Success Story
Success Story Agrowon
यशोगाथा

Food Processing : शेंगालाडू ते जांभूळ, डाळिंब, आवळा सिरप; पंढरपूरच्या तरूणाचे प्रक्रिया उद्योगात यश

सुदर्शन सुतार

Agriculture Success Story पंढरपूर (जि. सोलापूर) येथील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून अवघ्या दोनशे फुटांवर तांबेकर गल्लीत ओंकार वाटाणे यांचे घर आहे. परिस्थिती आर्थिक दृष्ट्या गरीब होती. एम.कॅाम. ची पदवी घेतल्यानंतर खासगी पतसंस्थेत ओंकार यांनी लिपिक म्हणून नोकरी केली.

तुटपुंज्या पगारामुळे ती सोडली. कुटुंबात पौरोहित्य केले जाते. त्यातून म्हणावे तसे उत्पन्न नव्हते. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे ओंकार यांनी ठरविले. (Latest Agriculture Story)

पंढरपुरात वारकऱ्यांची सतत वर्दळ सुरु असते. त्यामुळे उपवासाला शेंगालाडू, खजूर लाडू (Khajur Ladu) यांची मोठी मागणी असते. हे ओळखून उपलब्ध कमी भांडवलात २०११ मध्ये व्यवसायाची सुरवात केली.

ओंकार यांचे वडील शंकर काष्टकलाकार म्हणून पंढरपुरात परिचित आहेत. काही वर्षापूर्वी आई चंदा यांचे आकस्मिक निधन झाले. त्यातून सावरत वडिलांसह ओंकार पौरोहित्याच्या कामांसह प्रक्रिया व्यवसायात निश्‍चयपूर्वक उतरले.

शेंगालाडू ते फळांचे सिरप

शेंगालाडू पाठोपाठ खजूर लाडू, डिंक लाडू, जवस, कारळा, तीळ चटणी, काळा मसाला, मेतकूट आदी उत्पादनांची निर्मिती सुरू केली. पंढरपूर शहरातील किरकोळ दुकाने, प्रासादिक साहित्याची दुकाने आणि ग्राहकांच्या वैयक्तिक मागणीनुसार त्यांची विक्री सुरु झाली.

मग उत्साह चांगलाच वाढला. महिन्याकाठी सर्वाधिक २०० ते २५० किलो शेंगालाडूची विक्री होऊ लागली. व्यवसायात जम बसून स्थैर्यता येऊ लागली.

मग बदलती बाजारपेठ व ग्राहकांचा कल ओळखून त्यानुसार उत्पादनांची श्रेणी वाढवण्याचे ठरवले. त्यातून आवळा, डाळिंब सिरप, ज्यूस आदी संकल्पना पुढे आल्या.

प्रशिक्षण ठरले महत्त्वाचे

दोन वर्षापूर्वी ओंकार यांचा संपर्क मोहोळ येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राशी (केव्हीके) आला. तेथे फळे- भाजीपाला काढणी पश्चात व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगाचे सात दिवसीय प्रशिक्षण घेतले.

त्यातून कॅण्डी, सिरप, ज्यूस निर्मितीची शास्त्रीय निर्मिती, तांत्रिक व ‘ब्रॅण्डिंग, मार्केटिंग’ या बाबत मार्गदर्शन झाले. केव्हीकेचे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी पुढेही वेळोवेळी मार्गदर्शन केले.

कच्च्या मालाची खरेदी

सुमारे ९९ टक्के कच्चा माल (उदा. आवळा, डाळिंब, जांभूळ) शेतकऱ्यांकडून थेट बांधावरून खरेदी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होतो. डाळिंब तसे बारमाही मिळते. मात्र वर्षातून एकदाच मिळणाऱ्या मालाची खरेदी करून पुढे प्रक्रिया व वर्षभर विक्री असे नियोजन असते.

घरगुती स्तरावर निर्मिती

आज विविध लाडूंसह आवळा, डाळिंब, जांभूळ यांचे सिरप, ज्यूस, कॅण्डी आदी विविध उत्पादने तयार केली जातात. व्यवसाय घरगुतीच आहे, पण तो उत्तम करण्याचे तंत्र ओंकार यांनी आत्मसात केले आहे.

सध्या कोणतीही मोठी यांत्रिक सामग्री नाही. ज्यूसर, मिक्सर व अलीकडेच घेतलेले छोटेखानी यंत्र व घरगुती साहित्याआधारे निर्मिती होते. प्रातिनिधिक सांगायचे तर डाळिंब सिरप हे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे.

यात डाळिंबे स्वच्छ करून ‘ज्यूसर’मध्ये रस काढला जातो. साखरेचे प्रमाण निश्‍चित करून ‘पाश्चरायझेशन’ होते. थंड झाल्यानंतर ‘प्रिझरव्हेटिव्ह’ समाविष्ट केले जाते.

आवळा व डाळिंब सिरप या दोन्हींची टिकवण क्षमता सहा महिन्यापर्यंत आहे. उत्पादनांचे फूड ग्रेड प्लॅस्टिक बॉटलमध्ये आकर्षक पद्धतीने र्पॅकिंग होते.

विक्री- ‘मार्केटिंग’साठी घेतले कष्ट

सुरवातीला ‘मार्केटिंग’साठी खूप प्रयत्न, संघर्ष करावा लागला. उत्पादने ‘सॅंपल’ म्हणून मोफत द्यावी लागली. एवढ्या कष्टानंतर बाजारपेठेत वाटाणे फूड्स हा ब्रॅण्ड स्थापित करण्यात यश आले आहे.

शेंगा लाडू (दीडशे ग्रॅम) ३० रुपये, खजूर लाडू (१२० ग्रॅम) ४० रुपये, डाळिंब सिरप (अर्धा लिटर) १३० रुपये, जांभूळ सिरप (२०० मिलि) १४० रुपये, आवळा सिरप (अर्धा लिटर) ११० रुपये असे प्रातिनिधीक दर आहेत.

दरमहा आवळा सिरप २५ लिटर, शेंगादाणा व खजूर लाडू प्रत्येकी २५० किलो, डाळिंब सिरप २० लिटर, आवळा कॅण्डी ५ किलो, जांभूळ सिरप ८० लिटर अशी विक्री होतो.

सर्व उत्पादनांना पंढरपूर परिसरातून मोठी मागणी आहे. छोट्या-मोट्या प्रदर्शनांमधूनही उत्पादने विक्रीस ठेवण्यात येतात. बाहेरूनही मागणी आहे. पण ती वाढल्यास तेवढी पूर्ण करणे शक्य होईल का याचा अंदाज घेतला जात आहे.

दोन व्यक्तींना ‘कमिशन’ बेसिसवर विक्री जबाबदारी दिली आहे. ओंकार, त्याचे वडील उद्योगात राबतातच. दोन महिला मजूरही आहेत. व्यवसायातून चौघांच्या हाताला काम दिले आहे.

संपर्क- ओंकार वाटाणे- ९६३७२४९१५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

Crop Damage : एक लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Silk Cocoon Market : रेशीम कोष खरेदी बाजारात आवक मंदावली

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

SCROLL FOR NEXT