Sugarcane Production Agrowon
यशोगाथा

Sugarcane Production : अभ्यासातून आत्मसात केले सुधारित ऊसशेतीचे तंत्र

Raj Chougule

Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील उसासाठी प्रसिद्ध पट्ट्यांपैकी कागल हा महत्त्वाचा तालुका आहे. तालुक्यातील नानीबाई चिखली येथील सुरेश पाटील यांची दहा एकर ऊस शेती आहे. मध्यम प्रतीची जमीन आहे. ते कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे पशुखाद्य विभागात गुणवत्ता नियंत्रण विभागात सहायक व्यवस्थापक आहेत. त्यांचे औद्योगिक युनिटदेखील आहे.

आपले सारे व्याप सांभाळून त्यांनी शेतीची आवड जोपासली आहे. म्हणूनच सातत्यपूर्ण कष्टाने व अभ्यासाने ऊसशेतीत प्रगती करणे त्यांना शक्य झाले आहे.

पाटील यांची सुधारित ऊसशेती

-अलीकडील काही वर्षांपासून पाटील यांनी ऊसशेतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात जुन्या काही वाणांचा वापर ते करीत. अलीकडील काळात को ८६०३२ हेच वाण प्रामुख्याने ठेवले आहे.

-दरवर्षी नऊ एकरांत ऊस असतो. त्याचे प्रत्येकी तीन एकरांचे टप्पे केले आहेत. खोडवा घेतल्यानंतर काही वर्षांपूर्वी या जमिनीत मिरची, ढोबळी मिरची, झेंडू, काकडी आदी पिके घेतली जायची. मात्र मजूरटंचाई व अन्य व्यापांमुळे त्यांनी ही पिके घेणे थांबवले.

-पाटील सांगतात, की अलीकडे शेणखत वापरणे खूप महाग झाले आहे. खरेदी, वाहतूक व ती शेताला देण्याची मजूर हा खर्च एकरी साडेचार हजारांपुढे गेला आहे. त्यामुळे दरवर्षी लागवडीनंतर एक महिन्याने ताग, धैंचा आदी हिरवळीची पिके घेण्याचा पर्याय ठेवला आहे. फुलोरा येताच ती जमिनीत गाडली जातात. त्यातून जमिनीला पोषक घटक मिळविण्याचा प्रयत्न असतो.

-जुलैच्या पहिल्या सप्ताहात आडसाली उसाची लागवड होते. प्रगतिशील शेतकऱ्यांकडून दर्जेदार बेणे आणून त्याची घरी रोपवाटिका तयार केली जाते. त्यापासून रोपलागवड केली जाते.

-मागील पाच वर्षांच्या काळात लागवड पद्धतीत बदल केले. सुरुवातीला ३ फुटी सरी होती. पुढे चार, साडेचार व आता पाच फुटी सरीपर्यंत अंतर वाढविले आहे. वीस इंचाला एक रोप अशी लागवड होते. सरी पाडल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांपर्यंत शेत तसेच ठेवले जाते. त्यानंतर लागवड होते.

-दर दोन ते तीन वर्षांनी माती परीक्षण केले जाते. रासायनिक व कंपोस्ट अशी खते एकमेकांत मिसळून दिल जातात. किमान सात ते आठ दिवस त्यांची भट्टी ठेवली जाते. यात बेसल डोस म्हणून युरिया (दोन पोती) अधिक निंबोळी पेंड, दोन पोती पोटॅश, आठ पोती एसएसपी, मॅग्नेशिअम, गंधक, झिंक (१० किलो), लोह, बोरॉन (१० किलो) क्लोरॲंट्रानिलीप्रोल दाणेदार कीटकनाशक ८ किलो, ह्युमिक ॲसिड दाणेदार १० किलो व सिलिकायुक्त खत ८ किलो असा वापर असतो. भट्टी विविध खतांची स्वतंत्र लावण्यात येते.

-लागवडीनंतर एक महिन्याने जिवाणूखते दिली जातात.

-लागवडीनंतर २० व्या व ३० व्या दिवशी युरिया व निंबोळी पेंड पुन्हा दिली जाते. ४५ ते ५० व्या दिवशी बूस्टर डोस, तर ७५ ते ८० व्या दिवशी बाळभरणी होते. दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून ड्रेंचिंग सुरू होते. पुढे ८ ते १०, १५ ते ३०, ३० ते ६०, ६० ते ९० या टप्प्यात ठिबकद्वारे खते दिली जातात. १२० व्‍या दिवशी मोठी भरणी होते. इथून १५० व्या दिवसापर्यंत पाच ते दहा दिवसांच्‍या अंतराने जिवामृतही दिले जाते.

-लागवडीचा ऊस तुटल्यानंतर खोडव्याचे व्यवस्थापन सुरू होते. पाला पेटवला जात नाही. त्याची कुट्टी केली जाते. पाला सरीमध्ये दाबून घेतला जातो. त्यावर पाला कुजविणारे जिवाणू, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला जातो. पाचटामुळे जमिनीमध्ये वाफसा परिस्‍थिती कायम राखली जाते. जमीन सच्छिद्र झाल्याने हवा खेळती राहते. जमिनीचा पोत सुधारतो.

उत्पादनात वाढ

पूर्वी पाटील यांना एकरी ४० ते ४५ टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. अलीकडील वर्षांत त्यांनी एकरी ८० ते १०० टन उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. मागील वर्षी म्हणजे २०२२-२३ ला एकरी ११७ टन उत्पादन त्यांनी घेतले.

यंदा एकरी १५० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून त्यांचे व्यवस्थापन सुरू आहे. एकरी उत्पादन खर्च किमान एक लाख रुपये येतो. श्री. शाहू सहकारी साखर कारखान्याकडून प्रति टन तीनहजार रुपये दर मिळतो. खोडवा उसाचे ७० ते ७५ टन उत्पादन मिळते.

शेतीचा वाढवला अभ्यास

जिथून ज्ञान मिळेल तेथून ते घेण्याचा पाटील यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी प्रयोगशील शेतकरी, नामवंत तज्ज्ञांच्या भेटी ते घेतात. ‘ॲग्रोवन’ तसेच उसविषयक पुस्तके ते वाचतात, तज्ज्ञांनी विविध टप्प्यांवर व्यवस्‍थापनाबाबत दिलेल्या टिप्स नोंदवहीत टिपून घेतात. एखाद्या उत्पादनाचा ब्रॅण्ड माहितीत आला, तर त्यातील सक्रिय घटक कोणता आहे याची माहिती घेतात व त्यानंतर वापर करतात.

कोणताही प्रयोग सुरुवातीला तो एक एकरावर करतात. विविध तज्ज्ञांच्या शिफारशींमध्ये फरक असतो. मात्र स्वअभ्यास व अनुभव यांचा मेळ घालत पाटील यांनी आपले व्यवस्थापन वेळापत्रक तयार केले आहे. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या ऊस विकास योजनांच्या शिफारशींचाही अभ्यास केला आहे.

संपर्क - सुरेश पाटील, ९४२३८०१७१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT