Poultry Farming Agrowon
यशोगाथा

Poultry Farming : आता थांबायचे नाही...

Poultry Farming Management : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील दुर्गम मांडवी गाव. पावसावर आधारित शेती. पाणी, विजेच्या समस्या, डोंगराळ भाग. अशा विविध संकटांवर मात करून येथील पवन चितोड या युवा शेतकऱ्याने कमी भांडवल व खर्चात कोंबडीपालन सुरू केले.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Farmer Success Story : आदिवासी बहुल व दुर्गम अशी नंदूरबार जिल्ह्याची ओळख आहे. मिरची, पपई पिकात जिल्ह्याने ओळख तयार केली आहे. इथल्या अक्कलकुवा, धडगाव या तालुक्यांतील मोठे क्षेत्र सातपुडा पर्वतरांगांमध्ये येते. धडगाव तालुक्यातील मांडवी येथील युवा शेतकरी पवन चितोड यांची सात एकर शेती आहे.

परंतु ती मुरमाड, हलकी व डोंगराळ क्षेत्रात आहे. जमीन तीव्र उताराची आहे. कूपनलिकेस चांगला किंवा बारमाही पुरेल एवढा जलस्रोत नाही. गाव नमर्दाकाठी आहे. पण नदीतील पाणी शेतात आणून शेतीला ते बारमाही उपलब्ध करून घेणे शक्य नाही. पावसाचे पाणी अडविण्याची ठोस सुविधा नाही. विजेची समस्या आहे. त्यामुळे शेती पावसावरच आधारित आहे. पवन त्यात मका, ज्वारी आदी पिके घेतात. समाधानकारक असे उत्पन्न शेतीतून मिळत नाही.

पूरक व्यवसाय ठरला आधार

पवन यांनी विज्ञान तसेच कला शाखेत पदवी घेतले आहे. त्यांनी रक्त तपासणी प्रयोगशाळेत तीन वर्षे नोकरी केली. परंतु वेतन अत्यंत अपुरे होते. धावपळ खूप व्हायची. अखेर पशुवैद्यक काका हेमंत चितोड व वडिलांकडे आर्थिक मदत मागून व्यावसायिक कोंबडीपालन व्यवसायाचा इरादा त्यांच्याकडे स्पष्ट केला.

घरी परसबागेत कोंबड्या चरायच्या. त्यामुळे थोडा अनुभव होताच. पण चांगला आर्थिक स्रोत तयार करण्याइतपत व्यवसायाची मजल गेली पाहिजे असे पवन यांनी ठरवले. धडगाव व परिसरातील हा व्यवसाय करणाऱ्या युवकांकडे भेट देत व यू-ट्यूबच्या माध्यमातून संधी, नफा, धोके समजावून घेतले.

कमी खर्चिक संगोपनगृह

कोणताही अनुभव नसला तरी पवन यांनी धाडस करून व जोखीम पत्करून व्यवसायाला सुरुवात केली. वडील व काका यांच्याकडून मिळालेल्या दीड लाखांच्या भांडवलावर कमी खर्चिक संगोपनगृह उभारले. सुमारे ४५ बाय २० फूट लांबी-रुंदी, मध्यभागातील उंची १० फूट, तर आजूबाजूची उंची आठ फूट अशी त्याची रचना आहे.

अधिकाधिक बांबूचा वापर केल्याने उष्णतेपासून पक्ष्यांचा बचाव होतो. पत्र्याचे छप्पर व उष्णता रोधण्यासाठी त्यावरही आच्छादन आहे. संगोपनगृहाला हिरवी नेट बांधली आहे. आत पाऊस, पाणी येऊ नये म्हणून नेटला प्लॅस्टिक बांधले आहे.

पवन यांच्या व्यवस्थापनातील बाबी

मुख्यतः कावेरी व काही प्रमाणात सोनाली जातीच्या पक्षांची निवड. संगोपन मुख्यतः चिकनसाठीच.

या कोंबड्या काटक असून मरतुकीचे प्रमाण कमी असते.

कावेरी कोंबडी वर्षभरात १५० ते १८० पर्यंत अंडी देते.

नंदूरबार येथून एक दिवसाचे पिलू आणले जाते. साधारण साडेतीन महिन्यांची बॅच असते. त्यानंतर पक्षी विक्रीयोग्य होतो. वर्षभरात सुमारे तीन बॅचेस होतात.

मक्याचा भरडा, सोयाबीनचा भुसा व गहू भरडा आदी खाद्य देण्यात येते. काही खाद्य घरच्या शेतातील असते. तर काही खरेदी करावे लागते. अधिकाधिक वेळ पक्ष्यांना घरानजीक, शेतात विहारासाठी सोडण्यात येते. खाद्यावरील खर्च ३० टक्क्यांपर्यंत आहे.

विक्री व्यवस्थापन

धडगाव येथे दर सोमवारी बाजार भरतो. तेथे पवन पक्ष्यांची विक्री करतात. येथून खरेदी केल्यानंतर खरेदीदार परिसरातील हॉटेल्स, नंदुरबार, शहादा, तळोदा येथील बाजारात पुढील विक्री करतात.मांडवी गाव मोठे आहे.

यामुळे ग्राहक घरी येऊनही पक्षी घेऊन जातात. कोंबड्याला ८०० ते ९०० रुपयांपर्यंत, तर कोंबडीला ४०० ते कमाल ६०० रुपयांपर्यंत दर मिळतो. थेट विक्रीतून नफ्याचे प्रमाण वाढते. चिकन हाच मुख्य उद्देश असल्याने अंडी उत्पादन कमी प्रमाणात केले जाते.

आश्‍वासक अर्थकारण

पवन सांगतात की शेती केवळ पावसाळ्यात होते. वर्षातील उर्वरित महिने उत्पन्नाचा स्रोत नाही. नोकरीतील पगारातूनही समाधानकारक रक्कम मिळत नव्हती. त्या तुलनेत कोंबडीपालनातून महिन्याला आर्थिक आधार मिळू लागला आहे. हिवाळ्यात नफा वाढतो. अर्थकारण अजून उंचावण्यासाठी अकरा महिन्यांपूर्वी शेळीपालनही सुरू केले आहे. राजस्थानातील सोजत हा वाण असून, सध्या १६ पर्यंत शेळ्यांची संख्या आहे.

शेळ्यांची विक्रीही येथे स्थानिक आठवडी बाजारात केली जाते. त्यात एक लाख ६० हजारांची गुंतवणूक केली आहे. कोंबडीपालन व आर्थिक उत्पन्न अजून वाढवायचे आहे. आत्मविश्‍वास व उत्साह वाढला आहे. परिसरातील परिस्थिती प्रतिकूल आहे. पण त्यावर मात करून प्रगती करायची आहे, आता थांबायचे नाही अशी प्रतिक्रिया पवन यांनी दिली आहे. पवन यांचे लहान बंधू आशिष महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. वडील, काका यांच्यासह डॉ. महेश गणापुरे, डॉ. अनिल पावरा आदींचे सहकार्य आहे.

धडगाव कुक्कुटपालनाचे क्लस्टर

धडगाव तालुक्यातील अनेक गावे व पाड्यांमधून कुक्कुटपालन केले जाते. दररोज १८०० पेक्षा अधिक अंड्यांचे (प्रामुख्याने गावरान) उत्पादन घेण्यात येते. शेतकरी परिसरातील हॉटेल्स व्यावसायिक, खरेदीदारांना मांसल पक्षी व अंडी पुरवितात. काहींनी हॉटेल्ससोबत करार केले आहेत.

त्यामुळे पुरवठा - खरेदीची हमी तयार झाली आहे. अंगणवाड्या तसेच दैनंदिन आहारातही मांसल पक्षी, अंड्यांचा उपयोग मोठा आहे. त्यामुळे मागणी अधिक व उत्पादन कमी अशी स्थिती अनेकदा असते.

पवन चितोड ७४९९६८५६६०, ७२७६२५७९४१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT