कोल्हापुरातील राजारामपुरी येथे गंधाली सुहास दिंडे राहतात. त्यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले आहे. त्यांना प्रक्रिया उद्योगाची आवड असल्याने त्यातील बारकावे त्या शिकत गेल्या. त्यानंतर २०११ पासून महिलांना विविध अन्न प्रक्रिया उद्योगासंबंधी (Food Processing Industry) मार्गदर्शन करण्यास प्रारंभ केला. या माध्यमातून त्यांचा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांशी संपर्क आला. कोणत्याही प्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण देताना कच्चामाल लागतो. विशेष करून मसाला उद्योगांमध्ये कांदा पावडर, लसूण पावडर, आले पावडर, टोमॅटो पावडरीला (Tomato Powder) चांगली मागणी आहे. महिलांना प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण देत असताना प्रक्रियेसाठी कच्चा माल (Raw Material For Processing) कुठे मिळेल याची त्या माहिती देत. परंतु कधी कधी महिलांना प्रक्रिया उद्योगासाठी विविध पावडरी स्थानिक ठिकाणी मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. यातूनच अशा पावडरी आपण स्वतः का तयार करू नयेत? असा विचार त्यांच्या मनात आला आणि प्रक्रिया व्यवसायाची बीजे रोवली गेली. २०१७ मध्ये भाजीपाल्याचे निर्जलीकरण करून त्याची पावडर तयार करण्याचे नियोजन त्यांनी केले. याबाबत तांत्रिक अभ्यास केला. प्रक्रिया उद्योगाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली.
प्रक्रिया उद्योगाला सुरुवात ः
गंधालीताईंकडे प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने पल्व्हरायजर, रोस्टर, पावडरनिर्मिती यंत्र, भाजीपाला कटिंग यंत्र, पॅकिंग यंत्रणा उपलब्ध आहे. प्रामुख्याने कांदा, लसूण, आले, टोमॅटो आदीच्या पावडर निर्मितीवर त्यांचा भर आहे. स्थानिक होलसेल बाजारपेठेतून पावडर तयार करण्यासाठीचे कच्चामाल घेतला जातो. दोन दिवसांतून एकदा २५० ते ७५० किलो कांदा बाजार समितीतील होलसेल व्यापाऱ्याकडून खरेदी केला जातो. प्रामुख्याने लासलगाव येथून आलेला कांदा पावडरीसाठी निवडला जातो. कांदा आणल्यानंतर टरफले काढून तो स्वच्छ करून, चिरून सौरऊर्जा वाळवणी यंत्रामध्ये ठेवला जातो. दररोज आठ तास याप्रमाणे तीन दिवस कांदा वाळवला जातो. त्यानंतर रोस्टर यंत्राचा वापर करून त्यातील आद्र्ता कमी केली जाते. त्यातील पाणी पूर्णपणे निघाल्यानंतर पावडर केली जाते. साधारणपणे पाचशे किलो कांद्यापासून ८० ते १२० किलो पावडर तयार केली जाते. ही पावडर ५ ते ५० किलो प्रमाणात पॅकिंग केली जाते.
विक्रीचे नियोजन ः
कोल्हापूर शहराबरोबरच मुंबई, पुणे, बंगळूर येथून मसाला तयार करणारे व्यावसायिक कांदा, लसूण, आले, टोमॅटो पावडर खरेदी करतात. सूपमध्ये मिश्रण करण्यासाठी या पावडरींचा वापर होतो. गंधालीताई या व्यावसायिकांकडून किमान तीन दिवस आधी पावडरीची ऑर्डर घेतात. पुढे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावडर पॅकिंगकरून पोहोच केली जाते. कंपन्यांचे प्रतिनिधी जागेवर येऊन पावडरची खरेदी करतात किंवा गरज असेल तर पावडर त्यांच्याकडे पोहोच करण्याची सुविधा गंधाली ताईंनी तयार केली आहे.
पावडर तयार करण्यासाठी गंधालीताईंना महिला मजुरांच्या बरोबर त्यांचे पती सुहास आणि मुलगी हिमांशा मदत करते. सध्या पावडर विक्रीचे काम पती बघतात, पॅकिंगच्या कामामध्ये हिमांशा मदत करते. बाजारपेठेची मागणी आणि कच्या मालाच्या उपलब्धतेनुसार १४० ते २१० रुपये किलो या दराने आले, लसूण, टोमॅटो आणि कांदा पावडरची विक्री होते.
कोणत्याही व्यवसायामध्ये मार्केटिंग ही महत्त्वाची बाब असते. सुरुवातीच्या काळात ज्या स्थानिक महिला मसाला उद्योगांमध्ये कार्यरत आहेत त्यांना पावडर देऊन दिंडे यांनी प्रक्रिया व्यवसाय सुरू केला. या पावडरचा दर्जा चांगला असल्याने परिसराबरोबर परगावचे मसाला निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांच्याकडून पावडरीसाठी मागणी येऊ लागली. त्यामुळे दिंडे यांना आता वर्षभर विविध पावडरींची मागणी असते. प्रक्रिया उद्योगामध्ये गंधालीताईंनी साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. दर महिन्याला सुमारे एक ते दीड लाख रुपयांची उलाढाल होते. खर्च वजा जाता त्यांना ४० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. सध्या या प्रक्रिया उद्योगामध्ये कांदा, लसूण, आले, पालक, टोमॅटो, कढीपत्ता, गवती चहा, कसुरी मेथी, आमचूर, बीट, गाजर, चिकू, आंबा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावीन्यपूर्ण निर्जलीकरण केलेल्या पावडरींची निर्मिती होते. प्रक्रिया उद्योगात वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांनी ‘कपिला फूड्स’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. याचे प्रमाणपत्रदेखील त्यांनी घेतले आहे.
सध्या घरगुती पातळीवरच पावडरींची निर्मिती आणि विक्री होत आहे. येत्या काळात हा प्रक्रिया उद्योग वाढविण्याचा गंधालीताईंचा प्रयत्न आहे. या माध्यमातून गरजू महिलांना वर्षभर रोजगार देण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या बरोबरीने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी वनिता पाटील यांची गंधालीताईंना प्रक्रिया व्यवसाय वाढीसाठी चांगली मदत झाली. आतापर्यंत त्यांनी बचत गटातील दोनशे महिलांना प्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण दिले आहे. विविध शासकीय समित्यांवर प्रक्रिया उद्योगाच्या तज्ञ प्रशिक्षक म्हणून गंधालीताई काम करतात. यातून दररोज विविध महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेत अनेक महिलांनी मसाला उद्योग सुरू करून आर्थिक सक्षमतेकडे पाऊल टाकले आहे.
भाज्यांपासूनही पावडरनिर्मिती ः
इन्स्टंट मसाले तयार करणाऱ्यांकडून नियमितपणे गंधाली ताईंना काही प्रमाणात भाज्यांच्या पावडरीची मागणी असते. प्रामुख्याने पालक, मेथी, पुदिना, बीट यापासून पावडर तयार केली जाते. व्यावसायिकांच्याकडून जशी मागणी येईल त्या प्रमाणात या भाज्यांच्या पावडर तयार करून दिली जाते. या भाज्यांमध्ये पाण्याची प्रमाण जास्त असल्याने पावडर निर्मितीसाठी जास्त प्रमाणात भाजी वापरली जाते. त्यामुळे सरासरी २०० रुपये किलो या दराने भाजीपाला पावडरची विक्री होते. येत्या काळात रानभाज्या आणि औषधी वनस्पतींपासून पावडरनिर्मितीचे त्यांनी नियोजन केले आहे.
संपर्क ः सौ. गंधाली दिंडे, ७०२८९०१०५३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.