Nagpur News : नवअनंत फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना २०१८ मध्ये करण्यात आली. त्यात राकेश मानकर अध्यक्ष, तर भूषण मानकर, हर्षलता घाटोळ, चेतन घाटोळ, कमलाकर कांबळी हे संचालक होते. परिसरातील २५३ शेतकऱ्यांनी भागधारक प्रत्येकी १००० रुपयांचा शेअर घेतला. त्यातून सव्वा लाख रुपयांचे भांडवल जमा झाले.
प्रक्रियेचा ध्यास
सामान्यतः शेतकरी थेट व्यापाऱ्यांना बागा विकतात. त्यावर काढलेल्या मालाची प्रतवारी आणि थोडी प्रक्रिया करून व्यापारी तो माल पुढे बाजारात पाठवतात. त्यातून अधिक फायदा मिळवतात. संत्र्यावरील पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेमध्ये ग्रेडिंग, वॅक्सिंग केल्या जातात. त्यामुळे फळांवर चकाकी येते, टिकवण क्षमतेत वाढ होते. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी, वरुड भागांत गेल्या काही वर्षांमध्ये असे बारा प्रकल्प उभे राहिले आहेत.
तिथे खरेदीसाठी अनेक रिटेल चेन असलेल्या कंपन्याही येत आहेत. कंपन्यांमधील स्पर्धेमुळे दरातही वाढ होत आहे. त्याचा फायदा अंतिमतः बागायतदारांना होतो. ‘ऑरेंज सिटी’ म्हणविल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात असे एकही प्रक्रिया केंद्र नाही. अनेक वर्षापासून मागणी असूनही कळमना (नागपूर) बाजार समितीमध्येही केंद्र प्रत्यक्षात आले नाही. आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या संत्र्यावर प्राथमिक प्रक्रियेसाठी राकेश मानकर यांनी नवअनंत कंपनीच्या माध्यमातून पुढाकार घेतला. नागपूर जिल्ह्यात ग्रेडिंग, वॅक्सिंग प्रक्रियेचे पहिले युनिट उभारले.
...असा उभारला प्रकल्प
मोहपा गावात म्हसेपठार रोडवर राकेश मानकर यांच्या शेतीमध्येच कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया केंद्राचे १२,५०० चौरस फुटाचे शेड उभारले आहे. त्यासाठी सुमारे १ कोटी ३५ लाख रुपये खर्च झाला. अंतर्गत ग्रेडिंग, कोटिंग आणि वॅक्सिंग या यंत्रणेसाठी ३८ लाख रुपये लागले.
संत्र्याची उलाढाल
आंबिया हंगामातील संत्र्याची आवक सर्वांत आधी ऑगस्ट महिन्यात परतवाडा भागातून होते. कळमेश्वर भागातील संत्रा फळांची उपलब्धता नोव्हेंबर महिन्यापासून होते. जलालखेडा, भारसिंगी या भागातून याच दरम्यान मोसंबीची देखील आवक होते. संत्र्यामध्ये हंगामी तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल होते. एखाद्या शेतकऱ्याने मागणी केल्यास १ रुपये २५ पैसे प्रति किलो प्रमाणे त्याच्याही शेतीमालाचे ग्रेडिंग, कोटिंग व वॅक्सिंग करून दिले जाते. प्रक्रियेनंतर दर्जेदार संत्र्याचा पुरवठा देशाच्या विविध भागांत होतो. प्रामुख्याने कोलकता व तेथून बांगलादेशात निर्यात होते.
मृग बहरातील कळमेश्वर, कोंढाळी भागातील संत्रा फळांची उपलब्धता होते. त्या काळात शेतकऱ्यांच्या मालावरही प्रक्रिया करून दिली जाते. माल उतरविणे, ग्रेडिंग व प्रक्रिया आणि माल ट्रकमध्ये पुन्हा भरणे यासाठीचे दर निश्चित केले आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीकडून प्रक्रियेनंतर रिलायन्स, बिग बास्केट अशा कंपन्यांना पुरवठा केला जातो. त्या वेळी या कंपन्यांकडून वरील खर्चाची भरपाई होत असल्याने त्याचा भागधारक शेतकऱ्यांवर कोणताही भार पडत नसल्याचे राकेश मानकर यांनी सांगितले.
व्यवसाय विस्ताराचे ध्येय
पीएफएमई (पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) योजनेतून प्रीकुलींग चेंबर व कोल्ड स्टोअरेज उभारणीसाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. त्यासाठी १ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, बॅंकेकडे कर्जप्रस्तावही दिला आहे. कृषी विभागाकडून ३५ टक्के अनुदान मिळू शकेल. दर्जेदार मालाची विक्री केल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाच्या संत्र्याचा रस काढणे व त्यापासून पावडर तयार करण्याचा मानस आहे. त्यासाठीची यंत्रणा बसविण्याचाही एक प्रस्ताव दिलेला आहे. या ज्यूस व पावडरला औषधे कंपन्यांकडून चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चांगल्या, पण थोड्या कमी दर्जाच्या फळांनाही चांगला दर मिळू शकेल.
- राकेश मानकर, ९९७००७९२५७
टोमॅटोमध्ये ट्रेडिंग
मध्य प्रदेशातील छिंदवाडा, रोहणा, धाना, बुरय्या या चार भागांत भाजीपाला उत्पादकांची संख्या मोठी आहे. कंपनी येथून हंगामात टोमॅटोची खरेदी करते. त्याची प्रतवारी केल्यानंतर रिलायन्स, बिग बास्केट यांच्यासह कोलकाता भागातील व्यापाऱ्यांना टोमॅटोचा पुरवठा केला जातो. तेथून पुढे टोमॅटो बांगलादेशला जातो. या कंपन्याकडून दर्जानुसार दर आधीच कळतो. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांनाही ठरावीक दर सांगता येतो. ४० ते ५० रुपये या घाऊक दराने टोमॅटोची खरेदी गेल्या हंगामात बाजारातून करण्यात आली. त्यावर प्रक्रिया, वाहतूक, कमिशन असे विविध खर्च घाऊक खरेदीदाराला असतात. त्यामुळे त्याचे नफ्याचे मार्जिन गृहीत धरूनच दर निश्चित केला जातो. गेल्या वर्षी एप्रिल अखेर ते १५ जून या कालावधीत टोमॅटोमधून ७५ लाखाची उलाढाल झाली. अर्थात, नाशवंत मालाच्या खरेदी विक्री व्यवहारात जोखीमही असल्याचे राकेश सांगतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.