borate family 
यशोगाथा

Success story : कोरफड, आवळासहित सत्तावीस ‘ज्यूसेस’ निर्मितीचा उद्योग

Food Processing : सांगली जिल्ह्यातील शेगाव येथील बोराडे कुटुंबाने कोरफड, अर्जुन, आवळा आदी विविध वनस्पतींपासून २७ प्रकारचे ‘ज्यूस’ तयार करण्याचा उद्योग सुरू केला. जतसारख्या दुष्काळी तालुक्यात उद्योगाची उभारणी करण्यासह त्याची वृद्धी व वार्षिक ४० लाखांपर्यंतची उलाढाल करण्यापर्यंत या कुटुंबाने मजल मारली आहे. संजीवनी हा त्यांचा ब्रॅण्ड बाजारपेठेत लोकप्रिय झाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

sangli News : सांगली जिल्ह्यातील जत हा दुष्काळी तालुका आहे. केवळ शेतीच नव्हे तर पूरक, प्रक्रिया उद्योग करायचं म्हटलं तरी अनेक मर्यादा येतात. जत शहरापासून २० किलोमीटरवर शेगाव आहे. गावातील संभाजीराव धोंडिराम बोराडे यांची बारा एकर शेती आहे. त्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागला. म्हैसाळ योजनेमुळे आता त्यांची शेती बागायती झाली आहे. ते १९७९-८८ या काळात गावातील दूध सोसायटीत नोकरी करायचे. त्यावरच उदरनिर्वाह चालायचा. सन १९९० ते १९९५ या काळात उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने ते विविध पिकांचे पर्याय शोधत होते. कोल्हापूर भागातील कोरफड शेतीची माहिती त्यांना मिळाली. कृषी विभागाच्या मदतीने ते ही शेती पाहून आले.

कोरफडीचा प्रयोग

सन १९९८ मध्ये संभाजीरावांनी कोरफड लागवडीचे धाडस केले. पण विक्रीवेळी संकट ओढवले. व्यावासायिकाने खरेदीचा शब्द पाळला नाही. मग गावातील एका अधिकाऱ्याने पुण्यातील कंपनीचा पत्ता मिळवून दिला. त्या कंपनीने तीन रुपये प्रति किलो दराने खरेदी केली. कोरफडीचा दर्जा चांगला असल्याने पुढे विक्रीची सोय झाली. पण दरांची शाश्‍वती नसायची. अपेक्षित दर मिळत नसल्याने चिंता होतीच.

प्रक्रिया उद्योगात पदार्पण

कोरफड लागवडीतून त्याच्या ज्यूसच्या व्यावसायिक महत्त्वाची कल्पना संभाजीराव यांना आली होती. केवळ अशाश्‍वत व अस्थिर पीकप्रयोग करीत कंपन्यांना कच्चा माल पुरवत परावलंबी राहण्यापेक्षा आपण स्वतःच या रसनिर्मितीत (ज्यूस) का उतरू नये असे त्यांना वाटून गेले. मग त्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. कच्चा माल, यांत्रिकीकरण, युनिट व ज्यूसचे मार्केट असा सर्वांगीण अभ्यास केला. आणि त्यात उतरण्याचे निश्‍चित केले. मुंबई, हैदराबाद येथे यंत्रांच्या मोठ्या प्रदर्शनांना भेटी देत यांत्रिकीकरण समजून घेतले. कोल्हापूर येथील ‘रामेती’ या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दहा दिवसांचे या उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. संस्थेतर्फे ज्यूसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या भेटी घडवून आणल्या. मुंबई, गोवा व अन्य ठिकाणाहून यंत्रे आणली. त्यासाठी २४ लाखांचे कर्ज काढले. अखेर एवढ्या प्रयत्नांमधून दोनशे लिटर प्रति दिन ज्यूस तयार होईल या क्षमतेचे छोटेखानी युनिट २००७ मध्ये सुरू केले.

ज्यूसविक्रीचे प्रयत्न

कोरफड मग आवळा, जांभूळ अशी ज्यूसनिर्मिती सुरू झाली. संभाजीराव यांची दोन मुले सुशांत व संकुल यांनी मार्केटिंगची जबाबदारी उचलली. ‘डोअर टू डोअर’ तसेच मेडिकलची, आयुर्वेद औषधे दुकाने यांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता पटवून दिली.

याशिवाय राज्यातील विविध ७० हून अधिक कृषी प्रदर्शनांमधून आपल्या उत्पादनांचा स्टॉल सादर केला. तेथे ज्यूस नमुना ग्राहकांना पिण्यास देखील उपलब्ध केला. ग्राहकांचे नेटवर्क उभारले.

ज्या ज्या ठिकाणी बोराडे बंधू उत्पादने घेऊन जायचे तेथे डॉक्टर किंवा अन्य ग्राहक त्यांना

अन्य ज्यूस व त्यांचे महत्त्व सांगायचे. बाजारातही कोणकोणत्या ज्यूसना मागणी आहे याचा अभ्यास हो लागलाय. जसजसे प्रयत्नांना यश येऊ लागले, विक्री चांगल्या प्रकारे होऊ लागली तसतशी उत्पादनांच्या श्रेणीत वाढ झाली. आज सोळा वर्षांच्या प्रवासात बोराडे कुटुंबाने सुशांत ॲग्रो इंडस्ट्रीज नावाची फर्म उभारली असून, उत्पादनांचा संजीवनी हा खात्रीशीर ब्रॅण्ड तयार केला आहे.

बोराडे यांच्या उद्योगातील ठळक बाबी

-कोरफड, आवळा, जांभूळ, गुळवेल, अर्जुनरस (सालीपासून), लेमन-जिंजर, कारले, बार्ली, बेहडा, कृष्णतुळस आदी २७ प्रकारच्या ज्यूसची आजमितीला निर्मिती. त्यासाठी ८ ते ९ आधुनिक यंत्रांचा सेटअप. ३५ लाखांची गुंतवणूक. सुमारे १० कामगार तैनात.

- उत्पादनांना जिल्हानिहाय वितरक. त्यांची संख्या सुमारे १५. याशिवाय मेडिकल दुकाने, सुपर मार्केट, शॉपी आदी शंभर आउटलेसमधून उत्पादनांची उपलब्धता. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, मुंबई, गोवा आदी ठिकाणी उत्पादनांची होते विक्री.

-वर्षाकाठी होणारी ज्यूसविक्री (प्रातिनिधिक व लिटरमध्ये)

कोरफड- १० हजार

आवळा- ८ हजार

अर्जुनरस- ७ हजार

जांभूळ- चार हजार ते पाच हजार, अन्य- दोन हजार लिटरपर्यंत.

वार्षिक उलाढाल- ४० लाखांपर्यंत.

- संभाजीराव, त्यांची पत्नी सौ. आशा, सुशांत, त्यांची त्यांच्या पत्नी स्नेहा, संकुल व त्यांची पत्नी निकिता असे सर्व मिळून उद्योग पाहतात.

--अन्न सुरक्षिततेविषयीच्या ‘एफएसएसएआय’ या संस्थेचा परवाना व प्रमाणीकरण.

-संकुल सांगतात की वनस्पतिजन्य ज्यूसेसना औद्योगिक, सौंदर्यप्रसाधने व आयुर्वेदिक उद्योगांकडून मागणी आहे. त्या दृष्टीने सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करण्याचा मानस आहे. जत ‘एमआयडीसी’ येथे प्रकल्प उभारणीसाठी जागेसाठी अर्जही केला आहे.

कच्च्या मालाची उपलब्धता

-बोराडे यांचे पूर्वी कोरफडीचे दहा एकर क्षेत्र होते. सध्या ते दोन एकर.

-बारामती, सांगोला, इस्लामपूर, अथणी, हातकणंगले, गडहिंग्लज आदी मिळून सुमारे २५ एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांकडून कोरफड लागवड. त्यांच्याकडून खरेदी.

-मल्चिंग पेपरवर कोरफड लागवडीचे नियोजन सुरू. त्यानंतर क्षेत्र वाढवणार.

-अर्जुन वनस्पती व जांभूळ कोकणातून येतो. तुळस पंढरपूर, तर आवळा सोलापूर भागातून येतो.

सुशांत बोराडे, ९७६४६०५८००

संभाजीराव बोराडे, ८२७५०३१८००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT