हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडाची (ता.कळमनुरी) प्रगतिशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळख आहे. जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ येथील शेतकऱ्यांना होतो. विविध स्रोतांद्वारेही पाणी उपलब्ध असल्यामुळे गावात बागायतीचे क्षेत्र (Horticulture) तालुक्यातील अन्य गावांच्या तुलनेत अधिक आहे.
या ठिकाणचे शेतकरी प्रामुख्याने केळी, हळद, ऊस, भाजीपाला पिके घेतात. बारमाही सिंचनात पाणी व खतांचा अनियंत्रित वापर, अतिवृष्टी, सातत्याने पडणारे पाऊस, अवकाळी पाऊस आदी विविध कारणांमुळे जमिनी चिबड , चोपण झाल्या आहेत. त्यांची उत्पादकता कमी झाली आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी गादीवाफा तंत्र पद्धतीचा आधार घेतला आहे. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी डी. बी. काळे यांचे या तंत्रप्रसारात मोठे योगदान आहे.
अडकिणे यांच्याकडील समस्या
डोंगरकडा येथील पंकज अडकिणे सन २००० पासून शेतीत आहेत. त्यांची १६ एकर वडिलोपार्जित मध्यम प्रकारची जमीन आहे. विहीर, बोअर, शेततळ्याची सुविधा आहे. संपूर्ण १६ एकर क्षेत्र बारमाही सिंचनाखाली आहे. केळी, हळद ही नगदी पिके आहेत. अलीकडील काही वर्षांत त्यांचे सुमारे दहा एकर क्षेत्र चिबड झाले. पाण्याचा निचरा व्यवस्थित होईना. झाडांची मुळे अधिक काळ पाण्याखाली राहू लागली. मर व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला. काही क्षेत्र पडीक ठेवण्याची वेळ आली.
तंत्र अवलंबिले
पंकज यांनी एकूण समस्या लक्षात घेत सुधारित तंत्राचा वापर करायचे ठरविले. शेतात तीन ठिकाणी उताराच्या दिशेने चर खोदले. प्रत्येक चराची खोली सहा फूट तर रुंदी चार फूट ठेवली. पूर्वी हळद आणि केळीची सरी वरंबा पद्धतीने लागवड करायचे. आता ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे गादीवाफा (बेड) तंत्राचा वापर सुरू केला. हळदीत दोन बेडमधील अंतर साडेचार फूट तर केळीत हे अंतर सहा फूट ठेवले. दोन्ही पिकांत त्याची रुंदी दोन फूट तर उंची एक फूट ठेवली. केलेल्या उपायांमुळे पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होऊ लागला. कंदसड कमी झाली.
मुळांची वाढ चांगली होऊ लागली. दोन बेडमध्ये मोकळ्या जागेत तणनाशकांचा वापर न करता आंतरमशागत करून तणनियंत्रण करण्याची पद्धत ठेवली. दर तीन वर्षांनी उन्हाळ्यात एकरी २५० किलो जिप्समची मात्रा देण्यात येऊ लागली. पीक फेरपालट सुरू केली. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा व विद्राव्य खतांचा काटेकोर वापर ठेवला. शेणस्लरी, गांडूळ खत, हिरवळीच्या खतांवर भर दिला.
उत्पादकता वाढली
एकूण व्यवस्थापन सुधारल्याने हळदीचे पूर्वी एकरी १० ते १२ क्विंटल (वाळवलेले) येणारे उत्पादन आता ३० पासून ते कमाल ४५ क्विंटलपर्यंत मिळू लागले आहे. तर केळीची पूर्वी मिळणारी घडाची १५ ते १८ किलोपर्यंतची रास आता ३० ते ३५ किलोपर्यंत मिळू लागली आहे. पूर्वी अर्धापुरी जातीची केळीची लागवड सरी पद्धतीने व्हायची. त्या वेळी कंद वापरले जायचे. गेल्या दहा वर्षांपासून उती संवर्धित रोपांचा (ग्रॅन्ड नैन) वापर होत आहे. सूत्रकृमींना रोखण्यासाठी दोन वर्षांपासून केळीत झेंडूचे आंतरपीक घेण्यात येत आहे. त्यातून मागील वर्षी सुमारे ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून केळीचा उत्पादन खर्च कमी करण्यास मदत झाली.
जरबेरा व सघन पद्धतीने पेरू
सन २०१५ मध्ये कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत १० गुंठ्यांत शेडनेडगृह उभारले आहे. त्यात जरबेरा लागवड केली आहे. उत्पादन वर्षभर सुरू असते. दररोज सरासरी ७०० ते ८०० फुले विक्रीसाठी काढली जातात. नांदेड येथील ‘फ्लॉवर मार्केट’मध्ये विक्री होते. प्रति फूल वर्षभर सरासरी १ ते १५ रुपयांपर्यंत दर मिळतो. सन २०१९ मध्ये पावणेदोन एकरांत सरदार (लखनौ ४९) जातीच्या पेरूची सघन पद्धतीने लागवड केली आहे. यंदा उत्पादन घेणार आहेत.
शेततळ्यात मत्स्यपालन
तत्कालीन तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपूर्वी १०० बाय १०० बाय ३२ फूट आकाराच्या शेततळ्याची निर्मिती केली. त्याची पाणीसाठवण क्षमता सुमारे अडीच कोटी लिटर आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यात रोहू, कटला, मृगळ या जातींच्या माशांचे उत्पादन घेण्यात येत आहे. स्थानिक व्यापारी जागेवर येऊन मासे खरेदी करतात. अलीकडील काळात त्यापासून ७० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे.
शेतीत प्रगती
चार वर्षांपासून डोंगरकडा येथे कृषी निविष्ठा केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे पंकज यांचे परिसरातील शेतकऱ्यांसोबत संपर्क जाळे आहे. शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार ते करतात. त्यामुळे या भागात फुलशेतीचा विस्तार होण्यास मदत झाली. डोंगरकडा ते जवळा पांचाळ या रस्त्यावर त्यांची शेती आहे. तिथपर्यंत ये- जा करण्यासाठी एक लाख रुपये खर्च करून रस्त्याचे मजबुतीकरण केले. त्यामुळे केळीची थेट शेतातून वाहतूक सुकर झाली. परिवारात वडील सुभाषराव, आई छायाताई, पत्नी मनिषा, मुलगा नचिकेत, मुलगी अनुष्का बंधू योगेश सदस्य आहेत. चार बहिणींची विवाह शेतीतील उत्पन्नातूनच करणे शक्य झाले. सध्या पंकज मुलांच्या शिक्षणासाठी नांदेड येथे राहतात. शेती कामांसाठी दोन सालगडी आहेत.
‘ॲग्रोवन’चे वाचक
पंकज ‘ॲग्रोवन’चे सुरुवातीपासून वाचक आहेत. त्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशकथांमुळे राज्यभरातील शेतीतील प्रयोगाची माहिती मिळते. विविध तांत्रिक लेखांमधून ज्ञानवृद्धी होते.
पंकज अडकिणे ः ९९२२६३११६१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.