Horticulture Agrowon
यशोगाथा

Horticulture : वयाच्या शहात्तरीत समृध्द फळबाग, लाखीबाग

डामरे (जि. सिंधुदुर्ग,ता.कणकवली) येथील विजय कुडतरकर यांनी वयाच्या शहात्तरीतही तरुणांना लाजवेल या उत्साहाने व तडफेने पाच एकरांत शेती फुलवली आहे. ‘ॲग्रोवन’ दैनिकाचे नियमित वाचक असलेल्या विजय यांनी त्यातील माहिती- ज्ञानाचा पुरेपूर फायदा व प्रेरणा घेत लाखी बाग, मिश्र- आंतरपीक पद्धतीची फळबाग शेती सेंद्रिय पद्धतीने विकसित केली आहे.

एकनाथ पवार

सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवली-फोंडा या राज्यमार्गावर डामरे गाव आहे. येथील बहुतांशी शेतकरी मोठ्या प्रमाणात भात घेतात. काजूचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील रहिवासी मात्र मूळ गाव करूळ असलेले विजय बाबूराव कुडतरकर यांनी नोकरीसाठी मुंबई गाठली. तेथे इंटर सायन्सपर्यत (बारावी) शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एका प्रसिद्ध खासगी कंपनीत प्रामाणिक आणि मेहनतीच्या जोरावर १५ वर्षे यशस्वी नोकरी केली. स्वतःचा व्यवसाय असावा असे त्यांना सतत वाटे. त्यामुळे राजीनामा देत मुंबईत व्यवसाय सुरू केला. त्यात चांगला जम बसविला. परंतु गावाकडची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. लहानपणापासून शेतीची आवड होतीच.

ॲग्रोवनने दिली दिशा-

एकेदिवशी वाचनात ॲग्रोवनचा अंक आला. पहिल्याच अंकापासून ते ॲग्रोवनचे वाचक बनले. त्यातील माहिती, ज्ञान घेत अंक संग्रही ठेवणे हा त्यांचा नित्यक्रमच बनला. त्यातून शेतीतील विविध प्रयोग, तंत्रज्ञान, पद्धती समजू लागल्या. सेंद्रिय शेतीची (Organic Farming) दिशा मिळाली. विविध तज्ज्ञांशी ते चर्चा करू लागले. करूळ येथे त्यांची अवघी अर्धा एकर जमीन होती. मग कणकवली-फोंडा रस्त्यालगत पाच एकर जमीन खरेदी करून शेतीत प्रगती करायचे ठरवले. सकाळ माध्यम समुहाच्या ‘एसआयएलसी’ येथून सुमारे ९ तर अन्य संस्थांमधून अशी एकूण २० पर्यंत प्रशिक्षणे घेतली. यात सेंद्रिय शेती, ‘ॲग्रो टुरिझम’, (Agro Tourism) शेतीतील कौशल्य विकास, विविध पिके, प्रक्रिया, मधमाशी, कुक्कुट (Poultry) व शेळीपालन (Goat Farming) आदींचा समावेश राहिला.

शेतीचा विकास

साधारण २०१२ चा हा काळ होता. सेंद्रिय पद्धतीनेच शेती करायचे नक्की केले. विहीरीसोबत शेततलावाची उभारणी केली. दोन एकरांत काजू लागवड केली. त्यात सुरवातीची तीन वर्षे सेंद्रिय पद्धतीनेच कलिंगड घेतले. नारळ बागेत अननसाचे आंतरपीक घेतले. आले, हळद लागवड केली. आज पाच एकरांत मिश्र- आंतरपीक पद्धती फुलवली आहे. दोन एकरांत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या लाखी बागेप्रमाणे बाग विकसित केली आहे. यात प्रत्येकी २५ फुटांवर नारळ, १० फुटांवर मसाले पिके, मध्यभागी जायफळ व काही सुपारी झाडे अशी पद्धती आहे.

पिकांची समृद्धी व व्यवस्थापन

-काजू सुमारे २००, सुपारी २५०, नारळ २५०, साग ३००, बांबूची १०० झाडे.

-आंबा, विविध जातीचे फणस, सीताफळ, रामफळ, चिकू, पेरू, अंजीर, मोसंबी, पपनस, संत्रा, ॲपलबोर, कोकम, वेलवेट ॲपल, जांभूळ, आवळा, त्रिफळ, चिंच, कडुनिंब, करवंद, ऑस्ट्रेलियन

साग, केळी, शेवगा, पपई, कवठ, रूद्राक्ष, कॉफी, ब्रम्हकमळ, जाम, दालचिनी, जायफळ, रक्तचंदन, काळी मिरी, सोनचाफा आदी.

-तीन देशी गायी. गूळ, बेसन, शेण, गोमूत्र, माती यांच्या वापरातून जीवामृत निर्मिती. त्यासाठी १५०० लिटरची टाकी. ठिबक सिंचनाद्वारे महिन्यातून दोनदा जीवामृत बागेला दिले जाते.

-२० मीटर बाय १५ मीटरचे शेततळे बांधण्यात येत आहे.

-कंपोस्ट खत निर्मितीसाठी दहा बाय दहा फुटाचा खड्डा. त्यात साफसफाई केलेले तण, ओला सुका-पालापाचोळा व काही प्रमाणात शेण वापरले जाते.

प्रातिनिधीक उत्पादन व विक्री व्यवस्था

काजूचे प्रति झाड ८ ते १० किलो उत्पादन मिळते. काजुगराला प्रति किलो १४० रुपये दर मिळतो. दीड एकरांत २० टन कलिंगड उत्पादन मिळते. नगाला ४० ते ५० रुपये दर मिळतो. नारळ बागेत अडीच हजार अननस आहेत. मागील वर्षी एक एकरांत सुमारे दीडहजार अननस मिळाले. प्रति नग ३० ते ३५ रुपये दर मिळतो. लाखी बागेतील नारळ उत्पादन यंदापासून सुरू झाले आहे. विजय यांचे रस्त्याकडेलाच छोटे हॉटेल आहे. तेथेच स्वतंत्र स्टॉल उभारून उत्पादनाची थेट विक्री होते. कणकवली-फोंडा मार्गावरील प्रवाशांची येथे चांगली रेलचेल असते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे जाण्याची गरज शक्यतो भासत नाही. आले, हळद, भाजीपाला व एकूणच सर्व उत्पादने सेंद्रिय असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी असते. दरही चांगला मिळतो. विजय गावरान कुक्कुटपालनही करतात. आजूबाजूच्या गावांतील ग्राहक स्वतः येऊन खरेदी करतात. सर्व विक्रीतून काही लाख रुपयांची उलाढाल होते.

विजय यांना पत्नी स्मिता यांची समर्थ साथ आहे. मुलगा अतुल इंजिनियर तर मुलगी वैशली डॉक्टर आहे. आपल्या बागेचे नामकरण घरच्यांच्या नावांवरून अस्मिता असे केले आहे.

सन २०१० पासून ॲग्रोवनचा संग्रह

कुडतरकर यांचा ॲग्रोवन हा कायमचा सोबती ठरला आहे. सन २०१० पासून अंकांचा संग्रह त्यांनी केला आहे. गरजेनुसार त्या त्या अंकातील माहितीचा वापर करून ते शेतीत प्रयोग करतात.

‘इको टुरिझम’च्या दृष्टीने रचना-

बाग रस्त्यालगत आहे. त्यात पिकांची विविधता मोठी आहे. साहजिकच ‘इको टुरिझम’विकसित करण्याचा पुढील प्रयत्न आहे. पर्यटकांना एकाच जागी विविध फळांची चव चाखता यावी व निसर्गाचा आनंद घेता यावा हा हेतू आहे.

या वयात प्रशिक्षण कशासाठी?

कुडतरकर यांचे सध्याचे वय ७६ वर्षे आहे. त्यांनी ६५ ते ७० या वयोवर्षांच्या काळात सुमारे दहा ते बारा किंबहुना अधिक प्रशिक्षणे घेतली. अनेकजण त्यांना या वयात प्रशिक्षण का घेता असे विचारत. त्यावर शेती अधिकाधिक समृध्द करण्यासाठी, त्यातील बारकावे समजून घेण्यासाठी वय महत्त्वाचे नसते हा बोध त्यांनी आपल्या उत्तरातून सर्वांना दिला आहे.

विजय कुडतरकर- ९९६०६३४८९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT