Post Harvesting Equipment Agrowon
यशोगाथा

अन्न प्रक्रिया उद्योजक घडविणारी विद्यापीठाची यंत्रनिर्मिती

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने काढणीपश्‍चात (Post Harvesting) व प्रक्रिया (Processing) या उद्देशाने विविध पिकांसाठी बहुउपयोगी यंत्रे (Multipurpose Machine) विकसित केली आहेत. त्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन वेळेत बचत करणे शक्य होणार आहे. या व्यतिरिक्त शेतकरी, बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करून उद्योजक होण्याची संधीही मिळणार आहे.

 गोपाल हागे

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University) कार्यक्षेत्र विदर्भातील ११ जिल्ह्यांचे आहे. यात विविध पीकपद्धती विकसित झाल्या. काळानुरुप आता फळशेतीचे (Fruit Farming) क्षेत्र वाढत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांची गरज ओळखून विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाने व्यावसायिकदृष्ट्या उपयोगी नवी यंत्रे विकसित केली आहेत. उत्पादकांच्या माध्यमातून ती अधिकाधिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कुलगुरू डॉ. विलास भाले (Dr. Vikas Bhale) यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठ कार्यरत आहे. यातील महत्त्वाच्या यंत्रांबाबतची माहिती.

औषधी वनस्पती सोलणी, कापणी यंत्र

शेतकरी सफेद मुसळी, शतावरी आदींचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेऊ लागले आहेत. दोन्ही औषधी वनस्पतींची मुळे सोलण्यासाठी तसेच कापणी करण्यासाठी यंत्राची मदत घेता येते. या यंत्राद्वारे बटाट्याचे चिप्स तयार करणेही शक्य होते. मुळा, काकडी, गाजर, बीटरूट आदी सोलून त्यांचे काप बनविण्यास मदत होते. यंत्राचा वापर केल्याने मजूर बळ कमी लागते. वापरण्यासाठी सोपे आणि सुलभ आहे. काप केल्याने वाळवण्याचा वेळ कमी लागतो. क्षमता पाच किलोपासून ३० किलो प्रति बॅच आहे. मुळे सोलण्याची क्षमता ८० ते ९० टक्के, तर काप तयार करण्याची क्षमता ९० ते ९५ टक्के आहे. यंत्र एक अश्‍वशक्तीवर सिंगल फेजला चालते. ४० ते ७५ हजार रुपयांदरम्यान किंमत आहे.

पीडीकेव्ही ओवा, बडीशेप बीज निष्कासन यंत्र

विदर्भातील कोरडवाहू पट्ट्यात ओवा, बडीशेप यांची शेती केली जाते. त्यादृष्टीने दोन्ही पिकांसाठी बीज निष्कासन यंत्र तयार करण्यात आले आहे. त्याची क्षमता तासाला १५० ते १७० किलो आहे. बीज काढताना कोणतेही नुकसान होत नाही. यंत्र चालवणे, दुरुस्ती, देखभाल या बाबी सोप्या आहेत. ८५ हजारांपर्यंत त्याची किंमत आहे.

लिंबू काप बनविणारे यंत्र

लिंबापासून लोणचे व अन्य प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. त्यासाठी लिंबाचे काप करावे लागतात. हे काम मानवी पद्धतीने केले जात असल्याने त्यासाठी बराच वेळ लागतो. ही त्रुटी पाहता लिंबाचे काप तयार करणारे यंत्र बनवले आहे. त्याद्वारे तासाला १५० लिंबावर काम करता येते. कार्यक्षमता ९० ते ९५ टक्के आहे. एका ठिकाणाहून यंत्र दुसरीकडे नेता येऊ शकते. दुरुस्ती, हाताळणी सोपी आहे. व्यावसायिकदृष्ट्या हे यंत्र उपयोगी आहे. साधारणतः ३५ ते ४० हजारांपर्यंत उपलब्ध होऊ शकते.

ऊस सोलणी व कापणी

ऊस सोलणे किंवा कापणी करण्यासाठी हे यंत्र फायदेशीर आहे. तासाला एक क्विंटल सोलणी करू शकतो. पुढे त्याचे काप तयार करून विविध पदार्थ तयार करणे शक्य होते. यंत्र व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध करण्यात आले असून किंमत २० ते ३० हजारांदरम्यान आहे.

चारोळी बीज प्रतवारी व फोडणी यंत्र

चारोळी काढण्याचे काम पारंपरिक पद्धतीत किचकट असते. ते सोपे व्हावे यासाठी बीज प्रतवारी व फोडणी यंत्र तयार केले आहे. त्याची प्रतवारी क्षमता ९८ टक्क्यांपर्यंत आहे. चारोळी फोडणीचे काम ९२ टक्के होऊ शकते. यंत्राचे वजन ७५ किलो असून, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते.

यंत्रावर एक व्यक्ती सहज काम करू शकते. किंमत ७५ ते ८५ हजारांपर्यंत आहे. अशा यंत्राचा वापर करून बेरोजगार तरुण, महिला, लघुउद्योजक आपला व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार निर्मिती करू शकतात.

हुरडा काढण्यासाठीचे यंत्र

अलीकडे अनेक शेतकरी हुरडा विक्री व्यवसाय करू लागले आहेत. कणसातून हुरडा काढण्याचे काम प्रचलित पद्धतीत हाताच्या साह्याने केले जाते. विद्यापीठाने पंदेकृवी ज्वारी हुरडा काढणी यंत्र बनविले आहे. त्याद्वारे प्रति तास १८० किलो कणसातून हुरडा काढता येतो. केवळ एक अश्‍वशक्तीच्या विद्युत यंत्राच्या साह्याने ते यंत्र चालवता येते. त्याद्वारे ९३ टक्क्यांपर्यंत हुरडा काढणे शक्य होते. हुरडा काढताना दाण्यांची फूट होत नाही हे विशेष. कणसे ज्या आकाराची आहेत त्यानुसार यंत्राच्या पट्‍यांमधील अंतर कमी जास्त करण्याची सुविधा आहे.

जांभूळ गर काढण्यासाठीचे यंत्र

जांभळाच्या बिया व गर वेगवेगळे करण्यासाठी या यंत्राची मदत होते. क्षमता तासाला ७५ ते ८५ किलो गर काढण्याची आहे. अर्धा एचपी क्षमतेच्या विद्युत मोटरवर ते चालते. वजन कमी असल्याने यंत्राची ने-आणसुद्धा करता येते. किंमत ८५ हजारांपर्यंत आहे.

सीताफळ गर काढणारे यंत्र

विदर्भासह राज्यात सीताफळाचे क्षेत्र वाढत आहे. या फळ विक्रीसाठी कमी कालावधी मिळतो. अशा वेळी त्याचा गर काढून वर्षभर साठवून ठेवला तर निश्‍चितच फायदा होऊ शकतो. हे पाहता सीताफळ गर व बिया निष्कासन यंत्र बनविले आहे. त्याद्वारे तासाला ७० ते ८० किलो गर काढता येतो. हे यंत्र ०.५ अश्‍वशक्तीच्या सिंगल फेज विद्युत मोटरवर चालते. अकुशल मजूरही याचा वापर करू शकतो. ९२ ते ९६ टक्के गर काढणे शक्य होते. यंत्राद्वारे उपलब्ध गरात ७५ टक्के पाकळ्या राहतात. किंमत जवळपास ८० हजार रुपये आहे.

संपर्क

डॉ. सुचिता गुप्ता, ९४२३२४६१६४

विभागप्रमुख, कृषी अभियांत्रिकी विभाग

डॉ. भाग्यश्री पाटील, ९९२१००८५७६

सहायक प्राध्यापक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT