Edible Oil
Edible Oil Agrowon
यशोगाथा

Edible Oil : दोघा युवा मित्रांचा खाद्यतेलनिर्मिती व्यवसाय

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

यवतमाळ येथे रजत तुंडलवार व अक्षय मुक्कावार हे दोघे युवा मित्र राहतात. त्यांनी एकत्र येत लाकडी घाण्यावर (Lakdi Ghana Edible Oil) आधारित खाद्यतेल निर्मितीचा (Edible Oil Production) स्टार्ट अप केला आहे. यामागील पार्श्‍वभूमी सांगायची तर रजतचे वडील खासगी नोकरीत तर आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. रजतचे बीई मॅकेनिकलपर्यंत शिक्षण झाले आहे.

त्याला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. भरती संदर्भाने काही टप्पेही त्याने पार केले. परंतु अपेक्षित यश आले नाही. मग सहा महिने खासगी नोकरी केली. नोकरीत मन रमले नाही. इतरांसाठी राबण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभारण्यात काय गैर, असा प्रश्‍न त्याच्या मनात घर करू लागला होता. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर २०१९ मध्ये घरी यवतमाळला परत आल्यानंतर त्याच्या मनात शेती करण्याचा विचार मनात डोकावत होता. बालपणीचा मित्र आणि शेजारी अक्षय मुक्‍कावार याला आपले ‘प्लॅन’ त्याने सांगितले. तोही खासगी नोकरीच करीत होता. चर्चेत शेतीपूरक उद्योग उभारल्यास अधिक फायदा मिळेल असे दोघांना वाटले.

उद्योगाची निवड

कोरोना काळात ग्राहकांमध्ये शुद्ध व आरोग्यदायी आहाराप्रती जागरूकता वाढली होती हे लक्षात आले. त्यामुळे दैनंदिन आहारात उपयोगी पडणाऱ्या घटकाचे उत्पादन करता येईल का, असा विचार येत होता. बाजारपेठेतील संधी चाचपल्या. त्यानुसार तेलघाण्यावर आधारित खाद्यतेल निर्मिती करावी व त्यात अधिक संधीही आहे यावर दोघांचे एकमत झाले.

यू-ट्यूब चॅनेलवर कोइमतूर (तमिळनाडू) येथील आधुनिक लाकडी तेलघाणे यंत्रणेसंबंधीचे व्यावसायिकांचे व्हिडिओ पाहण्यात आले. त्यानुसार संपर्क साधला. व्यावसायिकांचे अनुभव, खर्च, उत्पन्न व बाजारपेठ अशा साऱ्या बाबी विस्ताराने कळाल्या. त्यानंतर संबंधित यंत्राची मागणी नोंदवीत ते खरेदीही केले. अडीच लाख रुपये त्याची किंमत आहे.

व्यवसायाची उभारणी

रजत म्हणाले, की मोटरच्या साह्याने हे यंत्र चालविले जाते. प्रति बॅचमध्ये १५ ते २० किलो कच्च्या मालावर प्रक्रिया करता येते. यासाठी साधारणतः दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. वेगवेगळ्या तेलबियांसाठी तो कमी जास्त होतो. यंत्राचा ‘आउटपुट’ सांगायचा तर प्रति किलो शेंगदाण्यापासून वजनात सांगायचे तर ४०० ते ४२५ ग्रॅम तेल व उर्वरित ढेप मिळते.

एक किलो तिळापासून ४०० ग्रॅम तेल, एक किलो जवसापासून २५० ग्रॅम तेल, एक किलो खोबऱ्यापासून ५०० ग्रॅम, एक किलो मोहरीपासून २२० ग्रॅम, तर एक किलो करडईपासून ३५० ग्रॅम तेल मिळते. ३० ते ३२ अंशांपेक्षा कमी तापमानात प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तेलाची चव त्यातील घटक नष्ट होत नाहीत.

...अशी शोधली बाजारपेठ

दोघा मित्रांनी सुरू केलेल्या या व्यवसायाला येत्या ऑक्टोबरमध्ये दोन वर्षे पूर्ण होतील. या काळात महिन्याला सातशे ते आठशे लिटर तेलाची विक्री करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. सर्वाधिक विक्री शेंगदाणा तेलाची (६०० लिटरपर्यंत) होते. त्यासाठी उत्पादनांच्या ‘प्रमोशन’साठी मेहनतही घ्यावी लागली. ‘फूड सेफ्टी’ व अन्य प्रमाणपत्रांचे परवाने मिळवले. शहरातील मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या नागरिकांसाठी खास माहितीपत्रक तयार केले.

त्याद्वारे घाण्याच्या तेलाचे महत्त्व सांगणारी माहिती दिली. आर्णी मार्गावरील राणा प्रतापनगर येथे तेलघाणा असून तेथेच विक्रीचे ‘आउटलेट’ ही उभारले. येथील वातावरण स्वच्छ ठेवले. येणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष निर्मिती देखील पाहता यावी व उत्पादनांबाबत खात्री व्हावी असा उद्देश होता. माऊली असा ब्रॅण्ड तयार केला. माऊली, शुद्धतेची सावली अशी खास टॅगलाइनही तयार केली. हळूहळू ग्राहकांमध्ये तेलांची लोकप्रियता होत आता बाजारपेठ विस्तारण्याचे वेध मित्रांना लागले आहेत.

उत्पादनांचे दर (प्रति लिटर व रुपये)

शेंगदाणा तेल- २७०

करडई- ३५०

जवस- ४५०

मोहरी- ४००

खोबरा- ४००

बदाम- ३०० रुपये प्रति १०० मिलि

कच्चा माल व पॅकिंग साहित्य

शेतकरी व स्थानिक बाजारपेठेतून कच्च्या मालाची खरेदी होते. येत्या काळात शेतकऱ्यांकडून शेंगा खरेदीचा विचार आहे. त्यासाठी गोदामाची गरज भासेल. अमरावतीहून पॅकिंग साहित्य मागविले जाते. प्लॅस्टिक बॉटलमधून तेल उपलब्ध केले आहे. ग्राहक आपले स्वच्छ कॅन किंवा डबे घेऊन आल्यास त्यातूनही तेल देण्यात येते. अशावेळी पॅकिंगचा खर्च कमी झाल्याने तेलाची किंमत कमी होते. रजत यांनी करारावर १८ एकर शेती केली आहे. यात सोयाबीन, कपाशी, तूर, हळद आदींची लागवड आहे.

संपर्क

रजत तुंडलवार- ९४०५४८१६०१

अक्षय मुक्‍कावार ः८६९८१२५८९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Export Ban : न्यायालयाने दिला तांदूळ निर्यातदारांच्या बाजूने निर्णय; केंद्र सरकारला सुनावले!

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

Indian Spices Product Ban : आधी हाँगकाँग-सिंगापूर आणि आता शेजारच्या देशाने घातली भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Panjab Stubble Burning : पंजाबमध्ये बिनधोकपणे गव्हाची अवशेष जाण्यावर भर; जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलात आग

SCROLL FOR NEXT