Dairy Business Success Story : पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील रिसे हे जिरायती पट्ट्यातील गाव आहे. येथील फक्कड कामथे यांची २५ एकर शेती आहे. मात्र पाण्याअभावी शेतीवर अनेक मर्यादा आल्या आहेत. तरीही कामथे यांनी पूर्वी ठिबक सिंचन व तंत्रज्ञानाचा वापर करून काकडी, कलिंगड, टोमॅटो आदींचे यशस्वी उत्पादन घेतले. मुंबई- वाशी मार्केटमध्ये ओळख तयार केली. पूर्वी कुटुंबाला शेळीपालनाचा आधार होता. परंतु काही समस्यांमुळे व्यवसाय वाढवणे शक्य झाले नाही. सध्या चार- पाच उस्मानाबादी शेळ्या आहेत.
वाढवला दुग्ध व्यवसाय
पाऊसमान कमी झाल्याने पाण्याची समस्या गंभीर होऊन २५ एकरांतून आजमितीला फार काही मिळत नाही. शेताजवळून उपसा सिंचन योजना गेली असली तरी त्याचे पाणी मिळत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह अशावेळी अत्यंत महत्त्वाचा होता. अशावेळी एका गाईपासून पूरक व्यवसायास सुरुवात केली.
या गाईने जवळपास १३ वेत दिले. तिच्यामुळे चांगली भरभराट झाली. त्यानंतर एक संकरित गायही घेतली. टप्प्याटप्प्याने वाढ करत आज दुष्काळी परिस्थितीत लहान- मोठी मिळून जनावरांची संख्या तब्बल ६५ पर्यंत गेली आहे.
मुक्त संचार पद्धतीचा गोठा व शेडही आहे. घरासमोरील चिंचेच्या झाडाखालीही जनावरे बांधली जातात. दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. मुक्त पद्धतीच्या गोठा व्यवस्थापनामुळे गाईंचे आरोग्य चांगले राहून त्यांची दूध देण्याची क्षमताही चांगली आहे.
दीडशे टन मुरघास निर्मिती
कामथे कुटुंब राहते त्या गावातील खोपडे वस्तीच्या परिसरात दोन वर्षीपासून इंचभरही पाणी वाहिले नाही. त्यामुळे शेतात चाऱ्याचे फारसे उत्पादन घेता आले नाही. त्यामुळे जनावरे सांभाळणे जिकिरीचे ठरत आहे. त्यावरही मात करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांकडून मका खरेदी करून मुरघास तयार केला जातो.
यंदा सुमारे १५० टन मुरघास तयार केला. पैकी ८० टन वापरण्यात आला तर ७० टनांपर्यंत शिल्लक आहे. उरसाच्या गळीत हंगामावेळेस वाढे घेऊन चाऱ्याची अजून तजवीज केली जाते. प्रसंगी अन्य पिकांचा चाराही खरेदी केला जातो. मका चाऱ्यांची एकरी ६० ते ६५ हजार रुपये प्रमाणे खरेदी होते.
कुटुंब राबतेय व्यवसायात
फक्कड, त्यांची पत्नी संजना, तरुण मुले प्रमोद व रवींद्र, सुना अनुक्रमे वैशाली व रूपाली असे सर्व जण व्यवसायात राबतात. पुतणे प्रमोद, त्यांची पत्नी रूपाली, नितीन व त्यांची पत्नी रेश्मा यांचीही मोलाची साथ आहे. एकत्रित कष्टांमुळेच व्यवसायातील संकटे पेलणे व त्यावर मात करणे शक्य झाले आहे.
६५ जनावरांची गरज लक्षात घेऊन मागील दोन वर्षांपासून हे कुटुंब सुमारे ४० ते ५० किलोमीटरवरून चारा आणण्याची अपार मेहनत घेत आहे. चाऱ्याची पाहणी, दर ठरविणे, त्यानंतर सकाळी ट्रॅक्टर घेऊन चारा आणणे हा सर्व खटाटोप सातत्याने सुरू असून तो कुटुंबाच्या जगण्याचा एक भागच झाला आहे.
कुक्कुटपालनाची सुरुवात
दुग्ध व्यवसायाला जोड म्हणून ब्रॉयलर कुक्कुटपालनास एक महिन्यापूर्वी सुरुवात केली आहे. त्यासाठी सुमारे १६५ बाय ३० फूट आकाराचे शेड बांधले आहे. त्यासाठी बँकेचे दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. सध्या साडेतीन हजार पक्ष्यांचे संगोपन केले जात आहे. एका कंपनीसोबत करार केला आहे. सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात देखील सव्वा ते दीड किलोपर्यंत पक्षांचे वजन मिळवले असून मरतुक देखील अत्यंत कमी असल्याचे फक्कड म्हणाले.
पाण्यासाठी संघर्ष
शेतात पाच विहिरी आहेत. परंतु त्यांना पाणी नसल्याने गावातील टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. साधारण तीन- चार दिवसांनंतर पाणी येत असल्याने कामथे कुटुंब पाण्याचे हौद, टाक्या आदी सर्व घटक भरून ठेवतात. काही वेळा खासगी टँकरचेही नियोजन केले जाते. मागील वर्षी उन्हाळ्यासाठी सुमारे ७० हजार रुपयांचे पाणी विकत घेतले. यंदाही तीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून सुमारे दोन किलोमीटरवरून गोठ्यापर्यंत पाणी आणण्यासाठी दोन लाख रुपये खर्च करून पाइप लाइन उभारण्याचे काम सुरू आहे.
व्यवसाय टिकवणे हेच महत्त्वाचे
आजमितीस २५ गाई दुभत्या गाई आहेत. दररोजचे एकूण २२५ ते २५० लिटर दूधसंकलन होते. यंत्राच्या साह्याने दूध काढणी होते. त्यासाठी दोन यंत्रे घेतली आहेत. दोन कडबा कुट्टी यंत्रेही घेतली आहेत. दोन वर्षांपूर्वी फलटण येथील दूध संघासाठी संकलन केंद्र सुरू आहे. सध्या दररोज ७०० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते.
गावातील दुग्ध व्यावसायिकांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. या केंद्रामुळे गाव परिसरातील सुमारे ४० शेतकरी जोडले गेले आहेत. फक्कड सांगतात की दुधाची प्रति लिटर ३० ते ३२ रुपये दराने विक्री केली जाते. हा दर कमी आहेच. शिवाय दररोजचा उत्पादन खर्चही अधिक असल्याने व्यवसाय किफायतशीर राहिलेला नाही.
मात्र पाणी-चारा टंचाई असो की तीव्र उन्हाळा असो, घरचे पशुधन टिकवणे, त्याची प्रेमाने जपणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या कुटुंबाचा तो एक भागच आहे. कुटुंबात आठ लहान मुले आहेत. त्यांच्या शिक्षणाचा मोठा खर्च आहे. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. अशा अनेक खर्चांमधून व समस्यांमधून आम्ही दुग्धव्यवसाय टिकवला असल्याचे फक्कड सांगतात.
फक्कड कामथे ९८५०२२९८४३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.