Polly House
Polly House Agrowon
यशोगाथा

Agriculture Success Story : अमरावतील मासोद गावाने धरली संरक्षित शेतीची कास

Vinod Ingole

Amravati Agriculture News : अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यातील मासोद गावची लोकसंख्या ८६८ इतकी आहे. कापूस हे मुख्य पीक असून, १६२ हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड होते. सुमारे ७२ हेक्टरवर संत्रा आहे. गावाने आता संरक्षित शेतीची कास धरली असून, त्या अंतर्गत शेडनेट, पॉलिहाउस उभारलेली दिसू लागली आहेत.

शेतकऱ्यांना सुरुवातीला संरक्षित शेतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपसंचालक अनिल खर्चान, कृषी सहायक नीलेश काजळकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेडनेट, पॉलिहाउससाठी ७५ टक्के अनुदानाची योजना आहे आठ शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.

अनुदानातून प्रस्ताव व बँकेकडून कर्ज मिळाले त्यातूनच परिवर्तनाची पहाट उजाडत २०२१ मध्ये गावातील पहिले पॉलिहाउस राहुल मनोहर किटुकले यांनी उभारले.

त्यानंतरच्या टप्प्यात सुधीर मधुकर किटुकले, भारती नंदकिशोर वाकोडे यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. या वर्षी नव्याने पाच शेडनेट्‍स उभारण्याचे प्रस्तावित आहे.

बाजारपेठांप्रमाणे लागवड नियोजन

चांदूरबाजार हे तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र आवक अधिक आणि तुलनेत मागणी कमी यामुळे बाजार कोसळल्याचे अनुभव लक्षात घेता अमरावती बाजारपेठेत मालाची विक्री केली जाते. यंदा गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची घेतली.

मात्र दर २० रुपयांपर्यंत (प्रति किलो) खाली आले. परिणामी, प्रत्येकाने शेडनेटमध्ये वेगवेगळी पिके घेण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानुसार दत्ता किटुकले यांनी काकडी घेतली.

त्यांना तीन दिवसाआड १२५ बॅग (प्रति १५ किलो) उत्पादन व त्यास १५ रुपये प्रति किलो दर मिळू लागला. आता केवळ प्रथम किटुकले यांनी आपल्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरची ठेवली आहे.

प्रातिनिधिक अनुभव

प्रथम यांचा प्रातिनिधिक अनुभव सांगायचा तर १२ एकर शेतीत त्यांची तीन एकरांत संत्रा लागवड आहे. उर्वरित क्षेत्रावर कापूस आहे. २० गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभारण्यासाठी त्यांना ११ लाख रुपयांचा खर्च आला. कृषी विभागाकडून सुमारे नऊ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान मिळाले.

पहिल्या हंगामातील पिकाला ३५ ते ४० रुपये प्रति किलो दर मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला आहे. बाजारातील मागणीनुसार दहा किलोच्या प्लॅस्टिक पिशव्यांमधून ते माल पाठवतात.

प्रथम सुधीरराव किटुकले, ८९९९८३९५८५

राहुल किटुकले हे अल्पभूधारक शेतकरी. अवघी तीन एकर त्यांची जमीनधारणा.
त्यामुळेच दहा गुंठे क्षेत्रावर २०१८ मध्ये त्यांनी पॉलिहाउसची उभारणी केली. त्यापूर्वी ते खुल्या शेतीत निशिगंध, लिली, ॲस्टर यांसारख्या फुलांची लागवड करीत.

जरबेरा फुलांना बाजारात मागणी अधिक असल्याचे त्यांच्या अनुभवास आले होते. त्यामुळे हेच पीक पॉलिहाउसमध्ये घेतले. १७ लाख रुपये उभारणीसाठी खर्च झाला. साडेचार लाख रुपयांचे अनुदान मिळाले.

प्रति दिन १४० बंडल्स याप्रमाणे उत्पादन मिळते. प्रति बंडल ३० ते ४० रुपये दर मिळतो. जरबेरा लागवडीला चार वर्षे झाल्याने तेथे फेरपालट म्हणून ढोबळी मिरची घेतली आहे. फुलशेतीतून चांगला परतावा मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा १० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउस उभारले आहे.

राहुल किटुकले, ८६६८२१३०४६

स्थानिक रोजगार निर्मिती

मासोद गावात आता बारा शेडनेट आणि दोन पॉलिहाउसेसची उभारणी झाली आहे.
खरे तर कपाशी, सोयाबीन ही या भागातील मुख्य पिके. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांची
उत्पादकता घटण्यासोबतच दरही समाधानकारक मिळालेले नाहीत. त्या तुलनेत संरक्षित शेतीतून अर्थकारण उंचावू लागल्याचे शेतकरी सांगतात.

अमरावती बाजारपेठेत माल नेण्यासाठी मालवाहू वाहनांची गरज भासते. गावातील तीन युवकांनी त्यांची खरेदी केली आहे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळाला आहे. शिवाय शेडनेटमध्ये बारमाही काम असल्याने मजुरांच्या हाताला वर्षभर काम मिळाले आहे.

गावात यापूर्वी एका युवकाने शेडनेटमध्ये ढोबळी मिरची घेतली होते. त्या अनुभवातील ज्ञानाचा उपयोग गावातील शेतकऱ्यांना होतो. शिवाय शेतकरी एकत्र येत माहितीची देवाणघेवाण करतात. त्या माध्यमातून तंत्रज्ञान विस्तारला बळ मिळाले आहे.

गावाची प्रयोगशीलता

संरक्षित शेतीपुरते मर्यादित न राहता सुधारित शेती तंत्रज्ञान व उपक्रम राबवण्यवर मासोदमधील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. तुषार, ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापनात सुधारणा केली.
सन २०२२-२३ च्या रब्बी हंगामात १५ हेक्टरवर हरभरा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यावर भर दिला.

‘बीबीएफ’ तंत्राच्या माध्यमातून मागील खरिपात दहा हेक्टरवर सोयाबीन घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता यावर्षी हे क्षेत्र वाढेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. गावातील कृषक क्रांती बहुद्देशीय बचत गटाने अवजारे बँकेचा प्रस्ताव दिला आहे.

त्या माध्यमातून गावात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. ‘अ‍ॅग्रोवाडी फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ ने २०२३-२४ मध्ये कोंबडीखत निर्मिती उद्योग सुरू करण्याचे काम हाती घेतले आहे.

संपर्क - नीलेश काजळकर, कृषी सहायक, मासोद, ९५१८९८८३९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT