Lakadi Ghana Edible Oil
Lakadi Ghana Edible OilAgrowon

Lakadi Ghana Oil : सात्त्विक ब्रॅण्ड तेलांना थेट ग्राहक बाजारपेठ

अलीकडील काळात नैसर्गिक पद्धतीने लाकडी घाण्यावर तयार केलेल्या खाद्यतेलांना मागणी वाढली आहे. ही संधी व मागणी लक्षात घेऊन सोनगाव (ता. जि. सातारा) येथील प्रवीण कदम या तरुण शेतकऱ्याने सात्त्विक ब्रॅण्डद्वारे विविध तेलांची निर्मिती केली आहे. दर्जा व विश्‍वासार्हता यांच्या बळावर थेट ग्राहक बाजारपेठ मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

सातारा शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर सोनगाव (ता. सातारा) गाव आहे. गावात उसाचे क्षेत्र (Sugarcane Acreage) अधिक आहेत. गावातील प्रवीण मधुकर कदम यांची साडेतीन ते चार एकर शेती आहे.

बंधू आनंदा मुंबई येथे ‘आयटी’ क्षेत्रात नोकरी करतात. प्रवीण सुरुवातीला वडिलांच्या बरोबरीने शेती पाहून ‘एमआयडीसी’मध्ये नोकरी करायचे. त्या काळात त्यांचे शरीरस्वास्थ ठीक नसायचे. दरम्यान आनंदा यांनी वाटेगाव (जि. सांगली) येथे पंचगव्य उत्पादन प्रशिक्षण घेतले. त्यातून देशी गायी व नैसर्गिक पद्धतीने खाद्यतेल निर्मिती (Edible Oil Production) यांची माहिती मिळाली. निरोगी राहायचे तर चांगला आहार, नैसर्गिक खाद्यतेलांचे (Natural Edible Oil) सेवन यांचे महत्त्व अधिक जाणवू लागले. मग कदम बंधूंचा सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) ओढा वाढला.

Lakadi Ghana Edible Oil
लाकडी घाण्यावरील तेलाची युवा अभियंत्याकडून निर्मिती

व्यवसायाची उभारणी

अनेक वेळा बाजारपेठेत भेसळयुक्त खाद्यतेल पाहण्यास मिळते. आपल्याबरोबरच ग्राहकांनाही चांगल्या दर्जाच्या खाद्यतेलाची गरज असल्याचे लक्षात आले. अशावेळी आनंदा यांनी प्रवीण यांना लाकडी घाण्यावरील तेलनिर्मिती व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला. तो पटल्याने प्रवीण यांनी नोकरी सोडून त्यातच उतरण्याचे नक्की केले.

व्यवसायाची अधिक माहिती मिळवण्यासाठी दोघा बंधूनी पुस्तके तसेच इंटरनेटवरून माहिती संकलित केली. आता गरज होती प्रकल्प सुरू करण्याची व त्यासाठी भांडवल उभारण्याची. त्यासाठी कदम कुटुंबीयांनी घरची शिल्लक रक्कम तसेच कर्ज अशी रक्कम उभी केली. घरासमोरील जागेत ५० बाय २२ फूट लांबी- रुंदीचे पत्र्याचे शेड उभे केले. चेन्नईहून लाकडी घाणा आणला. वाईनजिक याच धर्तीवरील एका प्रकल्पात पाच दिवसांचे प्रशिक्षण प्रवीण यांनी घेतले. त्यातून २०१९ मध्ये व्यवसायाची श्रीगणेशा झाला.

Lakadi Ghana Edible Oil
लाकडी तेलघाणा उद्योगातून उभे राहतेय आशादायक चित्र

विविध तेलांची निर्मिती

शेंद्रे व सातारा रस्त्यावर असलेल्या या युनिटमध्ये एकूण दोन घाणे आहेत. एकाची प्रति बॅच क्षमता १५ किलो, तर दुसऱ्याची १३ किलोची आहे. शेड, यंत्रे व एकूण युनिट उभारणीसाठी जवळपास दहा लाख रुपयांचा खर्च आला आहे. उत्पादनासोबत विक्री व्यवस्था देखील येथेच उभारली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन मागील वर्षी दगडी घाण्याची खरेदीही केली आहे. बाजारातून कच्चा माल खरेदी केला जातो.

त्याआधारे सात्त्विक या ब्रॅण्डखाली शेंगदाणा, खोबरेल, तीळ, मोहरी, सूर्यफूल व कारळा या तेलांचे उत्पादन केले जाते. सर्वाधिक शेंगदाणा तेलनिर्मिती होते. पाच लिटर, एक लिटर, अर्धा लिटर व २०० ग्रॅम अशा वजनांमध्ये पेट बॉटल पॅकिंग केले जाते. दसरा, दिवाळी तसेच यात्रा-जत्रा या काळात मागणी वाढत असल्याने उत्पादन तुलनेने अधिक होते. शेंगदाणा तेल २७० रुपये, मोहरी ५०० रुपये, खोबरेल तेल ५०० रुपये व तीळ तेल ५५० रुपये प्रति लिटर असे दर आहेत. कच्चा माल शेतकऱ्यांनी आणून दिल्यासही उत्पादन खर्च विचारात घेऊन त्यांना तेलनिर्मिती करून दिली जाते.

वार्षिक उत्पादन

प्रत्येक घाणा वा बॅच दोन ते सव्वा दोन तास चालवली जाते. या प्रक्रियेमुळे तेल गुणवत्तापूर्ण तयार होऊन जास्त दिवस टिकते. कच्चा मालही दर्जेदार असल्याचे पारखून घेण्यात येते. यंत्रांची वारंवार देखभाल व स्वच्छता ठेवली जाते. बॅचमध्ये तयार झालेले तेल चार दिवस टाकीत ठेवले जाते. त्यानंतर फिल्टरच्या साह्याने ते गाळून घेतले जाते. त्यानंतर त्याचे पॅकिंग होते. हा व्यवसाय बारमाही सुरू असतो. दिवसाला दोन घाण्यांमधून दोन शिफ्टमध्ये काम चालते. अशा प्रकारे १० ते १५ बॅचेस तयार होतात. वर्षाकाठी १५ हजार ते २० हजार लिटरपर्यंत तेलनिर्मिती होते. अर्थात, मागणीनुसार त्यात बदलही होतो. तेरा किलोच्या प्रति घाण्यापासून भुईमुगाचे पाच ते साडेपाच किलो तेल तर सहा किलो पेंड मिळते.

ग्राहकांकडून मागणी

‘एफएसएसएआय’चा (फूड सेफ्टी) परवानाही घेतला आहे. दर्जा व विश्‍वासार्हता टिकवल्याने ग्राहकांकडून सातत्याने मागणी असते. विक्री केंद्र हे रस्त्याच्या बाजूला आहे. या मार्गावरून कास, सज्जनगड, ठोसेघर आदी ठिकाणी पर्यटकांची सतत ये-जा सुरू असते. सातारा शहरही जवळ आहे. त्यामुळे थेट ग्राहकांची बाजारपेठ मिळवण्यात प्रवीण यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण व गोवा येथेही थेट ग्राहकांना पुरवठा केला जातो.

सेंद्रिय गुळाला मार्केट

प्रवीण सेंद्रिय पद्धतीने ऊसशेती करतात. वर्षाला सुमारे सात ते आठ टनांपर्यंत गूळनिर्मिती ते करतात. प्रति किलो ८० रुपये दराने त्यास चांगली मागणी असल्याचे प्रवीण सांगतात. शिवाय पंचगव्य तसेच बचत गटांनी तयार केलेली उत्पादने व सेंद्रिय पदार्थाची विक्री येथून होते. त्यातून उत्पन्नाला चांगला हातभार लागतो. व्यवसायाचे हे चौथे वर्ष असून आता संकेतस्थळही सुरू केले आहे. सोशल मीडियाचा वापरही चांगल्या पद्धतीने केला जातो.

पूर्णपणे सेंद्रिय शेती

उसासोबत भुईमूग, भात, केळी व आंब्याची झाडे लावली आहेत. शेती बागायत असल्याने वर्षभर पिके घेतली जातात. सन २०१३ पासून सेंद्रिय शेती केली जात आहे. शेतीला पूरक म्हणून देशी गायी व तीन म्हशीचे संगोपन केले जाते. त्यामुळे घरी लागणारे दूध तसेच शेतीसाठी शेणखतावरील खर्च कमी झाला आहे. आई, वडील व घरच्या सर्वच सदस्यांची शेतीत मोठी मदत होते.

प्रवीण म्हणतात, की अलीकडील काळात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र भुईमुगासारख्या पिकांचे क्षेत्र तुलनेने खूप घटले आहे. उसासारख्या पिकात तरी त्याचे आंतरपीक घ्यायला हवे. भुईमुगाच्या जुन्या जातींचे महत्त्व मोठे आहे. भुईमुगाच्या लागवडीतून तेलाच्या निर्मितीलाही अधिक चालना मिळेल. चांगल्या दराने त्यांची खरेदी करण्याची आमची तयारी आहे.

प्रवीण कदम- ७७९८११११८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com