Agriculture Processing  Agrowon
यशोगाथा

Agriculture Processing : केळी चिप्स, हळद पावडरीचा ‘जटाशंकर’ ब्रॅण्ड

माणिक रासवे

Agriculture Success Story : नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नांदेडपासून २० किलोमीटरवर डोंगरकडा हे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हळद, सोयाबीन, तूर, हरभरा ही या भागातील मुख्य पिके आहेत. डोंगरकडा येथील तुकाराम गावंडे यांच्या कुटुंबाची तीन एकर शेती होती.

छोट्या क्षेत्रात उत्पन्नाची जोखीम होती. त्यामुळे तुकाराम यांनी बारावीनंतर फोटोग्राफी व्यवसाय करण्यासाठी २००१ मध्ये नांदेड येथील एका फोटोग्राफरकडे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मित्रांनी केलेल्या मदतीतून साडेसहा हजार रुपयांचा कॅमेरा खरेदी करत स्वतःचा फोटोग्राफी व्यवसाय सुरू केला.

२००८ मध्ये ‘जटाशंकर मूव्हीज ॲण्ड एलईडी वॉल’ या नावाने व्यवसायाचा विस्तार केला. व्यवसायात चांगला जम बसला असताना २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाउन लागले. लग्न समारंभ कार्यक्रमांवर मर्यादा आल्या. त्यामुळे फोटोग्राफी व्यवसाय बंद करावा लागला. उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्यामुळे कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. कसोटीच्या काळात तुकाराम खचले नाहीत. या काळात त्यांनी रतन टाटा यांच्यासह अनेकविध यशस्वी प्रक्रिया उद्योजकांच्या चरित्राचे वाचन केले. यातून त्यांना उभारी मिळाली.

तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तुकाराम यांचे काका श्रीधर गावंडे यांच्याशी एक दिवस शेतमाल प्रक्रिया उद्योगावर चर्चा करत असताना केळी प्रक्रिया उद्योगातील संधीवर चर्चा झाली. त्या वेळी लॉकडाउनमुळे केळीचे दर प्रति क्विंटल ३०० रुपयांपर्यंत घसरले होते. प्रक्रिया केल्यावर मूल्यवर्धन होऊन चांगला फायदा होऊ शकतो.

शिवाय स्थानिक परिसरात केळी लागवड क्षेत्र जास्त असले, तरी त्या भागात केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत. त्यासोबतच हळद, हरभरा प्रक्रियेची जोड देणे शक्य होते. गाव तसेच स्थानिक परिसरातून केळी, हळद, हरभरा आदी कच्चा माल सहज उपलब्ध होतो. या शेतीमालावर आधारित उद्योगातील संधी तुकाराम यांनी ओळखली.

नांदेड येथील एकनाथराव पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम यांनी २५ मे २०२० मध्ये केळी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा संकल्प केला. दरम्यानच्या काळात कुटुंबाची विभागणी झाल्यानंतर तुकाराम यांच्या वाट्याला अवघी ४२ गुंठे जमीन आली. या जमिनीत काही वर्षे ऊस, कांदा, हळद, केळी आदी पिके घेऊन पाहिली. परंतु रस्त्याच्या अडचणी तसेच त्रिकोणी आकाराचे छोटे क्षेत्र वाट्याला आल्याने मर्यादा येऊ लागल्या.

डोंगरकडा गावापासून एक ते दीड किमीवर जवळा पांचाळ या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ७०० मीटरवर असलेल्या जेमतेम एकरभर क्षेत्रात तुकाराम यांनी प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. आजी जिजाबाई यांच्या संस्कारांत जडणघडण झालेल्या तुकाराम यांनी या परिसराला ‘जिजाऊ धाम’ असे नाव दिले आहे. दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू आहे.

प्रक्रिया उद्योगाची उभारणी

उद्योगासाठी २०२० मध्ये स्वतःचे राहते घर तारण ठेवून भारतीय स्टेट बँकेकडून कर्ज घेतले. डोंगरकडा ते जवळा पांचाळ या रस्त्यापासून शेताकडे जाण्याऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण केले. उद्योगासाठी ‘थ्री फेज’ वीजपुरवठा घेतला. भिंतीसाठी सिमेंट ब्लॉक आणि छतासाठी टिन पत्रे वापरले. दोन निवारे, गोदाम, कार्यालय, किचन, स्टाफ रूम आदी व्यवस्था तयार केल्या.

सभोवती वृक्षलागवड केली. प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावरच जवळील रक्कम खर्च झाली. यंत्र सामग्री खरेदी करण्यासाठी पैशाची अडचण निर्माण झाली. या काळात मित्र डॉ. संतोष कल्याणकर, नामदेव दळवी आदी मित्र मंडळी तुकाराम यांच्या मदतीला धावून आले.

जिल्हा उद्योग विभागीय अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कळमनुरी येथील एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीची पाहणी केली. केंद्र शासनाच्या कृषी आधारित उद्योग पायाभूत सुविधा निधी अंतर्गत तुकाराम यांना ९० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यानंतर केळी चिप्स निर्मितीसाठी आधुनिक फ्रायर यंत्र, हळद पावडर निर्मिती यंत्र, पाऊच पॅकिंग यंत्र आदी यंत्रसामग्री खरेदी केली.

दरम्यानच्या काळात ‘जटाशंकर ॲग्रो प्रॉडक्ट्स’ या नावाने उद्योगाची नोंदणी केली. १५ जुलै २०२३ मध्ये भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण (एफएसएसआय) कडून परवाना मिळाला. केळी चिप्स, हळद पावडर, फरसाण, मिरची पावडर आदींचे उत्पादन सुरू केले. डोंगरकडा येथील ग्रामदैवत श्री. जटाशंकरच्या नावावरून तुकाराम यांनी उत्पादनांना ‘जटाशंकर’ असे ब्रँड नाव दिले आहे.

विक्री व्यवस्था केली भक्कम

किमान दरात दर्जेदार उत्पादन ग्राहकांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रक्रियायुक्त उत्पादनांचा दर्जा उत्तम असल्यामुळे अल्पावधीतच उत्पादनांना ग्राहकांची चांगली पसंती मिळाली. मराठवाडा विदर्भातील जवळपास १६ तालुक्यांमध्ये उत्पादनांची विक्री होते. त्यात कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव, अर्धापूर, नांदेड, भोकर, उमरी, धर्माबाद, हिमायतनगर, हादगाव, उमरखेड, पुसद, महागाव या तालुक्यांतील २७ अधिकृत विक्रेत्यांना उत्पादने पुरविली जातात. शिवाय राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा फाटा येथे स्वतःचे आउटलेट आहे. आगामी काळात आणखी दहा आउटलेट सुरू करणार असल्याचे तुकाराम गावंडे सांगतात.

उद्योग व्यवस्थापन, उलाढाल

तुकाराम यांना पत्नी सौ. चित्रागंणा त्यांचा प्रक्रिया उद्योग व्यवस्थापनामध्ये विशेष सहभाग असतो. सध्या प्रक्रिया उद्योगामधून १४ कर्मचाऱ्यांचा रोजगार मिळाला आहे. महिन्याला सुमारे १५ लाख रुपयांची उलाढाल होते. याशिवाय मूळ फोटोग्राफी व्यवसायासाठी वेगळा स्टॉफ आहे. नफ्यातून उद्योगासाठी आवश्यक सुविधा उभारणीवर तुकाराम यांचा भर आहे.

- तुकाराम गावंडे, ९०९६२७७१६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT