताची विक्री असे नियोजन बसवले आहे. त्यातून एक वर्षाआड अडीच हजार रुपये प्रति ट्रॉलीप्रमाणे उत्पन्न हाती येते.

ब्रॉयलर कोंबड्यांचा व्यवसाय

शरद यांनी अन्य एका शेतकऱ्याचे कोंबडीपालनाचे शेड दीड लाख प्रति वर्ष असे पाच वर्षापासून भाडेपट्टीवर घेतले आहे. ३ हजार पक्ष्यांची एक बॅच असते. कोंबडीपालनाची जबाबदारी प्रामुख्याने शरद सांभाळतात. खाद्य, तापमान आणि पक्ष्यांचे देखभाल यांचे व्यवस्थापन केले जाते. ४५ दिवसामध्ये १.५ एफसीआरचा पक्षी झाल्यानंतर कंपनीला दिले जातात. त्यातून सुमारे ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. भुस्सा किंवा अन्य किरकोळ व्यवस्थापनाचा १० हजार खर्च वजा निव्वळ उत्पन्न ३० हजार रुपये इतके हाती येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

ताज्या व खेळत्या उत्पन्नासाठी देशी कोंबडीपालन

गेल्या सहा वर्षांपासून गावरान कोंबडीपालनही केले जाते. प्रति पक्षी एक वर्ग फूट याप्रमाणे पाचशे वर्गफुटांचे शेड उभारले आहे. वर्षभरात जुलै व डिसेंबर या महिन्यामध्ये गावरान कोंबड्यांना सर्वाधिक मागणी असते. या काळात जास्तीत जास्त पक्षी उपलब्ध होतील या बेताने नियोजन केले जाते. आषाढ, जत्रा, यात्रा या काळातही ग्रामस्थ शेडवरून कोंबड्या खरेदी करतात. ही खरेदी प्रामुख्याने नगावर होते. काही कोंबड्या चिकन दुकानदारांनाही दिल्या जातात. त्यांच्याकडून प्रति किलो १५० ते १६० रुपये असा दर मिळतो. दोन ते तीन महिन्यामध्ये पक्षी विकण्यायोग्य होतो. वर्षाला सरासरी चार बॅच तरी निघतात. या गावरान कोंबडीपालनातून खर्च वजा जाता प्रति बॅच ४० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. हे उत्पन्न ताजे व खेळते असल्याने दैनंदिन खर्च व अडचणीमध्ये उपयोगी येते.

अनुभवातून येत गेली कणखरता

पती शरद यांना नोकरी सोडावी लागल्यानंतर काही क्षण आपले कसे होणार, ही भीती मनात आली असली तरी अनिता जाधव वेगाने सावरल्या. शिक्षण कमी असले तरी पूरक व्यवसायात प्रशिक्षणे, स्वानुभव यातून नवनवीन गोष्टी शिकून घेण्याकडे त्यांचा कल असतो. येणाऱ्या टक्क्याटोणप्यातूनच चांगले वाईट अनुभव येत गेले. त्यातून त्यांची कणखरता वाढत गेली. मणक्यांचा आजार असला, तरी पती शरद हे सतत धडपड करत असतात. त्यांची मोठी मुलगी श्रुती बारावीला, तर मुलगा कार्तिक दहावीला आहे. तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्राचे तांत्रिक मार्गदर्शन आणि अनिता यांचे बंधू संदीप मगदूम यांचा आधार या सर्व काळात अत्यंत महत्त्वाचा ठरला असल्याचे जाधव कुटुंबीय आवर्जून सांगतात.

अनिता जाधव, ८४०७९९७५१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

Painganga Project : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

SCROLL FOR NEXT