Agriculture Success Story  Agrowon
यशोगाथा

Agriculture Management : चौदा वर्षांपासून ठेवला नाही मजूर

Successful Agriculture : मागील चौदा वर्षांपासून कुटुंबाने एकही मजूर ठेवलेला नाही. कष्ट भरपूर आहेत. समस्याही कमी नाहीत. परंतु कुटुंबातील एकोप्यातून त्यांचे निवारण करीत आपली शेती यशस्वी व नफ्याची करण्यात हे कुटुंब यशस्वी झाले आहे.

माणिक रासवे

Agriculture Success Story : शेतीतील मजूरसमस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे नुकसान होण्याबरोबर उत्पादन खर्च वाढून शेतीतील नफा मात्र अत्यंत कमी झाला आहे. अशा प्रतिकूलतेत एकत्रित कुटुंब पद्धती टिकवून धरण्यासह घरातील सर्व सदस्य शेतीत राबत असल्याने शेती फायदेशीर करण्यात सिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील कदम कुटुंब यशस्वी झाले आहे. परभणी शहरापासून १० दहा किलोमीटरवर सिंगणापूर आहे.

येथील पांडुरंग श्यामराव कदम नव्वदीच्या वयातील शेतकरी आहेत. त्यांना हरिभाऊ, विजयकुमार, प्रभाकर, डिंगाबर ही चार मुले आहेत. एकत्रित कुटुंबात सुमारे १६ सदस्य असून एकाच घरात सर्वजण राहतात. गावापासून दोन किलोमीटरवरील शिवारात १२ एकर तर बोरवंड शिवारात चार एकर अशी एकूण १६ त्यांची शेती आहे. सिंचनासाठी विहीर, बोअर आहे. सौर पंप बसविल्याने

वीज भारनियमनाच्या काळातही पिकांना पाणी देता येते. सिंगणापूर शिवारातील शेतीला लागून जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची चारी गेली आहे. परंतु कदम कुटुंब विहिरीच्या पाण्याचा प्रामुख्याने वापर करतात.

पीक पद्धती

 सुमारे चार एकरांत बारमाही भाजीपाला. यात टोमॅटो,, कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर, मिरची, कांदा,लसूण आदींचा समावेश.

 लिंबाच्या साई सरबती वाणाची सुमारे ३०० झाडे. अंजीर दीड एकरांत. भाजीपाला पिकांमध्ये मजूरबळ खूप लागत असल्याने त्याचे क्षेत्र कमी करून ऊसक्षेत्र वाढवले आहे. यंदा आठ एकरांत ऊस.

 चारा व हंगामी पिकेही आहेत. बांधावर फणस, सीताफळ, चिकू,आंबा, नारळ, हनुमान फळ, आवळा, पेरू, खजूर, कढीपत्ता, बांबू.

संपूर्ण कुटुंब राबतेय शेतात

सन २०१० पासून शेतीत एकही मजूर न ठेवता कुटुंबातील पुरुष व महिला सदस्यच मशागत, पेरणी, काढणी, मळणी, प्रतवारी ते अगदी विक्रीपर्यंतची सर्व कामे करतात. कुटुंबातील महिला सदस्य व्दारकाबाई, सुरेखाबाई, जनाबाई, सखूबाई या घरकाम, जबाबदाऱ्या सांभाळून शेतीकडेही तेवढेच लक्ष देतात. सर्वजण पहाटे पाच वाजता उठतात. सकाळी लवकर घरची कामे सांभाळून शेताकडे जाण्याची त्यांची लगबग सुरू होते. संध्याकाळी उशिरापर्यंत सर्वजण कामांत व्यस्त राहतात.

प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी

काही वर्षांपूर्वी मूळ चार भावांच्या कुटुंबाचे विभाजन होऊन पांडुरंगरावांच्या वाट्याला १४ एकर जमीन आली. पूर्वी ते सर्व जबाबदारी पाहात. आता वयोमानानुसार थकले आहेत. परंतु शेतात बांधलेल्या दोन खोल्यांच्या घरामध्ये ते वास्तव्यास असतात. चालता फिरता त्यांचे मुला-सुनांच्या कामांवर लक्ष असते. प्रत्येक कदम बंधूने स्वतंत्र जबाबदारी उचलली आहे. पैकी थोरले हरिभाऊ पदवीधर आहेत. ते जवळच्या साखर कारखान्यात सेवेत आहेत.

नोकरी सांभाळून ते शक्य त्या वेळेस शेतीकडे लक्ष देतात. दुसऱ्या क्रमांकाचे विजयकुमार कुटुंब प्रमुख म्हणून विविध जबाबदाऱ्या निभावतात. फळे-भाजीपाला काढणी, स्वच्छता, प्रतवारी यासह परभणी मार्केटला शेतमाल विक्रीसाठी नेणे, निविष्ठांची खरेदी आदी कामे पाहतात.

प्रभाकर यांच्याकडे लिंबू आणि अंजीर फळबाग व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. तर धाकटे डिगांबर नांगरणी, वखरणी,कोळपणी आदी कामे, पशुधन आहार व्यवस्थापन, दूध काढणे आदी कामे सांभाळतात. दररोज सकाळी-संध्याकाळी शेतातील आखाड्यावर सर्व भावांची बैठक होते. त्यावेळी दिवसभरातील कामांचा आढावा घेऊन दुसऱ्या दिवशीच्या कामांचे नियोजन केले जाते.

उत्पादन, विक्री

कोणत्याही मजुरांच्या मदतीविना केलेली शेती कदम कुटुंबाचे अर्थकारण उंचावणारी ठरली आहे. खट्टा व मंठा बहरात लिंबू घेण्यात येतो. प्रति झाड ६० किलोपर्यंत उत्पादन मिळत आहे. त्याला हंगामानुसार प्रति किलो ३० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. भाजीपाला, लिंबाची परभणी मार्केटला विक्री होते.

अंजिराचे दिनकर वाण असून मागील वर्षी दीड एकरांत दोन टनांपर्यंत उत्पादन मिळाले. त्याचा हंगाम फेब्रुवारीपासून सुरु होतो. परभणी शहरातील मार्केटमध्ये हंगामात विजयकुमार दररोज स्वतः बसून १०० रुपये प्रति किलो दराने थेट ग्राहकांना विक्री करतात.

हाच माल व्यापाऱ्यांना दिला असता तर ५० रुपयांपर्यंतचा दर मिळाला असता असे ते सांगतात. उसातील मेथीच्या एकरांत सहाहजार ते सातहजारांपर्यंत पेंढ्या मिळतात. एक बैलजोडी असून शेतीत बैलचलित अवजारांचा वापर होतो. गाय व म्हैस असून घरच्या पुरते दूध उपलब्ध होते. दरवर्षी ३० बैलगाड्या शेणखत मिळते. शेतीत त्याचा वापर होतो. त्यातून रासायनिक खतांचा वापर व खर्च कमी झाला आहे.

उंचावले अर्थकारण

मजुरांचा जराही वापर नसल्याने मोठी आर्थिक बचत झाली आहे. नफ्याचे प्रमाण वाढले आहे. शेतीतील उत्पन्नातून दरवर्षी ठराविक रकमेची बचत केली जाते. त्यातूनच दोन एकर जमीन खरेदी केली आहे. गावातील जुन्या माळवद घराच्या जागी सिमेंटच्या पक्क्या घराचे बांधकाम केले आहे.

शेतात दोन खोल्यांचे घर व जनावरांसाठी शेड बांधकाम केले आहे. शेतीतील उत्पन्नातूनच कुटुंबातील दोन मुलींचे विवाह करता आले. नव्या पिढीतील नागेश (बी.एस्सी.कृषी), तेजस (बी.कॉम.),योगेश (आयटीआय),आरती (बी.एस्सी.), प्रांजली (बीसीएस.),प्रद्युम्न (एसएससी.) यांना उच्चशिक्षण घेणे शक्य झाले आहे.

विजयकुमार कदम ९५५२४६६९८९, प्रभाकर कदम ९९२१५६३४३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT