Dudhi Bhopla Agrowon
यशोगाथा

Dudhi Bhopla : दुधी आणि लाल भोपळ्याची बाजारात वर्षभर चलती

नगदी प्रमुख भाजीपाला, फळांकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल आहे. असे असतानाबाजारपेठांतील वर्षभराची मागणी व दर यांचा अभ्यास करून भोपळावर्गीय म्हणजे दुधी व लाल भोपळा (डांगर) ही पिके अनेक वर्षांपासून टिकवून ती यशस्वी करणारे शेतकरीही आहेत.

गणेश कोरे

Vegetable Market : दुधी आणि लाल अशा दोन्ही भोपळ्यांना (Pumpkin) वर्षभर मागणी असते. साहजिकच विविध बाजांरात त्यांची कायम रेलचेल असते. पुणे- गुलटेकडी बाजार समिती ही भोपळ्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे.

येथे दुधी भोपळ्याची आवक पुणे जिल्‍ह्यातील विविध तालुक्यांसह, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातून होते. हा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर तसेच मार्च ते जून दरम्यान असल्याची माहिती पुणे बाजार समितीमधील अडतदार सचिन गायकवाड यांनी दिली. या हंगामात दररोज दीड ते दोन हजार क्रेटस् आणि १० किलोच्या प्लॅस्टिक पिशव्यांमधून होते.

मागणी, लांबी, वजनानुसार दर

भोपळ्याला आकार आणि वजनानुसार दर मिळतात. ३०० ते ४०० ग्रॅम (लांबी सुमारे २० सेंटीमीटर) भोपळ्याला सरासरी २० रुपये प्रति किलो, ७०० ते ८०० ग्रॅम (लांबी २० ते २५ सेमी.) १० ते १२ रुपये तर दीड- दोन किलो (लांबी २५ ते ३० सेंमी.) भोपळ्याला ५ रुपये दर मिळतो. तीनशे ते ४०० ग्रॅम दुधीला सर्वाधिक मागणी आणि दर मिळतो.

मागणी

किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांकडून मागणी असते. हॉटेल व्यावसायिकांकडून मोठ्या भोपळ्याला मागणी राहते. विविध शहरांमध्ये सकाळी टेकडी, बागांमध्ये व्यायामानिमित्त फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यांच्याकडून दुधीच्या रसाला वाढती मागणी आहे.

लाल भोपळ्याची बाजारपेठ

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाल भोपळ्याच्या आवके बाबत प्रमुख अडतदार सचिन हराळे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की आवक प्रामुख्याने कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथून होते.

त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, टेंभुर्णी, करमाळा, अक्कलकोट, पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड व छत्रपती संभाजीनगर येथूनही आवक होते. तसा लाल भोपळ्याचा हंगाम वर्षभर असला तरी प्रामुख्याने गणपती उत्सवानंतर आवकेला प्रांरभ होतो.

पावसाळा हंगाम सोडला तर तशी वर्षभर आवक सुरू असते. बाजार समितीमध्ये दररोज सरासरी ७० ते १०० टन आवक असते. दर सरासरी ८ ते १५ रुपये प्रति किलोच्या दरम्यान राहतात. पितृ पंधरवड्यात सर्वाधिक मागणी राहून दर प्रति किलो १२ ते १८ रुपयांपर्यंत असतात.

हॉटेलच्‍या संख्येमुळे मागणी

वाढत्या शहरी आणि औद्योगिकीकरणामुळे पुणे, पिंपरी चिंचवड उपनगरांचा मोठा विस्तार झाला. अलीकडे हॉटेल्सची संख्याही वाढली असल्याने या व्यावसायिकांकडून प्रामुख्याने सांबार निर्मितीसाठी भोपळ्याचा वापर वाढू लागला आहे. वर्षभर असलेली ही मागणी पाहून शेतकऱ्यांचा कलही लागवडीकडे वाढून क्षेत्र वाढल्याचे हराळे सांगतात.

प्लॅस्टिक वेष्टनात आवक

वाहतुकीत ओरखडे, डाग पडून गुणवत्ता घसरू नये यासाठी प्रत्येक भोपळ्याला प्लॅस्टिक पिशवीचे आवरण केले जाते. त्यामुळेच बाजारपेठेत तो ग्राहकांना आकर्षितही करतो आणि त्यास चांगले दरही मिळतात.

संपर्क- सचिन गायकवाड- ९७६३२८५५५५ (अडतदार - दुधी भोपळा)

पुणे जिल्ह्यात पुणे शहरापासून नजीक असलेल्या वडकी येथील नितीन गायकवाड आठ ते दहा वर्षांपासून दुधी भोपळ्याचे उत्पादन घेतात. ते म्हणाले की दरवर्षी दोन ते तीन एकर क्षेत्रावर भोपळा असतो. जूनमध्ये दुधीची आवक कमी असते. या काळात मागणी वाढते हे लक्षात घेऊन उपलब्ध सिंचन सुविधांचा वापर करून मे महिन्यात लागवडीचा हंगाम साधतो. जून अखेरीस उत्पादन सुरू होते. याकाळात बाजारपेठेत अत्यल्प आवक असल्याने पावसाळ्यातील तीन महिने चांगले दर मिळतात. हा दर सरासरी ३० ते ५० रुपये प्रति किलो असतो. ऑगस्टच्या दरम्यान प्लॉट संपल्यावर साधारण ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या काळात पुन्हा लागवड करतो. याचा काढणी हंगाम डिसेंबर, जानेवारी मध्ये सुरू होतो. या काळात किलोला १५ ते २० रुपये दर मिळतात. साधारण ४५० ते ५०० ग्रॅम वजनाच्या आणि १५ ते २० सेंटीमीटर लांबीच्या भोपळ्याला चांगली मागणी असते. एकरी सरासरी १५ ते २० टनांपर्यंत उत्पादन तर वर्षभराचा विचार केल्यास किलोला सरासरी २५ ते ३० रुपये दर राहतो.
नितीन गायकवाड- ९७६३९५२१६०
पुणे जिल्ह्यातील जळोची ( ता.बारामती) येथील जगन्नाथ हिंगणे म्हणाले यांचे लाल भोपळा शेतीतील अनुभव महत्त्वाचे आहेत. त्यांनी सुमारे १५ वर्षांचा या शेतीतील अनुभव आहे. एकरी सरासरी १५ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. प्रति भोपळ्याचे वजन सरासरी ८ ते १० किलो असते. प्रति किलो सरासरी ८ ते १२ रुपये दर मिळतो. पितृ पंधरवड्यामध्ये नैवेद्यासाठी विविध भाज्यांबरोबरच लाल भोपळ्याला चांगली मागणी असते. या काळात कमाल १५ रुपयांपर्यंतही दर मिळतो. पीक व्यवस्थापन खर्च वजा जाता एकरी सत्तर हजारांपर्यंत उत्पन्न देणारे हे पीक आहे. नवरात्र आणि दसऱ्यालाही लाल भोपळ्याला चांगली मागणी असते. वर्षभरातील सण व त्या काळात असलेली मागणी व दर यांचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन असल्यानेच हे पीक किफायतशीर ठरल्याचे हिंगणे सांगतात.
संपर्क- जगन्नाथ हिंगणे- ९८२२७५०००७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Committee against HTBT Seeds: ‘एचटीबीटी’ विरोधात समित्यांची स्थापना

PMFME Scheme: अन्नप्रक्रिया प्रकल्पांना १९८२ कोटींचे कर्जवाटप

Agri Trade Policy: तेल तुटवड्यावर तांदळाचा तोडगा

Maharashtra Rain Alert: वादळी पावसाचा अंदाज कायम

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT