डॉ. माधुरी रेवणवार
Economic Empowerment: ग्रामीण महिलांचे आर्थिक सबलीकरण ही काळाची गरज आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्याची आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याची मोठी संधी मिळते. यासाठी छोटे आणि लघु उद्योग महत्त्वाचे आहेत.सध्या लघु उद्योजकांना विक्री व्यवस्थेमध्ये अडचणी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया आणि आधुनिक विपणन तंत्रज्ञानाबद्दल कमी माहिती असते. त्यामुळे महिला विक्रीसाठी पारंपारिक पद्धतींवरच अवलंबून राहतात, त्यामुळे हे उद्योग केवळ स्थानिक बाजारपेठेपर्यंत मर्यादित असतात. हे लक्षात घेऊन संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी कृषी तंत्रज्ञान महोत्सवामध्ये (कृषीवेद) विविध महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजिकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतो. यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आर्थिक सशक्तीकरण
खाद्य महोत्सवांमध्ये पारंपरिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. यामुळे शहरी ग्राहकांना पदार्थांची उपयुक्तता, चव आणि विविधतेची माहिती पोहोचवता येते. या महोत्सवांमुळे स्थानिक खाद्य संस्कृती आणि पारंपरिक पदार्थांचा संरक्षण देखील होत आहे. ग्रामीण भागात महिलांना त्यांच्या कौशल्यांचा वापर करून रोजगार मिळविण्यासाठी अनेक वेळा संधींचा अभाव असतो. खाद्य महोत्सव आणि प्रदर्शनीमध्ये त्यांना हस्त कौशल्य, खाद्यपदार्थ विक्री करण्याची चांगली संधी मिळाली आहे.
थेट ग्राहकांशी संवाद
खाद्य महोत्सव आणि प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना ग्राहक तसेच इतर उत्पादकांसोबत संवाद साधता येतो. यामुळे त्यांना नवीन विचार, तंत्रज्ञान तसेच अन्य व्यवसायिकांना भेटण्याची संधी मिळते. यामुळे महिला गटांचे उत्पादन आणि विपणन क्षमता वाढते, तसेच नवीन बाजारपेठेची माहिती मिळते. महिलांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे कुटुंबाची स्थिती सुधारते, यामुळे पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षणावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यामुळे गावाच्या समृद्धीला चालना मिळते तसेच महिलांचा स्थानिक अर्थव्यवस्थेत सक्रिय सहभाग वाढत आहे.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर
महिलांना प्रक्रिया उत्पादने तसेच शेतीमाल विक्रीसाठी डिजिटल माध्यम आणि आधुनिक विक्री व्यवस्थेचा वापर करणे आवश्यक झाले आहे. याबाबत चर्चासत्र आणि प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिले जाते.याचे सकारात्मक बदल दिसून आले आहेत.
बचत गटांना विक्रीच्या संधी
यंदाच्या वर्षी कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबविण्यात आलेल्या खाद्य महोत्सव आणि प्रदर्शनामध्ये ४० विविध प्रकारचे स्टॉल्स होते. ज्यामुळे विविध क्षेत्रांतील महिलांना आपली उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. या महोत्सवामध्ये पारंपारिक आणि आधुनिक खाद्यपदार्थ तसेच अन्य प्रकारच्या वस्तूंची चांगली उलाढाल झाली. पारंपरिक ड्रेस, कलाकुसरीच्या साड्यांना देखील ग्राहकांनी पसंती दिली.
खाद्यपदार्थ
बचत गटांनी तयार केलेले मसाले, कडक भाकरी, सोयाबीनपासून तयार केलेले विविध पदार्थ, पापड (साबुदाणा, भगर, तांदूळ, नाचणी, ज्वारी असे अनेक प्रकारची पापड), लोणची यासारख्या पारंपारिक आणि स्थानिक पदार्थांची या महोत्सवात चांगली विक्री झाली. यामध्ये स्थानिक पदार्थांची चव आणि संस्कृतीचा संगम होता. या महोत्सवामधून अनेक महिलांनी वर्षभर लागणाऱ्या पदार्थांची खरेदी केले.
काही महिलांनी या महोत्सवात पाणीपुरी, भेळ, समोसा, कचोरी, पावभाजी अशा लोकप्रिय आणि आधुनिक खाद्यपदार्थांची विक्री केली. त्यामुळे महोत्सवात विविध वयोगटांतील लोक आकर्षित झाले. या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल तीन दिवसांमध्ये झाली.
प्रक्रियायुक्त पदार्थ
ग्रामीण भागातील महिलांनी विविध प्रकारचे तेल, मसाले, फळे, गोड पदार्थ आणि इतर ताज्या व प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री केली. या पदार्थांची गुणवत्ता आणि ताजेपणा ग्राहकांसाठी आकर्षण होते. विशेषतः बटाटा रोल्स, धपाटे, आप्पे, डोसा या पदार्थांना विशेष मागणी होती.सरबतांच्या स्टॉलवर लिंबू, आवळा, उसाचा रस, करवंद ज्यूस इत्यादी पेये उपलब्ध होती. सोबतच काही बचत गटांतर्फे फळांची जेली, चॉकलेट विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
गृहोपयोगी लाकडी वस्तू
नांदेड जिल्ह्यात काही महिला बचतगट पारंपरिक लाकडी वस्तू तयार करतात. या गटातर्फे ट्रे, चमचे, पोळपाट, लाटणे आणि इतर गृह उपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या विक्रीममुळे स्थानिक हस्तकला आणि पारंपारिक कार्यकौशल्याला चालना मिळाली आहे. या उत्पादनांना शहरी ग्राहकांच्याकडून चांगली मागणी आहे.
गोमय उत्पादने
देशी गाईचे गोमय तसेच गोमूत्रावर अनेक तास प्रक्रिया करून सुरक्षित तयार केलेली नैसर्गिक आणि रसायनमुक्त सौंदर्य प्रसाधनांची देखील या महोत्सवात विक्री झाली. बचत गटातील महिलांनी साबण, लोशन, फेस पॅक, तेल विक्रीसाठी आणले होते.
ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या महोत्सवात मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांतील महिलांनी सहभाग घेतला होता. महिला उद्योजिकांच्या सोबत शालेय विद्यार्थ्यांनी देखील कामवा आणि शिका या उपक्रमाअंतर्गत विविध खाद्य पदार्थ आणि फळांची विक्री केली. महिला व बाल विकास विभागामार्फत पौष्टिक आहाराचे प्रदर्शन होते. महिलांसाठीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी राज्याच्या महिला व बाल कल्याण, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि चित्राताई वाघ यांनी केली.
या महोत्सवामध्ये आठ हजारांहून अधिक शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि शहरी ग्राहकांनी सहभाग नोंदविला. महिला मेळावा आणि खाद्य महोत्सवामध्ये उमेद अभियान जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बाल कल्याण विभाग आणि कृषी विभाग यांचा उत्स्पुर्त सहभाग नोंदविला.या महोत्सवात तीन दिवसात महिला बचत गटांच्या उत्पादनांची सुमारे तीन लाखांची उलाढाल झाली. काही ग्राहकांच्याकडून वर्षभर विविध शेतीमालाची मागणी नोंदविण्यात आली आहे.
प्रशिक्षणातून उद्योगांची उभारणी
जून २०१२ पासून आजपर्यंत कृषी विज्ञान केंद्रामध्ये महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत एकूण २५५ प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विशेष करून अन्नप्रक्रिया, गारमेंट्स मेकिंग, शारीरिक कष्ट कमी करणाऱ्या आधुनिक अवजारांचा वापर, आर्ट आणि क्राफ्ट, उद्योग व्यवसाय उभारणी संधी आणि प्रक्रिया, लघुउद्योजकांसाठी विपणन व्यवस्थापन, नैसर्गिक रंग तयार करणे अशा विविध विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया, प्रात्यक्षिके, अभ्यास दौरे, पदार्थांचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, कायदेशीर बाबी या विषयांचा समावेश आहे.
आजपर्यंत गृहविज्ञान विभागाअंतर्गत ग्रामीण महिला, नवीन उद्योजक, युवा, बचत गट सदस्य, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी अशा एकूण ६,०८० जणांनी लाभ घेतला आहे. याचाच परिणाम म्हणून आजपर्यंत पाचशेहून अधिक नवनवीन उद्योग उभारणीसाठी कृषी विज्ञान केंद्राने तांत्रिक सहाय्य केले आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दहा हजारांपेक्षाही अधिक महिला कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.
- डॉ. माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४
(वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.