Oil Production Agrowon
यशोगाथा

Oil Production : लाकडी घाण्यावरील ‘पार्थ’ तेलांची आश्‍वासक उलाढाल

Lakadi Ghana : परभणी येथील मनोज पाटील यांनी लाकडी घाण्यावर आधारित तेलनिर्मिती उद्योग सुरू केला आहे. शेंगदाणा व सूर्यफूल तेल ही त्यांची मुख्य उत्पादने आहेत.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

माणिक रासवे

Oil Industry : परभणी येथील मनोज पाटील यांनी लाकडी घाण्यावर आधारित तेलनिर्मिती उद्योग सुरू केला आहे. शेंगदाणा व सूर्यफूल तेल ही त्यांची मुख्य उत्पादने आहेत. स्वतःचे आउटलेट व चार जिल्ह्यांमधील ‘सुपर शॉपी’ यांच्या माध्यमातून पार्थ या ब्रॅण्डने उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे. अडीच वर्षांच्या काळात वार्षिक उलाढाल १४ लाखांपर्यंत नेण्यात ते यशस्वी झाले आहेत.

परभणी येथे वास्तव्यास असलेले मनोज नारायणराव आगलावे- पाटील मूळ आडगाव (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील रहिवासी आहेत. गावी त्यांची वडिलोपार्जित अडीच एकर शेती आहे. कृषी निविष्ठा क्षेत्रातील खासगी कंपनीत ते विपणन विभागात नोकरीस आहेत. परभणी येथील नवा मोंढा भागात त्यांचे कृषी सेवा केंद्रही आहे. हे सर्व सुरू असतानाच कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. स्थानिक परिसरातील उपलब्ध शेतीमालावर काही प्रक्रिया करता येईल का याची चाचपणी सुरू केली. कोरोना साथीमुळे नागरिकांमध्ये आहाराविषयी विशेषतः तेलांविषयी जागृती वाढली होती. मनोजही पहिल्या लाटेत कोरोना बाधित झाले होते. त्या वेळी डॉक्टरांनी त्यांना आहारामध्ये लाकडी घाण्यावर निर्मित तेलांचा समावेश करण्याचा सल्ला दिला होता. त्यातून या व्यवसायात चांगली संधी असल्याचे जाणवले. या भागात भुईमूग, करडई, सूर्यफूल या तेलबिया चांगल्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने कच्च्या मालाच्या समस्याही जाणवणाऱ्या नव्हत्या.

व्यवसायाचा श्रीगणेशा

व्यवसायातील पहिले पाऊल म्हणून मनोज, पत्नी नंदिनी व मेहुणे अंगद काळबांडे यांनी पुणे येथे दोन दिवसांचे तेल घाणा उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. अन्न व औषध प्रशासनाकडे व्यवसायाची नोंदणी केली.
परभणी शहरातील गणपती चौकातील भाडेतत्त्वावरील जागेत जानेवारी २०२१ मध्ये
व्यवसायास सुरुवात केली. त्यासाठी साडेचार लाख रुपये भांडवलाची गुंतवणूक केली. पुणे येथून तीन लाख रुपये किमतीचे लाकडी घाणा संयंत्र खरेदी केले. शेंगदाणा व करडई या तेलांच्या निर्मितीवर मुख्य
भर दिला. याच ठिकाणी विक्रीसाठी ‘आउटलेट’ही सुरू केले. शहर व परिसरात तसेच सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी केली. त्यामुळे चोखंदळ, आरोग्याच्या बाबतीत जागरूक असलेले ग्राहक जोडले गेले. गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे विक्री होऊ लागली. पाटील दांपत्याचा उत्साह वाढला.

व्यवसायाचा विस्तार

उत्पादनांना मागणी वाढू लागल्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले. परभणी शहराजवळील
कारेगाव शिवारात पाटील यांनी जागा खरेदी केली होती. तेथे ५२ बाय १७ फूट आकाराचे शेड उभारले. जानेवारी २०२३ पासून तेल घाणा व्यवसाय या जागेत स्थलांतरित झाला. नव्या घाण्याबरोबरच पहिल्या ठिकाणी असलेला घाणाही येथे आणला. त्यातून उत्पादन क्षमता वाढली. देखभाल दुरुस्तीवेळी तेलनिर्मिती बंद ठेवण्याची गरज भासली नाही. शेंगदाणा व करडई तेल यांची मुख्य तर सूर्यफूल, तीळ, जवस आदी तेलांची निर्मिती गरजेनुसार होते. कच्चा मालाची खरेदी शेतकरी तसेच स्थानिक मार्केटमधून केली जाते. प्रति महिना ३
ते ४ क्विंटल शेंगदाणे, २ ते ३ क्विंटल करडई (गोडंबी), २ ते ४ क्विंटल सूर्यफुलाची गरज भासते. स्थानिक खरेदीमुळे वाहतूक खर्च कमी लागतो.

तेलनिर्मिती

-एक व पाच लिटरमध्ये पॅकिंग व लेबलिंग. पार्थ नावाने उत्पादनांचा ब्रॅण्ड.
-शेंगदाणा तेल प्रति लिटर ३२० रुपये, करडई तेल ३५५ ते ३२४० रुपये, तर तीळ, मोहरी आदी तेल ५६० रुपयांच्या आसपास दराने विकले जाते.
-भागातील शेतकऱ्यांना घरच्या वापरासाठीही प्रति किलो १५ ते ३० रुपये मजुरीने तेलनिर्मिती करून दिली जाते. शेतकऱ्यांनी मागील वर्षी ७ ते ८ क्विंटल तेलबियांपासून तेल तयार करून नेले.

विक्री व उलाढाल

-परभणी शहरातील स्वतःच्या आउटलेटमध्ये विक्री होतेच. शिवाय परभणी, नांदेड, हिंगोली, बीड आदी ठिकाणच्या सुपर शॉपी, मॉल आदींमध्येही उत्पादने उपलब्ध केली. पुणे शहरातूनही मागणी.
-व्यवसायाच्या पहिल्या वर्षी सुमारे ४५०० ते पाच हजार लिटर तेलाची विक्री. त्यातून ७ ते ८ लाख रुपये उलाढाल. पुढील वर्षी विक्री सहा हजार लिटरपर्यंत पोहोचली. यंदाच्या वर्षी आजमितीला
ती साडेचार हजार ते पाच हजार लिटरपर्यंत पोहोचली आहे. वर्षाच्या अखेरीपर्यंत ती आठ हजार लिटरचा आकडा गाठेल अशी अपेक्षा.
-वर्षाला सुमारे १३ लाख रुपये उलाढाल करण्यापर्यंत व्यवसायाची मजल.
-पेंड हे महत्त्वाचे उप-उत्पादन असून, त्यास पशुपालकांकडून मागणी असते. वर्षभरात १५०० क्विंटल शेंगदाणा पेंड उत्पादन व प्रति किलो ५० रुपये दराने त्याची विक्री.


व्यवसायाचे व्यवस्थापन

मनोज यांच्या पाठबळावर नंदिनी व मेहुणे अंगद व्यवसाय व्यवस्थापनाची धुरा सांभाळतात. नंदिनी
स्वतः घाणा चालविणे, तेलाचे विविध आकारांतील पॅकिंग, थेट विक्री आदी जबाबदाऱ्या पाहतात.
तर अंगद स्थानिक बाजारपेठेसह कच्चा माल खरेदी करणे, उत्पादनांचे मार्केटिंग या जबाबदाऱ्या
पाहतात. मनोज यांच्या आई जिजाबाई यांचे कच्चा मालाची स्वच्छता व प्रतवारी या कामांवर लक्ष असते. मुले रुद्राक्ष व पार्थ देखील अभ्यासातून फुरसत काढून पॅकिंग वा अन्य कामांसाठी मदत करतात. सध्या दोन मजुरांना रोजगार दिला आहे. शिवाय आउटलेटद्वारे सेंद्रिय गूळ, हळद पावडर, चहा पावडर आदी उत्पादनांची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळवले जाते.

मनोज आगलावे पाटील, ९९२२७०४३०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT